बटबटीत सहाय्य
By Admin | Updated: December 8, 2015 22:10 IST2015-12-08T22:10:33+5:302015-12-08T22:10:33+5:30
दक्षिणेकडील राज्यांना अत्यंत भडक आणि बटबटीतपणाची जात्याच आवड असल्याचे सर्वज्ञातच आहे. त्यांचे सिनेमे असोत की राजकारण असो, भव्यदिव्यतेच्या नावाखाली सारा प्रकार बटबटीतपणाचाच

बटबटीत सहाय्य
दक्षिणेकडील राज्यांना अत्यंत भडक आणि बटबटीतपणाची जात्याच आवड असल्याचे सर्वज्ञातच आहे. त्यांचे सिनेमे असोत की राजकारण असो, भव्यदिव्यतेच्या नावाखाली सारा प्रकार बटबटीतपणाचाच. पण आश्चर्य म्हणजे किमान एका प्रकरणात तरी हा भडकपणा आता तिथल्याच लोकाना खटकल्याचे आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण चेन्नई शहरावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तिथले अवघे जनजीवन पार उद्ध्वस्त झाले असून त्यातून सावरायला नेमके किती दिवस लागतील हे आज कोणीच सांगू शकत नाही. अर्थात तो भाग नंतरचा. आज तिथे खरी गरज आहे ती आपत्तीत सापडलेल्या लोकाना जिवंत ठेवण्याची व त्यासाठी आवश्यकता आहे ती अन्न आणि पाणी या अत्यंत मूलभूत गोष्टींची. पहिले दोन दिवस तर लोकाना काही मिळालेच नाही. पण जेव्हां चोहो दिशांनी पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाची पाकिटे पोहोचली आणि देशाच्या संरक्षक दलांनी हेलिकॉप्टर किंवा विमानांच्या साह्याने त्यांचे वाटपही सुरु केले. त्याच सुमारास तामिळनाडू सरकार आणि चेन्नई महापालिकेचे कर्मचारी काही स्वयंसेवकांना मदतीस घेऊन अन्नाची पाकिटे, पाणी आणि अन्य तत्सम जीवनावश्यक वस्तूंवर ‘अम्मा’ म्हणजे मुख्यमंत्री जयललिता यांचे चित्र असलेली स्टिकर्स चिकटविण्यात मश्गुल होती. ते काम पूर्ण झाल्यानंतरच मग त्यांचे वाटप सुरु केले गेले. पण ज्या लोकांकडे ही मदत पोचती झाली त्यांच्या संतापास पारावार उरला नाही. परिणामी काही भागात अशी मदत घेऊन जाणारी वाहने अडविण्याचेही प्रयत्न झाले. हे प्रयत्न अर्थातच द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मग मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण दिले जाऊ लागले. इतकेच नव्हे तर जागोजागी अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी अम्मांचे स्टीकर्स असलेल्या ज्या बसेस फिरु लागल्या व त्यामध्ये फुकट प्रवासाची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आली. अर्थात अम्मांचे ‘ब्रॅन्डींग’ करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता असे नाही. याआधी स्वस्त दरातील अम्मा कॅन्टीन, पाणी, मोबाईल यांच्या माध्यमातून ब्रॅन्डींग सुरुच आहे. पण त्यामध्ये आणि मदत कार्यामध्ये अम्माभक्तांनी फरक केला नाही व त्याची संतप्त प्रतिक्रिया आली.