धुक्यातला ड्रॅगन
By Admin | Updated: October 14, 2016 00:52 IST2016-10-14T00:52:00+5:302016-10-14T00:52:00+5:30
अर्थसत्तेच्या आधारावर जागतिक महासत्तापद मिळवण्याची या ड्रॅगनला घाई झाली आहे. शत्रू वाढवण्याची घाई. मित्र बनवण्याची घाई. सगळीच घाई आहे या मातीत.

धुक्यातला ड्रॅगन
- चीनमध्ये केलेल्या वर्षभराच्या वास्तव्यातली निरीक्षणे : टेकचंद सोनवणे
अर्थसत्तेच्या आधारावर जागतिक महासत्तापद मिळवण्याची या ड्रॅगनला घाई झाली आहे. शत्रू वाढवण्याची घाई. मित्र बनवण्याची घाई. सगळीच घाई आहे या मातीत. जागतिक महासत्ता बनण्याच्या चिनी प्रवासात भारत ना मित्र असेल ना शत्रू. भारत असेल फक्त एक स्पर्धक शेजारी! सामान्य चिनी लोकांसाठी भारत हे एक मोठे, अगम्य असे गूढ आहे. इथे सगळ्यांना एक भारतीय माणूस माहीत असतोे : मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्यामागोमाग नंबर येतो एका सिनेमाचा : थ्री इडियट्स !
इथल्या लोकांना भारतीय योगासने शिकायची असतात आणि बायकांना भारतीय सिनेमातल्या हिरॉईनसारखी साडी एकदातरी नेसायची असते.भारतात स्त्रिया सुरक्षित नसतात, अशी नवी धारणा इथे रुजली आहे आणि इथल्या तरुणांना भारतातली लोक-आंदोलने निरंकुश लोकशाहीची अपत्ये वाटतात. इथल्या एकलकोंड्या, एकेकट्या माणसांना भारतातल्या कुटुंबांचे मात्र मोठे अप्रूप आहे. अत्यंत जवळचे आणि तेवढेच दूरचे दोन महत्त्वाकांक्षी देश. नकाशावर पाठीला पाठ, पण एकमेकांबद्दल गैरसमजांचे अनोळखी जाळे मोठे गडद!