आधी वंदू तूज मोरया - श्री गणेश श्रद्धास्थाने !

By दा. कृ. सोमण | Published: September 3, 2017 07:00 AM2017-09-03T07:00:00+5:302017-09-03T07:00:00+5:30

दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला - गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणेश मूर्तींची स्थापना करून नंतर परंपरेप्रमाणे पूजन केले जाते. गणेशोत्सवाचे दिवस संपले तरी मनातील गणेशाचे स्थान कायम टिकून असते. मग पावसाळा संपत आला की श्रीगणेशाच्या श्रद्धास्थानाना भेटी देण्याचे बेत आखले जातात.

The first half of the temple is Shri Morcha - Shri Ganesh Shraddhastha! | आधी वंदू तूज मोरया - श्री गणेश श्रद्धास्थाने !

आधी वंदू तूज मोरया - श्री गणेश श्रद्धास्थाने !

Next
ठळक मुद्देया सहलींवरून आल्यानंतर तेथे काढलेले फोटो फेसबुकवर टाकणे हा तर आनंदाचा भाग असतो.बाहेरगावी गणेशश्रद्धा स्थानाना भेट देण्याची ही बातमी सांगताना प्रत्येकाला मोठा उत्साह व आनंद वाटत असतो.शिवाय इतरांना बाप्पाचे दर्शन कसे झाले  हे सांगतानाही आनंद होतंच असतो.

                     दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला - गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणेश मूर्तींची स्थापना करून नंतर परंपरेप्रमाणे पूजन केले जाते. गणेशोत्सवाचे दिवस संपले तरी मनातील गणेशाचे स्थान कायम टिकून असते. मग पावसाळा संपत आला की श्रीगणेशाच्या श्रद्धास्थानाना भेटी देण्याचे बेत आखले जातात. कोणी अष्टविनायक यात्रेची तयारी करतात, तर कोणी गणपतीपुळ्याला सागरकिनारी असलेल्या स्वयंभू गणेशमंदिराला भेट देण्यासाठीच्या तयारीला लागतात. तर कोणी नांदगावच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यास उत्सुक असतात. एकमेकात चर्चा सुरू होते. कोणी म्हणतो की, आंजर्ल्याचा कड्यावरचे गणपतीमंदिर खूप सुंदर आहे. तर कोणाला हेदवीचे गणपती मंदिर पहायला जाणे जास्त चांगले वाटते. मग कॅलेंडरमधील सर्वांच्या सुट्ट्या पाहून निर्णय घेतला जातो. मुंबई बाहेरची मंडळी तर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
                                         आनंद- सौख्याची प्राप्ती
                    एकदा बेत ठरला की मग घरच्या गृहिणी शेजारी पाजारी आणि आप्तेष्ट -मैत्रीणीना ही सहलीला जाण्याची  बातमी सांगतात. मुले आपल्या दोस्ताना ही गोष्ट सांगण्यासाठी आतुर झालेली असतात. घरचा पुरुष नोकरीच्या ठिकाणी मित्राना गणेशसहलीची बातमी देतो. बाहेरगावी गणेशश्रद्धा स्थानाना भेट देण्याची ही बातमी सांगताना प्रत्येकाला मोठा उत्साह व आनंद वाटत असतो. मग कोणी प्रवास कंपन्यांबरोबर जाण्याचे बेत आखतात. तर कोणी एस.टीचे बुकिंग करतात. तर कोणी स्वत:च्या मोटारगाडीने जाण्याची तयारी करीत  करतात. आप्तेष्ट मित्रांच्या घरी लग्नकार्यासाठी जाणे आणि आपल्या आवडत्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी , श्रीगणेश श्रद्धास्थानी जाणे यांत खूप फरक असतो.  प्रवास, श्रीगणेशाचे दर्शन, निसर्ग दर्शन करण्यात खूप आनंद वाटत असतो.कधी कधी  प्रवासात जरी थोडा त्रास झाला तरी गणेश भक्ती एवढी मोठी असते की प्रत्येकाला तो त्रास हा त्रास वाटत  नाही . गणपती आपली परीक्षाच पाहत आहे, असेच प्रत्येकाला वाटत असते. या सहलींवरून आल्यानंतर तेथे काढलेले फोटो फेसबुकवर टाकणे हा तर आनंदाचा भाग असतो. शिवाय इतरांना बाप्पाचे दर्शन कसे झाले  हे सांगतानाही आनंद होतंच असतो.
                                           अष्टविनायक दर्शन
              महडचा श्रीवरदविनायक,पालीचा श्रीबल्लाळेश्वर, थेऊरचा श्रीचिंतामणी, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, मोरगावचा मोरेश्वर( मयुरेश्वर ) , रांजणगावचा श्री महागणपती,ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि लेण्याद्रीचा श्रीगिरिजात्मज असे हे अष्टविनायक आहेत.
             पूर्वी अष्टविनायकांचे दर्शन घ्यायला तसे कमी लोक जात. पण ' अष्टविनायक ' सिनेमा पाहिल्यानंतर अष्टविनायक दर्शनासाठी जाणारांच्या भक्तात वाढ झाली. असे स्थानिक लोक सांगतात.पूर्वी अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी चार दिवस लागत. परंतु आता कमी दिवसात अष्टविनायकांचे दर्शन घेतां येते. पहिल्या दिवशी मुंबईहून महड - पाली - थेऊर करीत मोरगाव येथे राहण्यासाठी यायचे. दुसर्या दिवशी मोरगावचे आणि सिद्धटेकचे दर्शन घेऊन पुन्हा मोरगाव येथेच मुक्काम करायचा. तिसर्या दिवशी रांजणगाव-ओझर करून जुन्नर येथे राहण्यासाठी जावयाचे आणि चौथ्या दिवशी लेण्याद्रीचे दर्शन घेऊन परतीला लागायचे.
अष्टविनायकाची ही यात्रा तीन दिवसातही करता येते. तीन दिवसात यात्रा करावयाची असल्यास पहिल्या दिवशी महड,पाली,रांजणगाव करून पुण्याला रहायला यायचे.दुसर्या दिवशी थेऊर,मोरगाव,सिद्धटेकला दर्शन घेऊन पुन्हा पुण्याला रहायला यायचे. तिसर्या दिवशी लेण्याद्रीचे दर्शन घेऊन घरी परतायचे.
              तीन- चार दिवसांच्या अष्टविनायक यात्रेचे हे दिवस विलक्षण आनंद मिळवून देणारे असतात. नोकरी व्यवसायातील नेहमींच्या कामांपासून आपण दूर जात असतो. म्हणून आनंद तर वाटतोच शिवाय विघ्नहर्त्या - सुखकर्त्या श्रीगणेशाच्या सान्निध्यात जात असल्याने मनावर पावित्र्याचे चांगले संस्कार घडत असतात. मनाची एकाग्रता साधतां येते. या निर्मळ भक्तियात्रेमुळे संसारातील एक अनोखा , पवित्र आणि निर्मळ अनुभव आपण अनुभवीत असतो.
                भाद्रपद - आश्विन महिन्यात महडला सुंदर कमळे मिळतात. सिद्धटेक येथे मिळणारी लाल रंगाची फुले आणि मुबलक दुर्वाही अगदी ताज्या असतात. ओझरला मिळणारी सुंदर मंदार फुले गणेशाप्रमाणेच गणेश भक्तानाही आनंदित करतात. लेण्याद्रीच्या परिसरांत ताज्या दूर्वा मिळतात. वाटेत जुन्नरला मिळणारे पेढे तर चवीला मस्त असतात. मोरगावचा भाजीपाला आणि गूळ तर प्रसिद्धच आहे. अष्टविनायकाच्या प्रत्येक स्थानी असणारे वैभव शहरी यात्रेकरूंच्या मनाला आकर्षित करते. भक्तांच्या श्रद्धा त्यांच्या मनांत आत्मविश्वास निर्माण करतात, लेण्याद्रीला श्रीगिरिजात्मजाच्या दर्शनासाठी जावयाचे असेल तर थोडा चढ चढावा लागतो. पण वर मंदिरात गेल्यावर मात्र सभोवतालचे दृश्य पाहून थकवा निघून जातो. मोरगावला दररोज शेजारतींच्या वेळी होणारा ' ओलांडा ' हा प्रकार पाहण्यासारखा असतो.
                                       प्रेक्षणीय स्थळे
              अष्टविनायक यात्रा करीत असतांना आपणास वेळ असेल तर इतर प्रेक्षणीय स्थळेही पाहता येतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी जुन्नरच्या  अगदी  जवळ आहे. तेथे जाणे शक्य होते. शिवनेरीला जाताना वाटेतच पंचमहादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. प्रवेश करताना प्रथम सरोवराचे दर्शन होते. नंतर भगवान शंकरांचे दर्शन होते. मोरगावच्या जवळच सोमेश्वराचे ठिकाणही असेच प्रेक्षणीय आहे. पालीपासून जवळच गरम पाण्याची कुंडे आहेत. तेथेही जाता येते.
               अष्टविनायक यात्रा भक्तांच्या मनामध्ये चांगला बदल घडवू शकते. मन सात्विक होते. मनातील द्वेष भावना नष्ट होते. मनाची मरगळ निघून उत्साह वाटू लागतो. इतर ठिकाणी केवळ मज्जा  करायला सहलीस जाण्याने परतल्यावर कदाचित थकवा जाणवेल. परंतु अष्टविनायक यात्रेहून परतल्यावर उत्साह व आनंद वाटतो. माणसाची कार्यक्षमता वाढते. स्वत:वरचा विश्वास वाढतो.
आपणास चांगले विचार सुचतात. हातून चांगल्या कृती होतात, चांगल्या मित्रांची संगत लाभते . ' मज्जा ' करण्याचा खरा अर्थ समजतो. गणेशाची कृपा किती लाभते हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. पण स्वत:मध्ये चांगला बदल करण्याची संधी मात्र आपणास नक्कीच मिळत असते. सवय ही माणसाच्या आयुष्यातील एक अतिशय मोठी शक्ती आहे. आपल्या सवयीच आपल्यावर राज्य करीत असतात. श्रीगणेशाच्या उपासनेमुळे चांगला, सात्विक विचार करण्याची सवय आपणास लाभते. आणि त्यामुळे मग चांगल्या कृती आपल्या हातून घडू लागतात. आपण गरिबीत जन्मलो तर आपला दोष नसतो. पण जर गरिबीतच आपला अंत झाला तर मात्र तो आपलाच दोष असतो, म्हणूनच ही गणेश उपासना आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेऊन चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी मनोबल वाढवीत असते.
              पुढच्या लेखात इतर गणेश श्रद्धास्थानांची माहिती करून  घेऊया. पण अष्टविनायक यात्रा करून आल्यावर गणेश गायत्री मंत्र म्हणावयाचा असतो. तो आपण म्हणूया.
                                ॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
                                 तन्नो दन्ती: प्रचोदयात् ।।

Web Title: The first half of the temple is Shri Morcha - Shri Ganesh Shraddhastha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.