मल्ल्याचे सरकारी साथीदारही शोधा
By Admin | Updated: April 21, 2017 01:44 IST2017-04-21T01:43:54+5:302017-04-21T01:44:08+5:30
जगातील पहिल्या पाच जणांत बसणारा भारतीय दारूविक्रेता, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला अख्खी विमानकंपनी भेट देणारा धनवंत, श्रीमंत बायका

मल्ल्याचे सरकारी साथीदारही शोधा
जगातील पहिल्या पाच जणांत बसणारा भारतीय दारूविक्रेता, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला अख्खी विमानकंपनी भेट देणारा धनवंत, श्रीमंत बायका, नट्या आणि देखण्या तरुणींच्या घोळक्यात सदैव वावरणारा गुलछबू, देशाला व त्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांना नऊ हजार कोटींनी बुडविणारा खासदार, इंग्लंडमधील वास्तव्यात थेट तेथील राणीच्या महालासमोरील विशाल निवासात वास्तव्य करणारा शौकीन आणि सरकारच्या मदतीने वा त्याचा डोळा चुकवून जेट एअरवेजच्या विमानातून ३६ बॅगा आणि अज्ञात देखणी स्त्री सोबत घेऊन पळालेला चतुर चोर विजय मल्ल्या याला भारत सरकारने उशिरा केलेल्या विनंतीवरून स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी परवा अटक केली. त्या अटकेला अवघे दोन-तीन तास होतात न होताच तोच त्याला जामीन मिळाला आणि आता आपले सरकार परत आणायला जागतिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावायला निघाले आहे. त्याला अटक झाली तेव्हा ती अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बुद्धिमत्तेमुळे व वकिलीतील त्यांच्या ज्ञानामुळे झाली, असा गाजावाजा माध्यमांनी केला. मात्र पुढे तो जामिनावर कोणाच्या बुद्धिमत्तेमुळे सुटला हे सांगायला त्यांनी आपली तोंडे उघडली नाहीत. मुळात विजय मल्ल्या हे एक अद्वितीय म्हणावे असे गूढ प्रकरण आहे. मुकेश अंबानी, अदानी आणि गोदरेज यासारख्या उद्योगपतींसोबत वावरलेले ते इसम आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि देशातील इतरही अनेक प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांकडे त्यांचा राबता राहिला आहे. इंग्लंडमध्ये ‘लपून बसला’ असतानाही तो राणीच्या नवऱ्यासोबत टेनिस कोर्टावर दिसायचा. तो ज्या जेट कंपनीच्या विमानातून खासदाराच्या विशेष पारपत्राच्या बळावर देशी यंत्रणांची फसवणूक करून इंग्लंडला पळाला त्या कंपनीचा मालक पूर्वीच्या व आताच्या सरकारच्या अतिशय निकटवर्ती गोटात वावरणारा आहे. असा माणूस सरकारच्या हातावर तुरी देऊन पळतो हीच बाब मुळी संशयास्पद वाटावी अशी आहे. सरकार, जेट कंपनी, परराष्ट्र खाते आणि सुरक्षा यंत्रणा यांचे वा त्यांच्यातील कोणा एकाचे पाठबळ असल्याखेरीज त्याला असे पळता येणे शक्यच नव्हते. नाही म्हणायला त्याच्या आधी ललित मोदी हा देशबुडवा अपराधीही असाच पळाला होता. त्याला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पाठबळ होते. त्यातल्या वसुंधराबार्इंच्या चिरंजीवांना त्याने कित्येक कोटी रुपये त्याच्या व्यवसायासाठी दिलेही होते. तो पळाल्यानंतर व इंग्लंडात बसून भारताला वाकुल्या दाखवताना दिसल्यानंतरही या दोन महिला त्याचे समर्थन करीतच होत्या. साध्या चोरांवर २४ तास नजर ठेवणाऱ्या आपल्या सुरक्षा यंत्रणा हजारो कोटींची चोरी करणाऱ्या माणसांना राजरोसपणे परदेशात जाऊ देतात, तेव्हा त्या यंत्रणांचे दुबळेपणच त्यातून उघड होते. या चोरांच्या सरकारात बसलेल्या साथीदारांची व सरकारी यंत्रणांची त्यांना असलेली साथही साऱ्यांच्या लक्षात येते. मल्ल्याच्या पश्चात सरकारने त्याची विमाने जप्त केली. घरांना सील लावले. त्याच्या मोटारी ताब्यात घेतल्या. मात्र सरकारातील कोणीही त्याच्या चौर्यकर्मावर उघड बोलले नाही. त्याच्या गुन्हेगारीची चर्चा करावी, असे संसदेला वाटले नाही आणि माध्यमांनाही त्याची चर्चा खुलेपणाने कराविशी वाटली नाही. पैसा मिळवा, तो कोणत्याही मार्गाने मिळवा, त्याचा वापर कशाही शौकावर करा, सरकारातील लोकांचे खिसे भरा, त्यांचा पाहुणचार करा, देश बुडवा आणि विदेशात पळून जाऊन सुरक्षित राहा असा हा मामला आहे. विजय मल्ल्याने दक्षिण आफ्रिकेत हजारो एकर जमिनी विकत घेऊन त्यात शिकारीसह जंगल सफारींची व्यवस्था केली आहे. आताच्या सरकारातले व याआधीच्या सरकारातले किती मंत्री, अधिकारी, पुढारी व राज्यांचे नेते देशातील अनेक बड्या पत्रकारांसह मल्ल्याच्या या सफारींचा व त्यातील पाहुणचाराचा भोग घेऊन आले आहेत, याची माहिती लहानसहान माणसांना व जिल्हा स्तरावरील पत्रकारांनाही आहे. अशा माणसाच्या अवैध संपत्तीचा शोध सरकारला एवढ्या उशिरा का लागावा आणि तो पळून गेल्यानंतर त्याचा माग घेण्याची त्याला बुद्धी का व्हावी हाच खरे तर देशाने सरकारला विचारायचा प्रश्न आहे. सरकारला जुळलेली चोर माणसे पकडली जातील आणि लगेच सुटतीलही. त्यांना पकडल्याचे श्रेय सरकार घेईल आणि ती सुटल्याचे श्रेय ती माणसे आपल्या चतुराईला देतील. तात्पर्य, मल्ल्याचे प्रकरण हा शासकीय बनवाबनवीचा खेळ आहे. यात केवळ राजकारणातलेच पुढारी सामील नाहीत. त्यात उद्योगपती आहेत, कारखानदार आहेत, विमान कंपन्यांचे मालक आहेत, माध्यमांचे संचालक आहेत आणि हो, देशभरचे आणि विदेशातले बडे दारूविक्रेतेही त्यात आहेत. एवढ्या मोठ्या रॅकेटला दोन तास पकडून ठेवणेच तेवढे जमते. पुढे त्यासाठी न्यायालयीन नाटके चालविली जातात आणि ती कितीही काळ चालू शकतात. हे थांबत नाही आणि मल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला देशी न्यायालयासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात नाही, तोवर आताच्या ‘अटक व जामीन’ या नाटकावर कोण कसा विश्वास ठेवील? त्याचवेळी त्याला साथ देणारे जोवर मोकळे राहतील तोवर सरकारचा भरवसा तरी कोणाला वाटेल?