त्या मंत्र्यावर खटला भरा

By Admin | Updated: April 2, 2015 23:16 IST2015-04-02T23:16:59+5:302015-04-02T23:16:59+5:30

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ज्या गणंगांचा समावेश आहे त्यात गिरिराज सिंग यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येणारे आहे. ‘मोदी आणि भाजपा यांना साथ न

Fill that suit in the minister | त्या मंत्र्यावर खटला भरा

त्या मंत्र्यावर खटला भरा

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ज्या गणंगांचा समावेश आहे त्यात गिरिराज सिंग यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येणारे आहे. ‘मोदी आणि भाजपा यांना साथ न देणाऱ्यांनी भारत सोडून पाकिस्तानात चालते व्हावे’ हा फतवा त्यांचाच. आताचा त्यांचा मूर्खपणा घटनेने दंडनीय ठरविलेल्या अपराधांच्या यादीत जमा होणारा आहे. ‘सोनिया गांधी जन्माने इटालियन नसत्या आणि नायजेरियन (म्हणजे कृष्णवर्णाच्या) असत्या तर काँग्रेसने त्यांना आपले नेतृत्व दिले असते काय?’ असा प्रश्न विचारून या गिरिराजाने आपले पंतप्रधान, सरकार व पक्ष या साऱ्यांनाच अडचणीत आणले आहे. तसे करताना त्यांनी या देशालाही त्याची मान खाली घालायला
लावली आहे. मुळात हे विधान त्यांच्या मनात दडलेला धर्मद्वेषच नव्हे, तर वर्णद्वेषही उघड करणारे आहे आणि त्याचा विपरीत परिणाम नायजेरिया या आफ्रिका खंडातील भारताच्या मित्रदेशाशी असलेल्या चांगल्या संबंधांवर झाला आहे. मित्र देशांशी असलेले चांगले
संबंध बिघडविणारे कोणतेही वक्तव्य घटनेनेच अग्राह्य व दंडनीय ठरविले आहे. गिरिराजाच्या वक्तव्याची
अतिशय गंभीर व तातडीची दखल नायजेरियाने घेतली असून, त्याविषयीचा आपला निषेध त्याने आपल्या वकिलातीमार्फत भारत सरकारकडे नोंदविला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्र्याची त्याविषयीची प्रतिक्रिया अजून जाहीर झाली नसली तरी, त्या वक्तव्याचे गंभीर
परिणाम लक्षात आलेल्या अमित शाह या भाजपाच्या अध्यक्षांनी गिरिराजाचे कान उपटले आहेत. ‘ज्यामुळे वर्णविद्वेष उफाळेल व सरकार अडचणीत येईल अशी बेताल वक्तव्ये करू नका’ असे त्यांनी या उत्पाती मंत्र्याला जाहीरपणे ऐकविले आहे. वर त्या वक्तव्याचा आमच्या पक्षाशी काहीएक संबंध नाही असेही जाहीर केले आहे. गिरिराज या मंत्र्याच्या या वक्तव्यामागे वर्णविद्वेषाची एक दुष्ट परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी रा. स्व. संघाच्या सरसंघचालकपदावर असलेल्या प्रो. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जूभैय्या यांनी सोनिया गांधींना ‘गोऱ्या चमडीची बाई’
असे म्हणून त्यांचा व ‘सगळ्या भारतीयांना गोऱ्या कातडीचे आकर्षण असते’ असे सांगून साऱ्या भारतीयांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यातून झालेला स्त्री जातीचा अपमान आणखीही वेगळा होता. नागपूरजवळच्या खापरी येथे भरलेल्या संघाच्या मोठ्या अधिवेशनातच या रज्जूभैय्यांनी ती अभद्रवाणी उच्चारली होती. तिचा व्हायचा तो परिणाम लागलीच झालाही. संघातील वरिष्ठांनी एकत्र येऊन रज्जूभैय्यांची सरसंघचालकपदावरून तत्काळ हकालपट्टी केली व त्या जागेवर के. सुदर्शन यांची स्थापना केली. गिरिराज सिंग यांच्या वक्तव्याचे नाते रज्जूभैय्यांच्या त्या अभद्र व स्त्रीद्वेष्ट्या उद््गारांशी आहे. नरेंद्र मोदींना आपल्या मंत्रिमंडळात घ्यायला अशी मूर्ख व बेजबाबदार माणसे कशी सापडली हा एका चांगल्या संशोधनाचा विषय आहे. तसा तो नसेल तर मोदींच्या सरकारचे हेच धोरण आहे या निर्णयाप्रत आपल्याला यावे लागणार आहे. मोदी आणि त्यांचा संघ परिवार यांचे धर्मद्वेषाचे राजकारण साऱ्यांच्या परिचयाचे आहे. गिरिराज सिंगांचे वक्तव्य त्या धर्मद्वेषाला वर्णद्वेषाचीही जोड असल्याचे सांगणारे आहे. अशा माणसाला अमित शहांनी नुसती तंबी देणे पुरेसे नाही. कारण तशा तंब्या याआधी साक्षीबुवा, निरांजना, प्राची, आदित्यनाथ व गोरखनाथ इ.ना देऊन झाल्या आहेत. त्यांचा त्या उठवळांवर काहीएक परिणाम न झाल्याचे देशाला दिसलेही आहे. यासंदर्भातील एक शंका ही की ‘मी रागावल्यासारखे करतो आणि तू रडल्यासारखे कर’ अशी या साऱ्यातली मिलीभगत तर नाही? गिरिराजचे वक्तव्य कमालीचे संतापजनक व अपमानकारक आहे. त्याला बडतर्फीची शिक्षाही पुरेशी नाही. अशा माणसाविरुद्ध भादंसंच्या संबंधित कलमान्वये खटलाच दाखल झाला पाहिजे. नायजेरियाने या वक्तव्याचा निषेध काल नोंदविला. उद्या सारा आफ्रिका खंड त्याविषयीचा निषेध नोंदवायला पुढे येईल. तेवढ्यावर न थांबता मानवाधिकार आयोग आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या जगभरच्या संस्थाही त्याविरुद्ध उभ्या झालेल्या दिसतील. एका बेताल माणसासाठी सारे जग आपल्या विरुद्ध उभे करून घेणे मोदींच्याच नव्हे तर भारतात येणाऱ्या कोणत्याही सरकारला परवडणारे नाही. अमेरिकेसारखा गौरवर्णी देश बराक ओबामा या कृष्णवर्णी नेत्याला आपले अध्यक्षपद देतो हे दाखविणारा आजचा वर्णसमन्वयाचा व माणुसकीच्या आदराचा काळ आहे. अनेक आशियाई देशांनी महिलांना आपले नेतेपद याआधी दिले असल्याचेही आपण पाहिले आहे. गिरिराज सिंग यांनी ज्या सोनिया गांधींबाबत ते अपमानकारक उद््गार काढले त्यांना मोदींच्याही अगोदर भारताने आपले पंतप्रधानपद एकमुखाने देऊ केले होते हे त्यांच्या विस्मरणात गेले असेल तरी ते हा देश कसे विसरेल? देशाने तेव्हा देऊ केलेले पंतप्रधानपद नाकारण्याचा अभूतपूर्व त्याग ज्या महिलेच्या नावावर आहे तिच्या त्वचेचा रंगच ज्या मंत्र्याच्या लक्षात राहतो तो इसम भारताच्या सरकारमध्ये राहण्याच्या लायकीचा नाही हे उघड आहे. मोदी व त्यांचे सहकारी या बाबीकडे कसे पाहतात याकडे या देशाचे लक्ष राहणार आहे. त्यांनी ही बाब खपवून घेतली तर गिरिराज सिंगांसोबत तेही वर्णविद्वेषाचे व स्त्रीद्वेषाचे अपराधी ठरणार आहेत.

Web Title: Fill that suit in the minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.