रात्रंदिन आमुचा समस्यांशी लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:25 PM2020-03-06T12:25:29+5:302020-03-06T12:26:30+5:30

कोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे

Fight us all night! | रात्रंदिन आमुचा समस्यांशी लढा !

रात्रंदिन आमुचा समस्यांशी लढा !

Next

मिलिंद कुलकर्णी
कोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे. कठीण प्रसंगात, संकट समयी हजरजबाबीपणा, विनोदबुध्दी शाबूत ठेवली तर त्यावर मात करणे सोपे जाते, असे त्यामागे संबंधितांचे तत्त्वज्ञान असावे.
गर्दीत जाताना लोक मास्क लावून फिरत आहे, जळगावसारख्या ठिकाणी अशा मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर या संदेशांना चालना मिळाली. अहो, हे मास्क कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नव्हे तर जळगावमधील धुळीपासून वाचविण्यासाठी लावले जात आहेत. रोज अमूक ग्रॅम धूळ नाका, तोंडाद्वारे पोटात जात आहे. त्याचा परिणाम थेट शरीरावर होत आहे, असे त्या संदेशात म्हटले आहे.
जळगावच नव्हे तर खान्देशातील बहुसंख्य पालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतीने रहिवाशांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यास नागरिक सज्ज आहे. आता तुम्ही विचाराल, असे कोणते उपक्रम या संस्थांनी राबविले आहे. आता आधी रस्त्यांचे उदाहरण घेऊ. एकतरी गुळगुळीत रस्ता दाखवा आणि कोरोना प्रतिबंधाचा मास्क मोफत मिळवा, अशी आॅफर दिली तर कुणालाही महागडा मास्क देण्याची वेळच येणार नाही. (केवळ निवडणूक काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते अभिनेत्रीच्या गालाची उपमा गुळगुळीत रस्त्याचे उदाहरण देताना देत असतात आणि पुढे आश्वासनाप्रमाणे तेही विसरुन जातात, हा भाग अलाहिदा) वैद्यकीय उपचार पध्दतीतील अ‍ॅक्युपे्रशर आणि अ‍ॅक्युपंक्चरचा लाभ रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना झाल्याशिवाय राहत नाही. हा केवढा मोठा लाभ आहे. अन्यथा मसाज, मालीशसाठी होणारा खर्च वाचला ते विसरुन कसे चालेल?
हा काळ पानगळीचा आहे. शतकोटी वृक्षलागवड झाल्याने सर्वत्र भरपूर झाडी झाली आहेत. पानगळ स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात होते. सफाई कर्मचारी झाडून एकेठिकाणी तो कचरा गोळा करतात. आता हा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर येणार आणि तो उचलणार, म्हणजे उगाच इंधनाचा अपव्यय होणार, हा उदात्त विचार लक्षात घेऊन सफाई कर्मचारी दोन पैशाची आगकाडी लावून कचरा जाळून टाकतात. आता त्यांच्या काटकसरीच्या राष्टÑव्यापी विचाराचा आदर्श घेऊन पुरस्कार देण्याऐवजी पर्यावरण, आरोग्य अशा क्षेत्रातील मंडळी धुराच्या नावाने बोंब ठोकतात, याला काय म्हणावे सांगा बरं. बरे एवढ्या सकाळी लोकांनी कशाला बरे घराबाहेर पडावे? चांगले घरी बसावे, टीव्हीवर रात्री राहून गेलेल्या मालिका बघाव्या, बायकोच्या हातचा नाश्ता करावा, पेपर वाचावा...ते दिले सोडून आणि धावायला, फिरायला बाहेर पडतात आणि धूर आणि धुळीच्या नावाने ओरडता, हे काही पटत नाही बुवा!
रस्त्यावरील हातगाडीवरील, उघड्यावरील, धूर व धुळीचा प्रभाव असलेले, उघड्या गटारींच्या शेजारी असलेल्या टपऱ्यांवरील खाद्यपदार्थ खाऊन आमची प्रतिकारशक्ती दुप्पट झालेली असताना आम्हाला हो कसला कोरोना व्हायरस बाधणार? ५० वर्षे जुन्या पाईपातून आम्ही ‘अमृत’मय जलसेवन करीत असताना कसली बाधा होणार ? काही होत नाही कोरोना? उगाच घाबरते आहे सारे जग, नाही का?
आता तर काय म्हणे मांसाहार करु नका? शाकाहार चांगला आहे, म्हणे. अहो, मांसाहार करणारे किती हुशार आणि चतुर असतात, त्यांना काही फरक पडणार नाही बघा. उघड्यावर मांस विक्री होते, कधी झाला परिणाम? कोंबड्या लटकवून मोटारसायकलीवरुन वाहतूक होते, काही झाला परिणाम? रस्त्यावर तापी, अनेरची मासेविक्री होते, कधी झाली का कोणती बाधा? उगाच तुम्ही मांसाहाराला बदनाम करतात बुवा!
४७ तापमानामध्ये तुमचा तो व्हायरस तर टिकला पाहिजे. अहो, होळी जाऊ द्या, बघा सूर्यदेव कसा प्रताप दाखवतो. मुंबई-पुण्याचे पाहुणे काही खान्देशात यायला तयार होत नाही उन्हाळ्यात तिथे चीनमधला व्हायरस कुठे येऊ घातलाय, सांगा बरे. लक्झरी बसमधील वासाने त्या व्हायरसला फेफरे यायचे, उलटटपाली तो परत गेलाच म्हणून समजा. काय मत आहे तुमचे?

Web Title: Fight us all night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव