लोकप्रिय व्यक्तीची हुकूमशाहीकडे वाटचाल घातक
By Admin | Updated: February 7, 2017 23:23 IST2017-02-07T23:23:44+5:302017-02-07T23:23:44+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अमेरिकेच्या मीडियाची नाराजी आहे. ट्रम्प यांनीही अमेरिकन मीडिया बेईमान, अविश्वासू आहे असे म्हटले होते

लोकप्रिय व्यक्तीची हुकूमशाहीकडे वाटचाल घातक
विश्वनाथ सचदेव, (ज्येष्ठ पत्रकार)
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अमेरिकेच्या मीडियाची नाराजी आहे. ट्रम्प यांनीही अमेरिकन मीडिया बेईमान, अविश्वासू आहे असे म्हटले होते. मीडियाविषयीची नाराजी ट्रम्प यांनी निवडणूक काळात तर व्यक्त केली होतीच; पण निवडणूक जिंकल्यावरही त्यांचा मीडियाविषयीचा राग कमी झाला नव्हता. त्यांनी पत्रकारांना ‘पृथ्वीवरील सर्वात बेईमान जमात’ असे संबोधले आहे. त्यांच्या शपथग्रहण समारंभाला फारशी गर्दी नव्हती असे विश्लेषण मीडियाने केले होते.
तसेच मागच्या बाजूस असलेल्या रिकाम्या खुर्च्या दर्शवून गर्दी किती केली होती हे दर्शविले होते! अध्यक्ष झाल्यावर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला होता. कारण तो पत्रकार खोटारडा आहे असे त्यांचे म्हणणे होते! आम्ही पत्रकारांना उत्तरदायित्व स्वीकारायला भाग पाडू असे मत त्यांच्या प्रेस सल्लागारांनी व्यक्त केले होते हे विशेष!
निवडून आल्यावर जुन्या गोष्टी विसरून डोनाल्ड ट्रम्प हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार बोलून दाखवतील असे वाटणाऱ्यांची अमेरिकन अध्यक्षांनी आपल्या वागणुकीने निराशा केली. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीकडून नम्रतेची अपेक्षा बाळगली जाते. पण जी माणसे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसारख्या व्यक्तीची मानसिकता ओळखण्याचा दावा करतात, त्यांचे म्हणणे असे असते की अशा व्यक्तींकडून विनम्रतेची अपेक्षा करणेच चुकीचे ठरते. अशा तऱ्हेच्या व्यक्तित्वाला कोणती उपाधी दिली जाते? इंग्रजीत अशा व्यक्तीला ‘पॉप्युलिस्ट’ म्हणतात. आपण सामान्य जनतेचे हितकर्ते आहोत असा दावा अशी माणसे करीत असतात.
अशा व्यक्तीला बोलघेवडा, गोडबोल्या असेही म्हटले जाते. ट्रम्पविरोधी लोक त्यांची याच भाषेत संभावना करीत असतात. ट्रम्पच्या विरोधकांची संख्या मोठी असून, नुकतीच त्यांनी त्यांच्या विरोधात निदर्शनेही केली. पण ट्रम्प यांचे म्हणणे आहे की या लोकांचा जर आपल्याला विरोध होता तर त्यांनी विरोधात मतदान का नाही केले? लोकांनी त्यांना बहुमताने निवडून दिले आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते म्हणणे चूक आहे असे कोण म्हणेल? ते निवडून आलेले अध्यक्ष आहेत, तेव्हा त्यांची स्वत:ची धोरणे राबविण्याची संधी त्यांना मिळायला हवी. लोकशाहीचा अर्थ हाच असतो. पण निवडून आलेल्या व्यक्तीची वागणूक नम्रतापूर्ण असावी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे त्यांचे धोरण असावे, हेही त्यांच्याकडून अपेक्षित असते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कामगिरी कशी होती हे आगामी काळच सांगेल. पण सध्या तरी त्यांच्या वागणुकीने हे स्पष्ट झाले आहे की लोकांच्या समर्थनामुळे आपण अध्यक्षपदासाठी सर्वात लायक व्यक्ती आहोत असे त्यांना वाटू लागले आहे. आपल्या हातून कधीच चूक होणार नाही अशी त्यांची भावना झाली आहे. ते अत्यंत आकर्षक घोषणा देतात आणि लोकांचा त्यांच्या घोषणांवर विश्वास आहे अशीच त्यांची धारणा झाली आहे. आपले समर्थक हेच खरे आहेत आणि आपले विरोधक हे जनतेचा भागच नाहीत असे अशा व्यक्तींना वाटते. एकूणच अशा व्यक्तींच्या लोकशाहीच्या व्याख्येत विरोधकांना स्थान नसते. ते जेव्हा ‘सबका विकास’ म्हणतात तेव्हा ‘त्यांच्या समर्थकांचा विकास’ असेच त्यांना वाटत असते.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मीडियाकडे ज्या दृष्टीने बघतात, त्या दृष्टीतून त्यांचा वैचारिक विरोध करणाऱ्यांना ते स्वत:चा शत्रू मानत असतात. त्यांच्या मतानुसार भिन्न मत बाळगणे हे शत्रुत्वासारखेच असते. विरोधकाच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी आपण संघर्ष करीत राहू असे रुसो यांचे वक्तव्य प्रसिद्ध आहे. पण लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना हे म्हणणे पटत नाही. ते स्वत:चा होणारा विरोध सहन करू शकत नाहीत. वेगळे मत धारण करणाऱ्या व्यक्ती त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी उत्सुक असतात अशीच त्यांची भावना असते. अशा व्यक्तींचे आणखी एक वैशिष्ट्य असते. ते स्वत:ला हुकूमशहा समजत नाहीत पण त्यांचे वर्तन हुकूमशहासारखेच असते. आपल्या पक्षाचे ते एकमेव नेता असतात. भारतीय जनता पार्टीची अवस्था अशीच होताना दिसते.
लोकशाही मूल्यांच्या रक्षणाच्या दृष्टीने अशी स्थिती निर्माण होणे धोकादायक असते. कोणताही नेता कितीही लोकप्रिय का असेना पण तो पक्षाच्या अनेक नेत्यांपैकी एक नेता असतो. तो एकमेव नेता नसतो. आपण एकमेव आहोत असे वाटू लागणे हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि त्या राजकीय पक्षासाठीही घातक ठरू शकते. पण असा नेता स्वत:ला जनतेच्या नाडीवर हात असलेला, लोकांच्या अगदी जवळ असलेला नेता समजत असतो. आपण गरिबी बघितली आहे. गरिबीतूनच आपण समोर आलो आहोत असे ती व्यक्ती वारंवार सांगत असते. पण गरिबीत वाढलेली व्यक्ती गरिबांची हितचिंतक असेलच असे छातीठोकपणे सांगता येत नाही. अशा तऱ्हेची व्यक्ती एकप्रकारच्या भयातच वावरत असते.
आपल्याला आव्हान देऊ शकेल अशी व्यक्ती पक्षात तयार होणार नाही याकडे ती लक्ष पुरवीत असते. त्यासाठी ती सर्व महत्त्वाच्या पदांवर स्वत:च्या विश्वासाची माणसे बसवीत असते. मग ती व्यक्ती त्या पदासाठी लायक आहे की नाही हेही बघितले जात नाही. सर्व महत्त्वाच्या पदांवर स्वत:च्या विश्वासाची माणसे नेमण्याचा अधिकार अमेरिकेच्या अध्यक्षांना असतो, तसा तो भारतात नसतो. पण तरीही लोकप्रियतेच्या नावावर अशी व्यक्ती आपल्या सभोवती ‘आपल्या’ माणसांच्या नेमणुका करून स्वत:चे स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत असते.
या सर्व गोष्टी अमेरिकेत सुरू झाल्या आहेत. अन्य लोकशाही राष्ट्रातील स्थिती याहून वेगळी नाही. पण ‘बोले तैसा चाले’ अशीच भूमिका निवडून आलेल्या व्यक्तीने घ्यावी अशी अपेक्षा असते. ‘सबका साथ, सबका विकास’ ही केवळ निवडणूक जिंकण्यापुरती घोषणा नसावी, तर तिचा अंमल करण्याची बांधिलकी राजकीय पक्षाने बाळगायला हवी. आपल्यावर टीका करून आपले खरे स्वरूप दाखविणाऱ्या मीडियाला आपला विरोधक न समजता आपला सहयोगी समजण्यात यावे हीच लोकशाहीवादी संकल्पना आहे. मीडियाने उत्तरदायित्वाची भावना बाळगावी असे म्हणत मीडियावर दबाव टाकण्याची भूमिका बाळगणे चुकीचे आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणेच सर्व लोकशाही राष्ट्रांच्या प्रमुखांनी मीडियाचे स्वातंत्र्य मानले पाहिजे आणि मीडियाला निर्भयपणे काम करण्याची मोकळीक असायला हवी, याकडे लक्ष पुरवायला हवे. तसे केल्यानेच लोकशाही परंपरा टिकून राहील. नेतृत्वाची लोकप्रियता आणि ते लोकवादी असल्याचा दावा यातील अंतर लक्षात घेऊनच अशातऱ्हेच्या नेतृत्वाच्या खरेपणाची पारख होऊ शकेल.