मराठवाड्यात ढगफुटी होऊनही नशीबफुटी कायम
By Admin | Updated: July 22, 2016 04:44 IST2016-07-22T04:44:02+5:302016-07-22T04:44:02+5:30
सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील काही गावांत यंदा पावसाने चांगलेच मनावर घेतले.

मराठवाड्यात ढगफुटी होऊनही नशीबफुटी कायम
सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील काही गावांत यंदा पावसाने चांगलेच मनावर घेतले. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत, हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कुरुंदा, आंबा आणि गिरगावमध्ये अक्षरश: ढगफुटी झाली. दुष्काळ कायमचा पळून गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण यातील एकाही गावात सध्या मुबलक पाणी नाही. शेती-उद्योगासाठी पाणी दूरच, पिण्याच्या पाण्याचेच हाल आहेत. मग या ढगफुटीतून बदाबदा पडलेले पाणी गेले कुठे? हिंगोली जिल्ह्याने ते आंध्राला, तर लातूर जिल्ह्याने कर्नाटकला देऊन टाकले. एकीकडे हक्काचे पाणी द्या म्हणून नाशिक-नगरशी भांडत राहायचे, वेळ-पैसा खर्च करायचा आणि इकडे पदरात पडलेले पाणी समोरच्याने न मागता त्याला देऊन टाकायचे. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचाच हा प्रकार.
जलपरीने बदनाम केलेल्या लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत (ता. निलंगा) एकाच दिवशी दीड तासात तब्बल ९४ मि.मी. पाऊस झाला, तरी पाण्याची ओरड आहे. १९८० च्या सुमारास औराद शहाजानीची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. तेव्हांच्या मागणीनुसार तेरणा नदीवरील तगरखेडा कोल्हापुरी बंधारा आणि आताच्या उच्चस्तरीय पाटबंधाऱ्यात एक विहीर घेण्यात आली. तिथून औरादला पाणीपुरवठा व्हायचा.
आज औरादची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात गेली आहे. पाणी जुन्या औरादलाही पुरेनासे झाले आहे. त्यामुळे याच नदीवर वरील बाजूस असलेल्या औराद कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन बोअर घेण्यात आले. आता औराद ‘कोल्हापुरी’चे उच्चस्तरीय बंधारा करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे पाणी अडविता येईल. दोन वर्षांपूर्वी चार कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. कुठे घोडे अडले ते ठाऊक नाही. पाणी अडविण्यात ठिकठिकाणी असे अनेक अडसर आहेत. आधी ते दूर करायला हवेत. औरादला पाणी पुरवले जाते तो तगरखेडा बंधारा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाला. ०.७७ द.ल.घ.मी. ही त्याची क्षमता. यंदा टंचाई जाणवणार नाही, असे वाटले. पण केवळ तीन आठवड्यांत २४ टक्के पाणी कमी झाले. पाऊस पडला त्या दिवशी ओव्हरफ्लो झाल्यानंतरचे सर्व पाणी पुढे वाहून कर्नाटकमध्ये गेले.
हिंगोली जिल्ह्यातही हेच घडले. आखाडा बाळापूरमध्ये (ता. कळमनुरी) चार तासांत १२७ मि.मी. पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे तीन तासांत १४७ मि.मी., गिरगावमध्ये १३५ मि.मी., तर आंबामध्ये एवढ्याच वेळात १२१ मि.मी. पाऊस झाला. वसमत, हिंगोलीसह साधारण ४५ गावांना पाणी पुरवणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या खालच्या बाजूस ढगफुटी झालेली ही सर्व गावे येतात. या धरणात सध्या १५४ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, ते अद्याप मृतसाठ्यात आहे. सध्या हिंगोलीला तीन दिवसाआड, तर वसमतला दोन दिवसाड पाणी मिळते. कुरूंदा गाव अनेक वर्षांपासून तहानलेलेच आहे. २२ गाव योजना, कालवा आणि आता पाईपलाईन करुनही इथला पाण्याचा प्रश्न मिटला नाही. आतापर्यंत वसमत तालुक्यात ३८६ मि.मी., तर कळमनुरी तालुक्यात ४१२ मि.मी. पाऊस झाला आहे. कुठे गेले हे पाणी? पैनगंगा, गोदावरी करीत आंध्र प्रदेशला जाऊन मिळाले. या पाण्याला ब्रेक लागावा म्हणून सापळी धरणाचा विचार पुढे आला. जमीन जाणार हिंगोलीची, लाभ मात्र होणार नांदेडला असे म्हणत त्याला विरोध झाला. आता काय, ना नांदेडला ना हिंगोलीला. पाणी मिळते आंध्रला.
औरादला साधारण ८०० मि.मी. तर हिंगोली जिल्ह्यात ८९३ मि.मी. पाऊस पडतो आणि तिकडे राजस्थानात साधारण २०० ते ४०० मि.मी. पाऊस पडतो. तरीही तिथे टँकर लागत नाही. मग येथेच पाणीटंचाई का? याचा अर्थ नियोजनात काहीतरी चुकते आहे. पडणारे पाणी मुरवायचे व साठवायचे कसे, याची शिकवण घालून द्यायला हवी. पाण्यासाठी भांडण्यात व पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा हे करायला हवे. पण ‘कुठलाही राजकीय पुढारी यात पुढाकार घेणार नाही. कारण यात पैसा नाही, टक्केवारी नाही, कार्यकर्ते सांभाळता येतील, असे फंडेही नाहीत...’, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांची ही प्रतिक्रिया प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे.
१९७२ च्या दुष्काळानंतर सरकारने राज्यात पाण्यासाठी ७० हजार कामे केली आहेत म्हणे. याचा अर्थ प्रत्येक तालुक्यात ३०० कामे झाली. कोठे आहेत ती? एक तर ही कामे फक्त कागदावरच झाली असावीत वा जी झाली त्यांना कोणी वाली नसावा. याचा अर्थ पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, अशी सरकारची भूमिका कधीच नव्हती. त्यामुळे जे प्रश्न तेव्हा होते, तेच आजही आहेत. उद्या जलयुक्त कामांचेही असेच झाले तर फारसे नवल वाटायला नको.
-गजानन दिवाण
(उपवृत्त संपादक-लोकमत, औरंगाबाद)