खरा मतदार ओळखण्यात माध्यमांना आलेले अपयश
By Admin | Updated: November 11, 2016 00:44 IST2016-11-11T00:44:57+5:302016-11-11T00:44:57+5:30
गुजरात विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा विजयी झाल्यानंतर त्या राज्यातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि उदारमतवादी लेखकाकडे मी जेवायला गेलो असता

खरा मतदार ओळखण्यात माध्यमांना आलेले अपयश
राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
गुजरात विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा विजयी झाल्यानंतर त्या राज्यातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि उदारमतवादी लेखकाकडे मी जेवायला गेलो असता, ते लेखक मला म्हणाले, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हाच भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल असा जो प्रचार तुम्ही करीत आहात, तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा विभाजनवादी माणसाला देश कधीच स्वीकारणार नाही. त्यानंतर २०१३ मध्ये आम्ही आगामी निवडणुकीची चर्चा करताना मोदी यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता वर्तवायला सुरुवात केली, तेव्हां तेच लेखक पुन्हा फोनवर म्हणाले, तुम्ही हे थांबवा. माध्यमांनी सुरू केलेल्या प्रचाराचा तुमच्यावर पगडा पडला आहे. त्यानंतर २०१४ च्या मे महिन्यात जेव्हा मोदी प्रत्यक्षात दणदणीत मताधिक्याने पंतप्रधान झाले तेव्हा याच लेखक महाशयांनी मला संदेश पाठविला, ‘हे कसे होऊ शकते, मी जो भारत देश जाणतो त्या भारतात असे होऊच शकत नाही. मी प्रचंड निराश झालो आहे’.
२०१४ साली भारतातील अशा उदारमतवादी लोकांच्या पदरी जी निराशा पडली तसाच काहीसा प्रकार आज अमेरिकेतील उदारमतवादी लोकांच्या वाट्याला आला आहे. त्यातील असंख्य लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे निराश झाले असणार, याची मला खात्री आहे.
पण आता हे पुरेपूर स्पष्ट झाले आहे की, अमेरिकेतील निवडणूक विषयक विश्लेषक आणि पंडित यांच्यावर त्यांचेच तोंड लपविण्याची पाळी आली असणार. त्यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जीे काही भाकिते वर्तविली होती ती साफ चुकीची ठरली आहेत. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की, आम्ही माध्यमातील लोक आणि निवडणूक पंडित आपापले अंदाज व्यक्त करताना आपल्या व्यावसायिक आकलनावर व्यक्तिगत मतमतांतराचा प्रभाव टाकीत असतो का?
एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे की, दिल्लीच्या आणि वॉशिंग्टनच्याही सत्ता वर्तुळात वावरणारे
आमचे बंधू सामान्यत: उदारमतवादी आहेत. सहिष्णुता, समानता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि तत्सम तत्त्वांवर त्यांची श्रद्धा आहे व ते चुकीचेही नाही. स्वाभाविकच पत्रकार म्हणून आम्ही वाचक आणि दर्शक यांच्यावर याच दृष्टीकोनाचा प्रभाव टाकला पाहिजे. परंतु जेव्हा मोदी किंवा ट्रम्प यांच्यासारखे प्रचंड लोकप्रिय लोक पडद्यावर येतात आणि लक्षावधी लोकांवर मोहिनी टाकतात तेव्हां केवळ त्यांची मतं आणि आमची मतं जुळत नाहीत म्हणून आम्ही त्यांना नाकारू शकतो का? सत्ता वर्तुळात किंवा त्याच्या परिघाभोवती वावरणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने कधीही सर्वसामान्य माणसांची नाडी ओळखता येत नाही. भारत आणि अमेरिका हे तर महाकाय देश आहेत. पण त्यांच्या तुलनेत खूपच लहान असलेल्या इंग्लडमध्ये असाच प्रकार घडून आला. ब्रेक्झिटच्या संदर्भात दक्षिण लंडनमध्ये बसलेल्या लोकांना इग्लंडच्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मनात काय आहे, याचा अखेरपर्यंत थांगपत्ताच लागला नाही. अमेरिकेच्या परवाच्या निवडणुकीत मिशिगन आणि ओहिओ या दोन्ही राज्यांची परिस्थिती काही अंशी भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यासारखी झाली होती. भारतातील या पट्ट्यात मोदींच्या ‘अच्छे दिन’नी जी जादू केली तशाच प्रकार ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेनी केली. ट्रम्प यांच्या घोषणेमध्ये स्थलांतरितांच्या आणि मुस्लीमांच्या विरोधी स्पष्ट असा रोख होता, तरीही हे घडून आले. तरीही माध्यमांमधील एक मोठा वर्ग हे वास्तव स्वीकारायला तयारच नव्हता. अमेरिकेतील एक प्रतिष्ठित सिनेनिर्माते मायकेल मूर यांनी खरे तर गेल्या जुलै महिन्यातच ट्रम्प विजयी होतील असे भाकित वर्तविले होते. ते म्हणाले होते, ‘तुम्हाला जर असे वाटत असेल की, ट्रम्प विजयी होणार नाहीत, तर तुम्ही तुमच्या आभासी जगातून बाहेर या आणि नकारात्मक भूमिका सोडून वास्तवाचा स्वीकार करा’.
मूड यांचे म्हणणे काही नव्हते. आमच्यापैकी अनेकजण विशेषत: टेलिव्हिजनच्या जगातील लोक वातानुुकूलित खोलीत बसून आभासी जगात वावरत असतो. तथाकथित निवडणूक पंडिताना त्यांनी अगोदरच तयार करून ठेवलेली मते मांडण्यासाठी भरपूर संधी देत असतो, आणि तसे करताना, देशाच्या खेड्यापाड्यात आणि गल्लीबोळात जो खरा मतदार वावरतो त्याला साफ नजरेआड करतो. सर्वसामान्यांपासून नाळ तुटलेला व स्टुडिओत बसून भाकिते वर्तविणारा मीडिया मग केवळ आकडेवारीच्या जंजाळात आणि संगणकीय माहितीच्या जंगलात अडकून पडतो. येथे मूर यांचाच पुन्हा दाखला द्यायचा तर ते असेही म्हणाले होते की, ‘मतदारांच्या निर्णयशक्तीवर संशय व्यक्त करू नका आणि त्यांना कमी लेखून अराजक म्हणून हिणवूदेखील नका’.
निवडणूक तज्ज्ञ आणि पत्रकार यांनी नकारात्मक भूमिका घेणे कदापि योग्य नाही. अग्रलेखांची पाने किंवा स्टुडिओमधील चर्चा अथवा निवडणूक चाचण्या या आधारे चर्चा होऊ शकत असेल पण या चर्चेतून आपण खरोखरी जनतेच्या मनातील उद्रेक किंवा लाखो लोकांच्या मनातील निराशा याचा ठाव घेवू शकतो का? त्यामुळेच आपण आपल्यावरील आदर्शवादी मतांची झापडं झुगारून खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे डोळे आणि कान बनण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी वार्ताहराच्या भूमिकेत शिरून खऱ्या बातमीचा शोध घ्यायला हवा. ॉ
त्याचबरोबर हेही तितकेच खरे ट्रम्प विजयी झाले म्हणून उदारमतवादी माध्यमांना झोडून काढण्याचेही काही कारण नाही. मोदी यांचे राजकारण आणि त्यांची मते यांना प्रचंड विरोध असूनही माध्यमांनी मोदींच्या विजयाचे अचूक भाकित वर्तविले होतेच की! त्याचबरोबर समाज माध्यमांमधून जो उन्माद निर्माण केला जात असतो त्यापायी विचलित होऊन सत्य मांडण्याच्या आपल्या भूमिकेपासूनही आपण ढळता कामा नये. आपल्या उदारमतवादी दृष्टीकोनावर निवडणूक कोण जिंकतो किंवा हरतो याचा प्रभाव पडण्याचे काहीही कारण नाही. उलट ट्रम्प किंवा मोदी यांच्यासारख्या लोकांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारून आपण समाजाच्या दृष्टीने काय योग्य आणि काय अयोग्य हे जनतेला सांगितलेच पाहिजे. तीच खरी पत्रकारिता आहे.
ताजा कलम:
गेल्या महिन्यात वॉशिंग्टनमधल्या जॉर्जटाऊन विद्यापीठातील पदवीे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या मी मुलाखती घेतल्या. त्यातील बहुसंख्य हिलरी क्लिंटन यांचे पक्षपाती होते. मी ताबडतोब ट्विट केले आणि अमेरिकेतील लक्षावधी मतदार क्लिंटन यांच्या बाजूने आहेत असे म्हटले. परंतु हे ट्विट करताना मला एका गोष्टीचा सोयीस्कर विसर पडला की अमेरिकेसारखा देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक म्हणजे शाळेचा मॉनिटर निवडण्याची निवडणूक नव्हे. याचा अर्थ समाजातील अत्यंत छोट्या घटकाचा कल जाणून घेऊन इतक्या मोठ्या निवडणुकीविषयीचे भाकित वर्तविणे व्यावसायिक आरोग्यास तसे हानिकारकच असते!