काटकसर की अपयश?
By Admin | Updated: April 23, 2016 03:25 IST2016-04-23T03:25:19+5:302016-04-23T03:25:19+5:30
नाशकात सिंहस्थासाठी म्हणून केल्या गेलेल्या कामात सुमारे दोनशे कोटींचा जादा निधी वापरला गेल्याची टीका एकीकडे केली जात असताना महापालिकेतील सत्ताधारी ‘मनसे’चे नेते मा

काटकसर की अपयश?
नाशकात सिंहस्थासाठी म्हणून केल्या गेलेल्या कामात सुमारे दोनशे कोटींचा जादा निधी वापरला गेल्याची टीका एकीकडे केली जात असताना महापालिकेतील सत्ताधारी ‘मनसे’चे नेते मात्र आपण काटकसरीने काम केल्याचे सांगून ‘भाजपा’वर अडवणुकीचा आरोप करीत असल्याने झाल्या प्रकाराबद्दल सर्वांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहेच; परंतु त्याच सोबत महापालिका प्रशासनाने काटकसर केली की मंजूर कामे साकारण्यात त्यांना अपयश आले, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेला आहे.
तिकडे उज्जैनच्या कुंभमेळ्याला प्रारंभ होऊन गेला असताना इकडे नाशकातील न सरलेल्या सिंहस्थाच्या कथांनाही नव्याने फोडणी मिळून गेली आहे, आणि त्याला निमित्त ठरले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांचे विधान.
नाशकात सिंहस्थाची कामे करताना महापालिकेने काटकसर करून ६७ कोटी रुपये वाचविले; परंतु तेच पैसे राज्यातील भाजपाचे सरकार आता महापालिकेच्या अन्य कामांसाठी देत नसल्याची टीका अभ्यंकर यांनी केली आहे खरी, परंतु सरकारने विविध कामांसाठी जो निधी मंजूर केला तो महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना खर्च करता आला नसेल तर ते त्यांचे अपयश ठरावे, त्याला काटकसर कशी म्हणता येईल, असा या संदर्भातील सवाल आहे. मुळात आवाक्यापेक्षा जास्तीची कामे सुचवून महापालिकेने सिंहस्थासाठी ‘फुगवटाधारी’ आराखडा तयार केला व तो पूर्णत्वास नेता न आल्याने आता काटकसरीची भाषा केली जात आहे, असा यातील साधा सरळ अर्थ आहे जो कुणाच्याही आकलनापलीकडचा नाही. महत्त्वाचे म्हणजे, बारा वर्षांपूर्वीच्या सिंहस्थ काळात सत्तेत राहिलेल्या तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांनी तर महापालिकेने केलेल्या सर्वच सुमारे ६०० कोटींच्या कामांची ‘सीआयडी’ चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि विकासकामांच्या नावाखाली शासनाकडून सुमारे दोनशे कोटींचा जादा निधी लाटला गेल्याचीही तक्रार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधारी ‘मनसे’चे नेते काटकसरीची बतावणी करीत असतील तर ती केवळ नाशिककरांचीच नव्हे तर त्यांची स्वत:चीही फसवणूक करणारीच बाब म्हणावयास हवी.
पालकमंत्री गिरीश महाजन सुटीवर आल्यासारखे नाशकात येतात, असा आरोप करीत भाजपावरही निशाणा साधताना नाशकातील महापालिकेत सत्ता स्थापन करतेवेळी पहिल्या अडीच वर्षाच्या आवर्तनात ‘मनसे’ला भाजपाचेच पाठबळ लाभले होते हे अभ्यंकरांच्या विस्मृतीत गेले असेल; पण नाशिककर विसरलेले नाहीत. आज राजकीय वाटा वेगळ्या झाल्या म्हणून ‘मनसे’ नेत्यांनी भाजपाला पालकत्त्वाचे कर्तव्य निभावण्याचे सल्ले देणे म्हणजे, आपल्या अपयशावर पांघरूण घालण्याचाच प्रकार झाला. कारण, त्यांच्या म्हणजे भाजपाच्या कृपेमुळेच गोदावरीतील रामकुंड कोरडे पडले हे घटकाभर मान्य केले तरी, महापालिकेतील सत्ताधारी या नात्याने त्या कुंडातील झऱ्यांचे नैसर्गिक स्त्रोत उघड करण्यास ‘मनसे’चे हात कुणी धरले आहेत? तेव्हा, अभ्यंकरांचे आरोप हे निव्वळ त्यांच्या पक्षाला नाशकात सत्ता राबवताना येत असलेल्या अपयशातून आलेले आहेत, हे उघड आहे. तसे नसते तर गेल्या अवघ्या दोन महिन्यांच्याच काळात या पक्षाचे तब्बल १४ नगरसेवक त्यांना ‘रामराम’ करून अन्य पक्षांत गेले नसते. पण कामेच होत नसल्याने ही ‘गळती’ वाढली आहे. निकडीची कामे म्हणून आयुक्त गोदावरीच्या स्वच्छतेची, मलनिस्सारणाची कामे सुचवित असताना सत्ताधारी दोन दोनशे कोटींची रस्त्याची कामे मंजूर करतात ते का, हे सर्वसामान्यांनाही हल्ली कळायला लागले आहे. तेव्हा केवळ शासन आडमुठेपणाची भूमिका घेते म्हणून ओरड करण्यापेक्षा मनसेने महापालिकेतील सत्ताधारी म्हणून आपले कर्तव्य चोख बजावण्याची भूमिका घेतलेली बरी.
- किरण अग्रवाल