फडणवीस यांनी स्वबळावर खेळलेला जुगार!

By Admin | Updated: November 4, 2015 04:31 IST2015-11-04T04:31:42+5:302015-11-04T04:31:42+5:30

मैत्रीच्या अंगभूत लक्षणातला विस्मयकारक पेच असा आहे की, मित्र हा उच्च कोटीचा शत्रू होऊ शकतो. हा व्यत्यास घडतो, कारण मित्राला मित्राची सारी मर्मस्थाने आणि बलस्थाने

Fadnavis gambling on his own! | फडणवीस यांनी स्वबळावर खेळलेला जुगार!

फडणवीस यांनी स्वबळावर खेळलेला जुगार!

- नितीन नाशिककर
(राजकीय घडामोडींचे विश्लेषक)

मैत्रीच्या अंगभूत लक्षणातला विस्मयकारक पेच असा आहे की, मित्र हा उच्च कोटीचा शत्रू होऊ शकतो. हा व्यत्यास घडतो, कारण मित्राला मित्राची सारी मर्मस्थाने आणि बलस्थाने अवगत असतात. कोणते प्रहार घायाळ करतील आणि कोणत्या दूषणांनी भडका उडेल याचे अचूक अंदाज केवळ मित्रालाच असू शकतात. शिवसेना भाजपात एकमेकाना ओरबाडण्याच्या आणि बोचकारण्याच्या उद्योगांनी याचे स्मरण दिले.
बाळासाहेबांनंतरची सेना आणि महाजनांनंतरची भाजपा यांची दिलजमाई होत नाहीे. अन्यथा कल्याण-डोंबिवलीचा आवाका तो काय आणि जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला त्याचे महत्व ते काय? पण इतपतच विचार करून चालणार नाही. बिहारच्या निवडणुकीचे कल जसजसे भाजपाविरुद्ध झुकू लागले तसतशी सेनेने उचल खाल्ली. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्या स्तरावर मुळात सेनेचे तडजोड मूल्यापलीकडे फारसे महत्व नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सेनेचे उपयोगिता मूल्य कमी केले. कोल्हापूर आणि कडोंमपा यांच्या निवडणुकीसाठी सेनेच्या उपद्रवमूल्याची चाचपणी केली. मोठा/छोटा भाऊ हे भाबड्या गणंगांना ठीक. सेनेचे उपयोगितामूल्य संपलेले आहे, याची हिशेबी आरोळी खडसे यांनी मारली. कारण त्यांना सेनेशिवायचा मुख्यमंत्री असा स्व-दबदबा निर्माण करायचा होता. हा अवकाश पकडणारे गडकरी पहिले, जसे मुंडेंनी एकमेव सेनामित्र या बिरुदाचा गवगवा करून भाजपांतर्गत सगळे निगोशिएट केले.
लोकसभेला मोदींना आपल्या रस्त्यात काहीही धोका नको होता. अर्थात याचा फायदा शिवसेनेला झालाच. त्यांचे कधी नव्हे इतके खासदार (म्हणजे यापूर्वी आणि कदाचित यानंतरही) निवडून आले. गडकरी दिल्लीला हलले, तसे लगबगीने खडसेंनी तो अवकाश गाठला. सेनेवर वार करायचा सपाटा लावला. खडसेंच्या या चालीला भाजपात फारसा विरोध होत नाही, हे सेनेच्या लक्षात आले. ती एकदम सावध झाली. मुळात सेनेच्या नेतृत्वावर कडवेपणाचे, मराठी बाण्याचे अवजड ओझे. ते ओझे त्यांना मुत्सद्देगिरी करू देईना. पुन्हा सोस उपद्रवमूल्याचा. बाळासाहेबांचे सर्वंकष परीघ चाणाक्षपणे सांभाळीत सेनेला एकटे ठेवण्याचे तंत्र कुठे शिकले कोण? बाळासाहेबांसाठी कोणतेही बालंट स्वत:च्या अंगावर घेणारी दुसरी फळी काही उद्धव यांच्या नशिबी नाही. उलट त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवणारे दुय्यम नेतृत्व आहे. राजकारणात सर्वोच्च नेत्यानेच तोफ डागली की उरलेले शून्य होतात, हे नेत्याच्या मुळाशी येणारे ठरते. इथे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्थान (गादी नव्हे) घेण्याची संधी सोडली.
मोदी-उद्धव ठाकरे समीकरण काही घाईच्या मुत्सद्यांनी असेच नासवले. खरे तर मोदींमधल्या नेत्याला उद्धव यांचे महत्व होते. पण आत्महत्त्या थांबविण्याइतके ते नि:संग नाहीत. भाजपाची सत्ता आली. खडसेंना प्रदेशाध्यक्षपद नाकारण्याच्या कृतीचे स्मरण होतेच. फडणवीस हे नाव पुढे येण्यात भाजपांतर्गत बाशिंगभौंसाठी असंख्य गणिते आणि संदेश होते. फडणवीसांनी नाराज खडसे, चिडलेली सेना, कोलमडलेली मनसे, पवारांचे मोदी जवळिकीचे विलक्षण पेच या सगळ्या पटावर आपण बसलो आहोत हे जाणले. मोदी-शहांचा नि:संदिग्ध पाठिंबा हे त्यांचे बलस्थान. अर्थात त्याच्या जोडीला निष्कलंक प्रतिमा आणि वय हा एक मोठ्ठा प्लसपॉइंट त्यांच्या खिशात होताच. त्यांनी अत्यंत फुरसतीने पण निश्चितपणे सारे जुळवून आणायला सुरुवात केली. राष्ट्रवादी दारात उभी होती. दार उघडा असा मागच्या दारून निरोपही होता. पण त्यांनी ते दार फक्त किलकिले करून ठेवले. पूर्ण उघडले नाही आणि धाडकन बंदही केले नाही. त्यांना आपले प्रतीमास्थान ढळू द्यायचे नव्हते. सेनेचा अस्थिर लंबक त्यांनी उद्धव ठाकरेंचा सन्मान, सेना सरदारांची सत्ताकांक्षा यात झुलवत ठेवला. भाजपातल्या महत्वाकांक्षा चेपायला शहाणा बांबू होताच. हळूहळू सगळे स्थिरावले. फडणवीसांनी उद्धव यांचे चांगुलपण अव्हेरले नाही. पण हे गाडे त्या दोघांच्या मिळून करण्याच्या राजकारणाच्या दीर्घकालीन वाटेवर मात्र रुतून बसले.
कडोंमपा आणि कोल्हापूरची निवडणूक आली. युती तुटली. फडणवीसांनी एक विलक्षण चाल केली. युती तुटली म्हणून जोरजोरात वाद्ये वाजवणारे भाजपातले काही वादक त्यांनी या प्रचारातून बाजूला ठेवले. सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. कारण औरंगाबाद,वाशी आणि आधीच्या इतर निवडणुकीत त्यांचीच मिरवणूक काढणारे, त्यांना नको होते. त्यांनी खेळलेला हा एक जुगार होता. पण धोकादायक असला तरी पक्षाच्या बांधणीवर पकड निर्माण करण्यासाठी तो अत्यावश्यक होता. कोल्हापूर त्यांनी मुद्दामच सेनेच्या युतीचे समर्थक चंद्रकांतदादांवर सोपवले. ते पालकमंत्री असल्याने सोयीचे होतेही. तिथला सामना सेनेच्या नकाशावर नव्हता. कडोंमपाचे राजकारण मात्र थेट मुंबईच्या राजकारणाशी आणि म्हणूनच सेनेच्या बालेकिल्लाशी निगडीत होते. त्यामुळे सेना तिथे कडवा प्रचार करणार हे पक्के होतेच. त्यात तिथे अजून एक भिडू होता मनसे. त्याचेही भविष्य मुंबईशी जोडलेले. एका स्थानिक तेही क दर्जाच्या महापालिकेच्या निवडणुकीत मोदींवर प्रहार केले की भाजपाचे राज्यातले धुरीण चवताळून अंगावर येतील अशा अपेक्षित धोरणात मनसे आणि सेना दोघे अडकले. फडणवीसांनी भाजपातल्या वाचाळांना यातून दूर ठेवले. स्वत: कडोंमपाच्या रणधुमाळीत उतरले आणि एकाच वेळी मनसे आणि सेना दोघांनाही अंगावर घेतले. असे यापूर्वी कधीही घडलेले नाही. अगदी दबंग गडकरींनी सुद्धा हे डेअरिंग केलेले नाही. त्यातही मनसेशी झगडा मु्द्यापुरता आणि सेनेशी मात्र भावनेचा असा फरक केला. राज ठाकरेंचे सेनेवरचे हल्ले हे भाजपाला गरजेचे होते आणि मोदींवरचे वाग्बाण संदर्भहीन. फडणवीसांनी राज यांचे नाशिक श्रेय हिरावून घेतलेच, पण सेनेला भावनिक भाषेत घायाळ केले. हे धोरणाचे पाऊल आहे. परिणामत:उद्धव यांना दोन आघाड्यांवर लढावे लागले. शिंदेनी राजीनामा देणे आणि उद्धव यांनी तो नाकारणे हा खेळ तर अगदीच प्राथमिक.
या निवडणुकीने आगामी राजकारणाचे रस्ते अरुंद केले आहेत. तरीही सेनेचे राजकीय लवचिकपण आणि उपद्रवमूल्य दोन्ही कमी होणे, दीर्घकालीन वाटचालीसाठी धोक्याचे आहे. राज्यातल्या सत्ता समतोलाचे तोल त्यातून ढळू शकतात. शत्रू मित्राच्या रंजक गोष्टीची अजून काही पाने शिल्लक आहेत हे नक्की.

Web Title: Fadnavis gambling on his own!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.