विस्तार : मंत्रिमंडळाचा आणि आव्हानांचाही
By Admin | Updated: July 11, 2016 03:59 IST2016-07-11T03:59:20+5:302016-07-11T03:59:20+5:30
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत.

विस्तार : मंत्रिमंडळाचा आणि आव्हानांचाही
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत. या मंत्रिमंडळात तरुणांचा भरणा आहे. तरुण नेतृत्व उत्साही असते पण ते उत्साहाची सीमा ओलांडून अतिउत्साहात गेले की चुका घडतात. सरकारचे काम धडाक्याने करण्यास त्यांचे योगदान अपेक्षित असून उत्साहाच्या भरात अपरिपक्वतेतून होणाऱ्या चुकांचे समर्थन कोणीही करणार नाही.
नव्या मंत्र्यांपैकी फार थोडे असे आहेत की जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. महादेव जानकर, सदाभाऊ खोत पहिल्यांदाच विधान परिषदेत आले असले तरी त्यांना सार्वजनिक जीवनाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नवखेपणाची सबब त्यांनाही सांगता येणार नाही.
भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू अशी की, मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रा.राम शिंदे ही या उत्साही मंत्र्यांची फौज आहे व भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट अशा अनुभवी नेत्यांची त्यांना साथ आहे. सत्तेने यांच्यापैकी कोणाला बिघडविले नाही तर राज्याच्या हिताचे अनेक निर्णय होऊ शकतील. सत्ता अनेकांना बिघडवते आणि त्यातून संघर्षाला सुरुवात होते. यापूर्वीचे युती आणि आघाडीचे सरकारही त्याला अपवाद नव्हते. आधीपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचे आव्हान या सगळ्यांसमोर आहे. आपला नेता मंत्री झाला म्हणजे चेलेचपाटे, दलाल आणि कंत्राटदार एकदम सक्रीय होऊन थेट मंत्र्यांच्या दालनाचा ताबा घेतात. तिथे त्यांची उठबैस वाढते मग ते मंत्र्यांच्या पीए, पीएसशी सूत जुळवून कामे करवून आणतात. काही जुन्या मंत्र्यांकडे असे काही लोक अजूनही घिरट्या घालत असतात. नवीन मंत्र्यांनी अशांना आवरले तर ते त्यांच्या राजकीय हिताचे राहील. मराठवाड्याचे भाजपांतर्गत राजकारण अनेक वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती फिरले. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांपलीकडे भाजपा गेली नाही. आज शिवसेनेने मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष मराठवाड्यात केंद्रीत केले आहे. मुंडेंचे अकाली निधन आणि शिवसेनेचा धडाका या पार्श्वभूमीवर, मराठवाड्यात भाजपा वाढवायची तर काय काय करावे लागेल याचा विचार भाजपात प्रामुख्याने होत असून संभाजी पाटील निलंगेकर यांचे मंत्री होणे हा त्याचाच एक भाग आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणाची पुढील दिशा ओळखून निलंगेकर, रावसाहेब दानवे यांच्याशी जुळवून घेतले नाही तर त्या अधिक एकट्या पडतील.
मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठा संदेश असा दिला की ते स्वत: भाजपात गटातटाचे राजकारण करणार नाहीत. सुभाष देशमुख, संभाजी पाटील, मदन येरावार या कट्टर गडकरी समर्थकांना मंत्रिपद देणे ही त्यांची अपरिहार्यता होती असे मानले तरी गटबाजी पलीकडे भाजपा आणि सरकारचा विचार करणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा या निमित्ताने उजळली आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदाच्या प्रवासात फडणवीस स्वत:चा गट निर्माण करण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. तो त्यांचा स्वभावदेखील नाही. अमूक कोणी गटबाजी करीत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केलीच तर गोबऱ्या गालाने स्मित करण्यापलीकडे ते फारसा प्रतिसादही देत नाहीत. ते स्वत: मुंडे गटाचे असून गडकरी विरोधक आहेत अशी एक प्रतिमा निर्माण झाली होती. आता मुंडे नसताना आणि गडकरी हे अत्यंत प्रभावी झालेले असताना जुन्याच प्रतिमेत राहणे राजकीयदृष्टया सोईचे नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असणार. त्यामुळेदेखील गटनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक बनण्यावर त्यांनी भर दिला आहे. परवाचा विस्तार याचीच प्रचिती देणारा होता. सर्वमान्य असा अटलबिहारी वाजपेयींनंतर दुसरा नेता भाजपामध्ये दिसत नाही. ही पोकळी भरून काढण्याची वाटचाल फडणवीस यांनी सुरू केली आहे. फडणवीस हे ‘वाजपेयी इन मेकींग’ आहेत, असे आज कोणी म्हटले तर त्यांची जरा जास्तच प्रशंसा केल्याची टीका होऊ शकते पण उद्याचे वास्तव तेच असेल.
- यदू जोशी