पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे राहुल गांधी यांस अनावृत पत्र
By Admin | Updated: March 9, 2015 23:13 IST2015-03-09T23:13:43+5:302015-03-09T23:13:43+5:30
माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला तुमच्याशी संपर्क साधण्याचा कदाचित हे खुले पत्र हाच एकमात्र चांगला मार्ग असावा. कारण १२, तुघलक लेनचे दरवाजे बंद केले

पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे राहुल गांधी यांस अनावृत पत्र
प्रिय राहुल,
माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला तुमच्याशी संपर्क साधण्याचा कदाचित हे खुले पत्र हाच एकमात्र चांगला मार्ग असावा. कारण १२, तुघलक लेनचे दरवाजे बंद केले गेले आहेत आणि ईमेल, एसएमएस वा दूरध्वनीवर प्रत्युत्तर मिळेनासे झाले आहे. जी काही कुजबुज कानी येते, तिच्यावरून वरिष्ठ कॉँग्रेस नेत्यांसाठीदेखील हे दरवाजे बंदच आहेत. त्यामानाने मी बरा म्हणायचा.
तुम्हाला खुले पत्र लिहिण्यामागचा माझा उद्देश, संसदेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनाआधीच तुम्ही घेतलेल्या रजेवरून निर्माण झालेल्या वादात थोडीशी भर घालण्याचा आहे. कॉँग्रेसमधल्याच काही निष्ठावंतांनी मला सांगितल्याप्रमाणे, ही सुट्टी वगैरे काही नसून, त्यामागे तुमचा प्रामाणिक हेतू आत्मचिंतनाचा आणि पक्षाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचा आहे. जयराम रमेश यांनी तर एका मुलाखतीत सांगूनच टाकले की, आता तुम्हाला राहुल गांधी सक्रिय, उत्साही आणि संपर्कशील दिसतील. ते ऐकून बरं वाटलं. ताजातवाना राजकारणी बघणे कुणाला आवडणार नाही बरं? तुम्ही तुमच्या आधीच्या चुकांपासून काही शिकला असाल तर तुम्हाला संधी दिलीच पाहिजे. तरीही तब्बल २६ वर्षांच्या राजकीय पत्रकारितेनंतर याबाबतीत माझ्या मनात शंका राहणारच. कॉँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेच्या बातम्या असोत वा तुम्ही नव्या रूपात पुनरागमन करण्याच्या बातम्या असोत, या बातम्या आपण याआधीही कधीतरी ऐकलेल्या तर नाहीत ना, अशी शंका जरूर येते. २०१२ साली उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाल्यानंतरही असेच एक आश्वासन देताना, तुम्ही तुमच्याच कर्मभूमीत पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार होता. प्रत्यक्षात तुम्ही अमेठीवरून लक्ष काढून घेतले व स्वत:ला अमेठीपासून अलग करून घेतले.
साधारण वर्षभराने म्हणजे डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा कॉँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्याची भाषा केली होती. ‘तुम्ही काँग्रेस पक्षाला कल्पनेच्याही पलीकडे बदललेले बघाल’, हे तुमचे तेव्हाचे वाक्य आणि महिनाभराच्या अंतराने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तालकटोरा स्टेडियममधील अधिवेशनात तुम्ही केलेले प्रभावी भाषण यामुळे पक्षात खालपासून वरपर्यंत उत्साह निर्माण झाला होता. पण नंतरच्या काळात त्याची प्रचिती आली नाही. मोदींच्या प्रभावासमोर तुम्ही सातत्याने मागेच पडत गेलात.
गेल्या नऊ महिन्यात तुम्ही कोणताही एखादा प्रभावी मुद्दा हाती घेऊन विरोधी पक्षाला हादरवून सोडताना दिसला नाहीत. मोदी सरकारने त्यासाठी संधी दिलीच नाही, असे अजिबात नाही. भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर सतत घाला घालणारी संघ परिवाराची विधाने निश्चितच तुमच्याकरवी राष्ट्रीय स्तरावर वादाचे मोहोळ उठविण्यासाठी पुरेशी होती. तुमचा पक्ष या संदर्भात सतत पंतप्रधानांवर मौन राहण्याचा आरोप करतो, पण त्यापेक्षा अधिकचे मौन तुम्हीसुद्धा पत्करले आहे. भूमी अधिग्रहण कायदा हा आजचा अत्यंत ज्वलंत राजकीय मुद्दा आहे. उजव्यांपासून डाव्यापर्यंत असे सगळेच राजकीय पक्ष या कायद्याच्या विरोधात उभे राहिले आहेत. पण तुम्ही मात्र दिसेनासे झाला आहात. तुमच्या पक्षानेही जंतरमंतरवर निदर्शने केली, पण नेते अनुपस्थितच राहिले. ही बाब एकच सुचवते की तुमच्या पक्षातच महत्त्वाकांक्षेचा अभाव निर्माण झाला आहे. २०११साली भट्टा परसौल येथे तुम्ही केलेली निदर्शने म्हणजे तुमचे आजवरचे सर्वाधिक लक्षणीय आंदोलन ! तुमच्या या बुजरेपणाची तुलना मी फक्त आपचे नेते आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी करू शकतो. तुमच्यासारखाच पराभव केजरीवालांनी लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी समोर अनुभवला होता. पण या पराभवाने ते डगमगले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याबद्दल सार्वजनिकरीत्या माफी मागण्याचे धारिष्ट्य दाखवले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, जेव्हा तुम्ही बंद दाराआड आत्मचिंतनात मग्न होतात आणि भाजपा नेते न्यूयॉर्कते सिडनीपर्यंत फेऱ्या मारत होते, तेव्हा केजरीवाल दिल्लीच्या मोहल्ल्यात आणि कॉलन्यांमध्ये प्रचार करत होते. ते त्यांच्यासाठीही सोपे नव्हतेच. पण राजकारणात ‘शॉर्टकट’ नसतात. केजरीवाल यांच्यासाठी स्थिती ‘करो या मरो’ यासारखीच होती व त्यांनी लढण्याला प्राधान्य दिले. मतदारांनीदेखील त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण ज्यावेळी तुम्ही रोड शो करण्याचे ठरवले तेव्हा उशीर झाला होता आणि तितके ते पुरेसेही नव्हते. कॉँग्रेस आता एका निर्णायक क्षणापर्यंत पोहोचली आहे. भाजपा मध्यमवर्गीयांना आकर्षित करते आहे तर अल्पउत्पन्न गटांवर आपची मोहिनी आहे. देशभरातील प्रादेशिक पक्ष त्यांच्या पारंपरिक मतदारांना सांभाळून आहेत. अशा काळात तुम्हाला नव्या पिढीतल्या मतदारांना खेचून घेऊ शकेल, असा प्रभावी कार्यक्रम द्यावा लागणार आहे. जर तसे झाले नाही तर कदाचित राजकारणातली ती तुमची अखेरची संधी असेल.
२०११ साली तुम्ही भ्रष्टाचारविरोधी आंदोलकांपर्यंत पोहोचू शकला असता, २०१२ साली निर्भया प्रकरणात झालेल्या आंदोलनात तुम्ही सहभागी होऊ शकला असता, पण यापैकी काहीच केले नाही. २०१३ साली पक्षाचे नेतृत्व करण्यापेक्षा तुम्ही सत्तेपासून दूर राहण्याचे संकेत दिले. आणि आता २०१५ साली तुम्ही गोंधळात पाडणारे संकेत देत आहा. राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिल्यानंतरच यश प्राप्त होत असते, ही शिकवण तुम्हाला तुमच्या आजी आणि आईपासून मिळायला काहीच हरकत नाही.
ताजा कलम : माझ्या मुलीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा सुरू आहे. पण तिला हे ठाऊक आहे की, या स्पर्धात्मक जगात यश मिळवण्यासाठी केवळ कष्टच करावे लागतात. भारतासारख्या देशातील तरुण पिढीला आत्मचिंतनाचे आणि रजेवर जाण्याचेही सुख घेता येत नाही.