अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:51 AM2021-05-04T00:51:13+5:302021-05-04T00:54:33+5:30

महागडी इंजेक्शन्स नि औषधं न देताही जामखेडसारख्या खेडेगावात पाचेक हजार कोरोनाग्रस्तांवर उपचार केले, मोजके वगळता सारे बचावले!

Experience says, don't be afraid of Kovid or corona dr. arole | अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका !

अनुभवाने सांगतो, कोविडला घाबरू नका !

googlenewsNext
ठळक मुद्देआम्ही काही जगावेगळे उपचार केले नाहीत. आयसीएमआर आणि नंतर एम्सने ज्या गाईडलाईन दिल्या त्यानुसारच आम्ही उपचारप्रणाली ठरवली. प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार बदल केले.

डॉ. रविंद्र आरोळे

कोविडच्या नव्या लाटेने घाबरून लोक नव्या नव्या चक्रात अडकताहेत आणि भीतीचं सावट गडद होताना दिसतंय. प्रत्येक पेशंटबाबतीत तितकं घाबरण्यासारखं काही नाही हे वर्षभर आम्ही जी प्रणाली वापरतो आहोत, त्या अनुभवातून बोलतो आहे. जामखेडसारख्या लहानशा गावी आमचं हॉस्पिटल आहे. कुठल्याही महागड्या तपासणीच्या सोयी नि सुविधा तिथं नाहीत. रुग्णही सगळे खेडेगावातून येणारे, गरीब किंवा मध्यमवर्गीय.  त्यामुळं जरा लक्षणं दिसली की  दवाखाना गाठावा असं त्यांच्याकडून होत नाही.  म्हणजे अर्ली डिटेक्शन हा कुठल्याही आजारावरचा उपाय इथं लागू होण्याची शक्यताच नाही. मागच्या वर्षी एप्रिलपासून कोविडच्या केसेस वाढत गेल्यावर आम्हालाही रुग्णाची व आजाराची स्थिती पाहून निर्णय घ्यावे लागले.  जरूर पडते तिथंच चाचण्यांची संख्या वाढवायची नि पेशंटच्या आजाराचं स्वरूप नीट समजून घेऊन एक उपचारपद्धत निश्‍चित करायची हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. वर्षभरात जवळपास पाच हजार कोरोनाग्रस्तांवर आम्ही उपचार केले. महागडी इंजेक्शन्स नि औषधं न देताही मोजके पेशंट वगळता सगळेच बरे झाले याचा आनंद वाटतो.

आम्ही काही जगावेगळे उपचार केले नाहीत. आयसीएमआर आणि नंतर एम्सने ज्या गाईडलाईन दिल्या त्यानुसारच आम्ही उपचारप्रणाली ठरवली. प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार बदल केले.  रॅपिड अँटिजेन किंवा आरटीपीसीआर या तपासण्या करवून घेतो. रुग्णांच्या तक्रारीचं स्वरूप, लक्षणं, रक्ताचे नमुने यावरून उपचारपद्धत ठरवतो. आधुनिक तपासणी यंत्रणांचा या भागात अभाव आहे. शिवाय शहरात तातडीनं एचआरसीटी वगैरे चाचण्या करवून घेतात त्याची गरज अगदी पाच टक्के रुग्णांसाठी असते.  हे निष्कारण खर्च आम्ही टाळतो. रुग्णांच्या आजाराची लक्षणं प्रबळ नसतील तर प्रथिनयुक्त आहार, विश्रांती वगैरे सल्ला देतो. जरूरीपुरती औषधं  म्हणजे, समजा डोकेदुखी आहे तर त्यावर, पोट बिघडलं आहे तर त्यावर. व्हायरल लोड वाढला की फुप्फुसांना सूज येणं, दाह होणं व त्यातून श्‍वसनाला त्रास होणं घडतं. त्यावेळी पूरक ऑक्सिजन थेरपी करून रुग्णांना आराम देणं ही  प्राथमिकता असते. त्यातून रुग्णांची स्थिती आवाक्यात येते असा अनुभव आहे. 

नातेवाइकांच्या आग्रहांचे मोजके अपवाद वगळता आमचे रुग्ण रेमिडेसिविर दिल्यावाचून बरे झाले आहेत. फुप्फुसांचं इन्फ्लेमेशन कमी करणारी अन्य औषधं बाजारात उपलब्ध आहेत, तीच आम्ही वापरली.  रुग्णांची लक्षणं व तीव्रता पाहून आम्ही त्यानुसार उपचारांचा प्रोटोकॉल ठरवत आलो आहोत. हे उपचार करताना नाममात्र खर्च रुग्णांना करावा लागतो. याचं कारण आमचं हॉस्पिटल धर्मादाय पद्धतीनं चालवलं जातं. जामखेड व आसपासचे लोक, स्थानिक प्रशासन, आरोग्य खातं नि आमदारांबरोबर वेळोवेळी बैठका होऊन सद्य    :स्थिती व आरोग्य सुविधांचं नियोजन होत असतं. रुग्ण बरे होणं हे या सगळ्या व्यवस्थेचं यश आहे.

नव्या नव्या ‘क्रेझ’ला बळी पडण्याचा भारतीयांचा स्वभावच आहे बहुदा. ‘एन ९५’ मास्क, वाफ घेणं याचा अतिरेक झाला. नंतर रेमडेसिविर या ‘संजीवनी’चं ‘फॅड’ आलं नि आता कोविड ओळखण्यासाठी सीटी स्कॅनचं. सीटी स्कोअर बघून, एकमेकांना सांगणारी माणसं आणखी घाबरायला लागली. मनोधैर्य खच्ची होण्यानं रुग्णांचं नुकसान अधिक होतं. माणसांमधल्या नव्या खुळांना उत्तेजन देऊ नका हे मी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना आवर्जून सांगतो. रेमडेसिविरचा जितका गाजावाजा झाला तितका विलक्षण परिणाम जगभरच्या अभ्यासात दिसून आलेला नाही. आपलं आरोग्य मंत्रालयही हे इंजेक्शन ‘मस्ट’ आहे असं सांगत नाही. आमच्या ग्रामीण भागातल्या पेशंट्सना ते किंवा त्याहून महागडे ड्रग वापरणं परवडणारंही नसतं.
कोविडबाबतीत सलग वर्षभर काम करून  जगभरातल्या संशोधकांच्या लक्षात काही गोष्टी आल्या, त्यानुसार ८० टक्के रुग्ण अतिशय सौम्य लक्षणं असणारे आहेत. त्यांचं विलगीकरण केलं नि सौम्य अँटिबायोटिक्स  दिले की ते बरे होतात. काही ठिकाणी अँटी व्हायरल दिले जातात. त्यातून हे पेशंट गंभीर स्थितीत जात नाहीत. उरलेल्या २० टक्के पेशंट्सना हॉस्पिटलाइज करावं लागतं. या वीसपैकी पंधरांना ऑक्सिजन थेरपी लागते, सेकंडरी इन्फेक्शन्सवर काही माईल्ड अँटिबायोटिक्स लागतात. उरलेल्या पाच टक्क्यांची स्थिती थोडी काळजीची असते. त्यांच्यापैकी काहींना बायपॅप किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते. औषधं जास्त लागतात, पण अशा पेशंट्सनाही आम्ही रेमडेसिविर वापरलेलं नाही. पेशंट्सच्या नातेवाइकांची फारच इच्छा असेल व त्यांनी आणून दिलं म्हणून आम्ही इंजेक्शन दिलं आहे व काही रुग्ण ते देऊनही गमावले आहेत.

कोविडमुळं फुप्फुस बाधित होतं नि ऑक्सिजन शोषायची शरीराची क्षमता मंदावते.  हे दमा, फुप्फुसासंबंधीचे आजार असण्यातूनही होतंच. पेशंट जास्तच अस्वस्थ झाला तर सीटी स्कोअर बघायची गरज पडते. उजव्या फुप्फुसाचे अपर, मिडल आणि लोअर असे तीन भाग असतात. ती हृदयासाठीचीही जागा असल्याने डावं फुप्फुस थोडं छोटं असतं. त्याला फक्त अपर आणि लोअर असे दोन लोब्ज असतात. यातील प्रत्येक भागाला पाच मार्क दिलेले असतात. रेडिओलॉजिस्ट संसर्ग प्रमाण ठरवतात व पाचही गोष्टींमधील संसर्गाची बेरीज म्हणजे हा स्कोअर देतात. ‘एचआरसीटी’चा स्कोअर शास्त्रीयदृष्ट्या माणूस कोविड पॉझिटिव्ह आहे का हे ठरवण्यासाठी नाही. त्यावरून ट्रीटमेंट प्रोटोकॉल बदलत नसतो. कोविडबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर तीन ते पाच दिवसांत कधीही लक्षणं दिसू शकतात. कधीकधी ती दिसतही नाहीत. प्रत्येक कोविडबाधित माणसाला ताप येतो, तोंडाची चव जातेच असं नाही. मात्र खोकला, खवखव बराच काळ जाणवत असेल तर तपासणी करून घेणं केव्हाही चांगलं. कोविडमध्ये फुप्फुसं मोठ्या प्रमाणात बाधित झाली असतील तर ती पूर्ववत होण्यासाठी चार महिन्यांचा काळही जाऊ शकतो. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन घेऊन आठवडाभरात ताप आला तरी न घाबरता तपासणी करावी, लपवू नये, अंगावर काढू नये. नुकत्याच आलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे की भारतीय लस ही दर्जाने उत्कृष्ट व परिणामकारक आहे. ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांच्या बाबतीत कोविडचा मृत्यूदर ०.०००३ टक्के इतका  अत्यल्प आहे.  कुटुंब व मित्रमंडळींचं ‘भावनिक शिल्ड’ पेशंट बरा होण्यासाठी प्रभावी ठरतं याचा विसर मुळीच पडू देऊ नये.

(लेखक ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड जि. अहमदनगर येथील संचालक आहेत)

Web Title: Experience says, don't be afraid of Kovid or corona dr. arole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.