मुलांचं फाजील कौतुक? नक्की वाया जातील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:24 AM2021-10-18T05:24:12+5:302021-10-18T05:25:30+5:30

मुलांना मारणं,  रागावणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम घडवून आणतं हे अनेकांना पटायला लागलं.पण खरंच, मुलांचं वारेमाप कौतुक केल्यानं त्याचा फायदा होतो?

Excessive appreciation of children will harm them | मुलांचं फाजील कौतुक? नक्की वाया जातील!

मुलांचं फाजील कौतुक? नक्की वाया जातील!

Next

तुम्ही तुमच्या मुलांचं किती कौतुक करता? त्यांना घालून-पाडून बोलता? त्यांच्याशी अरेरावी करता? काही चुकलं तर त्यांना बुकलून काढता? एक काळ असा होता, पालक असो, शिक्षक असो, नातेवाईक, शेजारीपाजारी असो, या सर्वांसाठी (कोणाचीही) मुलं म्हणजे हात ‘साफ’ करून घेण्याचं एक साधन होतं. मुलांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या, त्यांच्याबद्दल शाळेतून, बाहेरुन काही तक्रारी आल्या किंवा तंबाखू, सिगरेटसारखी व्यसनं करताना मुलं दिसली, तरीही यांच्यापैकी कोणीही, केव्हाही, कधीही त्यांच्यावर ‘पट्टा’ चालवायला कमी करत नसे. पालकांचीही त्याला मान्यताच होती. पोरगं ‘वाया’ जाताना दिसलं, तर त्याला भर रस्त्यात झोडून काढा,, अशी अलिखित परवानगीच असायची. हळूहळू काळ बदलला. आता मुलांना मारणं तर दूरच, पण त्यांना रागावणंही ‘पाप’ आणि ‘गुन्हा’ झालाय. मुलांना मारणं,  रागावणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम घडवून आणतं हे अनेकांना पटायला लागलं.पण खरंच, मुलांचं वारेमाप कौतुक केल्यानं त्याचा फायदा होतो?  चुकीच्या गोष्टी मुलं सोडून देतात? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्हीही आहे. काही मुलांवर त्याचा खरंच सकारात्मक परिणाम होईल, तर काही मुलं त्यामुळे बिघडतील, वाया जातील, असं  संशोधकांचं म्हणणं आहे.

यासंदर्भात ब्रिटनमध्ये नुकताच एक व्यापक अभ्यास झाला. ब्रिटनमधील एक्स्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तब्बल ४५०० मुलांवर संशोधन केलं आणि निष्कर्ष काढला, की कौतुक केल्यानं मुलं सुधारतीलच असं नाही, पण ती बिघडूही शकतात. त्यामुळे मुलांनी चांगल्या गोष्टी केल्यास कौतुक करता, तसंच त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या, तर त्यांना अधूनमधून रागावतही जा. नाहीतर आपण काहीही केलं, तरी ते ‘बरोबर’च आहे, किंवा कौतुक पदरात पाडून घेणं आपला हक्कच आहे, असं त्यांना वाटायला लागतं आणि त्यांच्यावर  नकारात्मक परिणाम व्हायला लागतो.

या संशोधनातला आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे ज्या मुलांवर, पालकांवर हे संशोधन झालं, त्यातल्या ८५ टक्के पालकांना हे माहीतच नव्हतं, की कौतुकानंही मुलं बिघडतात! संशोधकांच्या निष्कर्षानंतर अनेक पालकांनी सांगितलं, की आता आमचे डोळे उघडले आहेत! कायमस्वरूपी कौतुक हे आपल्या मुलांच्या हिताचंच असतं असं नाही, हे आम्हाला आता पटलं आहे.

संशोधकांनी या मुलांवर ‘प्रयोग’ करताना त्यांना सर्व तऱ्हेची वागणूक दिली. कौतुक केलं, तसं काहींना काही वेळा रागावलंही.  कौतुकाचा सुरुवातीला मुलांना फायदा झाला, पण अति कौतुकामुळे उलट त्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम झाला. त्यांची शैक्षणिक प्रगती तर खालावलीच, पण ती अधिक बेजबाबदारही झाली, कारण आपल्या चुकांची जबाबदारीही या मुलांनी कायम दुसऱ्यांवरच टाकली. या मुलांना वाईट सवयी आणि व्यसनं लागण्याची शक्यता अधिक असते, असंही संशोधकांचं निरीक्षण आहे.

जगभरात पूर्वापर चालत आलेल्या संस्कृतीत मुलांवर प्रेम करा, त्यांचे लाड करा, पण एका मर्यादेत. अति लाडानं मुलं बिघडतील, यावर पालकांचा जाम विश्वास होता. त्यामुळे बऱ्याचदा कौतुकही ते हातचं राखूनच करीत.. मुलांचं योग्य वेळी योग्य ते कौतुक केलंच, पाहिजे, पण ‘अति लाडानं’ मुलं बिघडतात, शेफारतात, यावर नव्या संशोधनानंही आता प्रकाश टाकला आहे. कारण अति कौतुकानं मुलांमधला इगो वाढतो, ती स्वत:ला ‘ग्रेट’ समजायला लागतात आणि अति-आत्मविश्वासाची  बळी ठरतात, असं या पाहणीतून आढळून आलं आहे.

मुलांशी कसं वागावं याबाबत संशोधकांनी पालकांना काही टिप्सही दिल्या आहेत.
१) मुलांना कायमच पालकांच्या पाठिंब्याची आणि प्रेरणेची गरज असते, त्यामुळे त्यांनी जेव्हा एखादी चांगली गोष्ट केली, तेव्हाच फक्त त्यांचं कौतुक करू नका. मुख्य म्हणजे ते बढा चढा के तर मुळीच करू नका. २) अविवेकी स्तुतीमुळे वाईट भावना निर्माण होऊ शकतात. ३) मुलांची स्तुती जरूर करा, पण ती अवाजवी होत नाही ना, याकडेही लक्ष द्या. ४) ज्या गोष्टी अगदी सहजसाध्य आहेत, अशा गोष्टींसाठीही मुलांचं कौतुक करू नका. ५) मुलांचं प्रत्येक वेळी, लहानसहान गोष्टींतही कौतुक केलं, तर त्यांचं मोटिव्हेशन उलट कमी होईल हे लक्षात घ्या. ६) इतर मुलांपेक्षा तू जास्त हुशार आहेस, असं तुलनात्मक कौतुक टाळा.

टेनिस स्टार एमाच्या यशाचं रहस्य!
प्रमुख संशोधक एलियट मेजर यासंर्भात ब्रिटिश टेनिस स्टार एमा राडूकानूचं उदाहरण देतात. त्यांच्या मते जास्त कौतुकाचा धोका तरुण वयात जास्त असतो. १८ वर्षीय एमानं नुकतंच यूएस ओपन टेनिसचं अजिंक्यपद पटकावलं आहे. विजेतपदाचा चषक उंचावताना तिनं स्वत:हूनच सांगितलं होतं, माझ्या या यशाचं श्रेय माझ्या आईवडिलांचं आहे. कारण त्यांनी कधीच माझी फाजील स्तुती केली नाही. पुढे जाण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी कायम मला प्रोत्साहित केलं. त्यामुळे यश माझ्या डोक्यात गेलं नाही.

Web Title: Excessive appreciation of children will harm them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.