- रविनंद होवाळ (प्रवर्तक, संविधान जनजागृती अभियान)२६ नोव्हेंबर, १९४९ला आपण भारताच्या लोकांनी भारतीय संविधानाचा स्वतंत्र भारतासाठी स्वीकार केला, या घटनेला आता सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. सत्तर वर्षांपूर्वी आपण आपल्या देशासाठी भारतीय संविधान स्वीकारले, तेव्हा भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा लाभ मिळवून देण्याचा निश्चय आपण सर्वांनी केला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतूनच आपण हा निश्चय नि:संदिग्धपणे प्रकट केलेला आहे. या निश्चयाला एक देश म्हणून किंवा देशवासीय म्हणून आपण सर्वजण आजवर कितपत जागलो आणि कुठे-कुठे आपण कमी पडलो, याचा यानिमित्ताने आपण आढावा घेतला पाहिजे.ज्या दिवशी आपण आपल्या देशासाठी भारतीय संविधान स्वीकारले, त्याच दिवशी या संविधानातील तब्बल पंधरा महत्त्वपूर्ण कलमे भारतात लागू झाली होती. ती कलमे सोडून उर्वरित संविधान २६ जानेवारी, १९५०ला देशात लागू झाले. हे असे का झाले? तर २६ जानेवारी, १९३० रोजी भारताच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेने आपल्या अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याचा एक ठराव पारित करून तो दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. प्रत्यक्षात १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाल्यावर उपरोल्लेखित ठरावाची आठवण म्हणून आपण उर्वरित संविधान २६ जानेवारीपासून लागू केले.या सर्व तपशिलाच्या अनुषंगाने अनेक लोकांची मागणी लक्षात घेऊन वर्ष २००८ पासून महाराष्ट्रात तर २०१५ पासून देशभरात आपण २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करू लागलो आहोत. भारतीय संविधान १९७६ पूर्वीही धर्मनिरपेक्ष स्वरूपाचेच होते. भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक २५ ते २८ मध्ये दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांनी हे पुरेसे स्पष्ट केलेले आहे. भारतात समाजवादी समाजव्यवस्था आणणे किंवा ती रुजविणे हेच १९७६ पूर्वीही भारतीय संविधानाचे एक प्रमुख ध्येय होते.संविधान सभेतील सदस्यांच्या धोरणविषयक चर्चा व भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे नजरेखालून घातल्यास हेही स्पष्ट होते, तरीही या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव करून देण्यासाठी व भारतीयांतील नैतिकतेला अधिक जोराचे आवाहन करण्यासाठी आपण संविधानात ही दुरुस्ती केलेली आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय यांसारखी भारतीय संविधानातील प्रमुख ध्येये प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खरोखरच नैतिकतेशिवाय तरणोपाय नाही.
संवैधानिक नैतिकतेचे पालन प्रत्येकाकडून व्हावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:17 IST