शेषन यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! तोपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्यांना ठाऊक नसायचे! शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली.देशातील निवडणूक प्रणालीचे चित्र आमूलाग्र बदलून टाकलेले माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचे रविवारी रात्री निधन झाले आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासास वळण देणारे आणखी एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील थिरुनेल्लई या लहानशा गावात जन्मलेल्या शेषन यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी, भारतीय प्रशासन सेवेतील सर्वोच्च असलेले ‘कॅबिनेट सेक्रेटरी’ हे पददेखील सांभाळले होते. शेषन हे किती कार्यक्षम अधिकारी होते हे त्यावरून स्पष्ट होतेच; मात्र दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होईपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक नसायचे. शेषन यांनी १९९० ते १९९६ अशी सहा वर्षे मुख्य निवडणूक आयुक्त हे पद सांभाळले. त्या अवघ्या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच अशी काही बदलून टाकली, की शेषन या नावाने सर्वसामान्य माणसाच्या हृदयातही घर केले. विशेष म्हणजे निवडणूक प्रणाली आमूलाग्रपणे बदलून टाकण्यासाठी शेषन यांनी सरकारकडे ना नव्या कायद्यांचा आग्रह धरला, ना नवे नियम केले! केवळ पूर्वीपासून अस्तित्वात असलेले कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच त्यांनी एक नवा अध्याय घडवला. आज तमाम राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना जिची सतत धास्ती वाटते ती आदर्श निवडणूक आचारसंहिता तर शेषन पदारूढ होईपर्यंत कुणाच्या गावीही नव्हती. देशातील अनेक भागांमध्ये, विशेषत: उत्तर भारतात, मतदान केंद्रांवर कब्जा करून हव्या त्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हावर शिक्के मारून मतपेट्या भरून टाकणे हा प्रकार राजरोसपणे होत असे.
शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:03 IST