जागतिक एड्स निर्मूलन दिन नुकताच साजरा झाला. काही वर्षांपूर्वी एड्स या आजाराने प्रचंड दहशत निर्माण केली होती. कालौघात ती दहशत बरीच ओसरली असली तरी, हा रोग हद्दपार करण्यासाठी अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. जागतिक आरोग्य संघटना (हू) त्यासंदर्भात अत्यंत गंभीर आहे. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) मात्र ‘हू’ची री ओढण्यास तयार नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला, मग तो आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर असो, ‘अॅन्टिरिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) पुरविलीच गेली पाहिजे, अशी शिफारस ‘हूू’ने जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या पूर्वसंध्येला केली. बहुतांश देशांनी त्या शिफारसीचे पालन करण्यास होकार दिला असताना, ‘नॅको’ने मात्र यासंदर्भात वेगळी भूमिका घेऊन भारत त्यासाठी तयार नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले आहे. भारताने गेल्या दीड दशकात एड्सच्या संकटाचा खूप चांगल्या रितीने मुकाबला केला. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी व उपचारांसाठी बराच पैसाही ओतला. त्याचे चांगले परिणाम समोर आले असून, एड्सने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात निश्चितपणे घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅको’ने घेतलेल्या ताज्या भूमिकेमुळे एवढ्या वर्षांत केलेल्या चांगल्या कामावर पाणी फिरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णांसाठी ‘एआरटी’ ही जीवरक्षक उपचार प्रणाली आहे. भारतात आजवर ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना ‘एआरटी’ औषधे मोफत दिली जात असत. ‘सीडीफोर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशी मानवी शरीरातील रोग प्रतिबंधक प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. या पेशींची संख्या जेवढी कमी तेवढी त्या रुग्णाची रोग प्रतिबंधक शक्ती कमी असते. यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही ‘एआरटी’ औषधे मोफत देण्याचे भारताने मान्य केले आहे; मात्र ती प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत पुरविली पाहिजे, ही ‘हू’ची भूमिका आहे. जर एवढी वर्षे ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना मोफत ‘एआरटी’ औषधे देऊनही परिस्थिती नियंत्रणात आहे, तर यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही मोफत औषध दिल्याने परिस्थितीत सकारात्मकच बदल होईल, अशी ‘नॅको’ची भूमिका दिसते. भारतातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना मात्र ही भूमिका मान्य नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत ‘एआरटी’ औषधे पुरविणे, हाच एड्सशी लढा देण्याचा योग्य मार्ग आहे, अवघ्या जगाने तो स्वीकारला आहे आणि आपणही जगाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. या मतभेदांच्या परिणामी एड्स रुग्णांचे बळी गेले नाहीत आणि या महाभयंकर आजाराने महामारीचे रुप धारण केले नाही, म्हणजे मिळवली!
महामारीला निमंत्रण
By admin | Updated: December 9, 2015 23:53 IST