डाव्या पक्षांचा संपूर्ण शक्तिपात
By Admin | Updated: November 6, 2015 02:46 IST2015-11-06T02:46:00+5:302015-11-06T02:46:00+5:30
जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही.

डाव्या पक्षांचा संपूर्ण शक्तिपात
- वसंत भोसले
जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि स्थानिक आघाडी ताराराणी असा सामना झाला. या निवडणुकीवर काँग्रेस विचाराच्या पक्षांचेच वर्चस्व राहिले. कमी अधिक सर्वच पक्षांचे उमेदवार निवडून आले. अपवाद डावे किंवा समाजवादी पक्षाचा. किंबहुना या पक्षांचे उमेदवार चर्चेतही नव्हते. भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी तसेच शेतकरी कामगार पक्षांनी उमेदवार उभे केले होते व ते सर्वच पडले. त्या सर्वांच्या मतांची बेरीज एक हजारदेखील होत नाही.
दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगवेगळी वळणे समजून घेण्यासाठी हा ताजा तपशील किंवा संदर्भ दिला. याचे कारण दक्षिण महाराष्ट्रातील राजकारण काँग्रेसच्या प्रभावाने ओथंबून वाहत राहिले आहे. त्याला मोठी परंपरा आहे. समाजवादाची आहे, बहुजनवादाची आहे, सत्यशोधकी आहे आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याची छापही त्यावर आहे. त्याबरोबरच पर्यायी राजकारण करणारी विधायक नेतृत्वाचीदेखील मोठी परंपरा आहे. समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी, लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार आदी मोठमोठी वैचारिक भूमिका घेणारे पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते याच दक्षिण महाराष्ट्राने राज्याला दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून शेकापचे प्रा. त्र्यं. सी. कारखानीस, एन. डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, लाल निशाण पक्षाचे संतराम पाटील, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, डाव्या पक्षांचे एस. के. पाटील, गोविंदराव पानसरे, के. एल. मलाबादे, साताऱ्याचे व्ही. एन. पाटील, समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, प्रा. शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, शेकापचे गोविंदराव कालिकते, कऱ्हाडचे केशवराव पवार, अशी कितीतरी नावे घेता येतील.
स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने योगदान दिले खरे, पण स्वातंत्र्योत्तर काळात तिने भांडवलदारांची बाजू घेत शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी बहुजनवाद्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी ती काम करेनाशी झाली व त्यातून काँग्रेस आणि विशेषत: डावे यांच्यात संघर्ष सुरु झाला. काँग्रेसेतर नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जादाचे योगदान दिले व स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी वर्गासाठी सतत संघर्ष करतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला आणि गोवा मुक्ती लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. महागाई विरुद्धची आंदोलने किंवा नवी धरणे उभी करताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठीचा संघर्ष त्यांनी निकराने लढविला. हे करीत असताना निवडणुकांचे राजकारणही केले. अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यादेखील. संघर्ष हमारा नारा है, अशीच जणू प्रतिज्ञा करून काँग्रेस या प्रमुख पक्षाच्या विरोधात सतत संघर्ष केला. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्तरावर किंवा प्रदेश स्तरावर काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा हे पक्ष मागे राहून काँग्रेसमधल्याच दोन गटात लढत होत राहिली. त्याचा राजकीय लाभही काही ठिकाणी डाव्या पक्षांना झाला. कारण काँग्रेस कमकुवत झाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविण्याइतकी ताकद डाव्या पक्षात होती. त्यामुळेच नागनाथअण्णा, एन. डी. पाटील, शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, के. एल. मलाबादे, गोविंदराव कलिकते, आदी नेते आमदार म्हणून निवडून येत असत.
आता यापैकी कोणत्याही पक्षाची ताकद राहिलेली नाही. किंबहुना काँग्रेस विरोधकांची जागा भाजपावा शिवसेनेने घेतली आहे. एकेकाळी कोल्हापूरची आमदारकी सलग १९९०पर्यंत (१९८०चा अपवाद वगळता) शेकापकडे होती. महापालिका स्थापन होण्यापूर्वी कोल्हापूर नगरपालिकेत शेकापचा नगराध्यक्ष व्हायचा. शेती, पाणी, रस्ते, कारखाने आदींवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून टाकणारे हेच डाव्या पक्षांचे नेते होते. त्यातील एकही पक्ष किंवा नेता शिल्लक राहिला नाही. त्यांच्या राजकारणात नवी आव्हान पेलण्याचे सामर्थ्य राहिले नाही. शत-प्रतिशत म्हणत भाजपा विरोधकाची जागा घेत आहे, तर डाव्यांची स्थिती शत-प्रतिशत संपुष्टात आलेली दिसते.