प्रबोधनकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 02:34 IST2016-01-26T02:34:39+5:302016-01-26T02:34:39+5:30
प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजाना महाराष्ट्र शासनाचा समाजप्रबोधन पुरस्कार मिळाल्याची वार्ता चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद देणारी आहे.

प्रबोधनकार!
प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजाना महाराष्ट्र शासनाचा समाजप्रबोधन पुरस्कार मिळाल्याची वार्ता चळवळीतील कार्यकर्त्यांना आनंद देणारी आहे. सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडतात. जे सांगतात, तेच आचरणातही आणतात. ४५ वर्षांपासून क्षणाचीही विश्रांती न घेता शेकडो गावे त्यांनी पालथी घातली आहेत. खेड्यातल्या माणसाचे दु:ख समजून घेत त्याचे निराकरण ते याच समाजाच्या अज्ञानात शोधतात. सत्यपाल महाराजांचे हे अद््भुत कार्य अव्याहत सुरू आहे. ते कधी थकत नाहीत, कंटाळत नाहीत, त्यांना निवृत्ती घ्यावीशीही वाटत नाही, ‘ज्या दिवशी मरण येईल, तीच कायमची निवृत्ती’. महाराज दरवर्षी सिरसोलीत सामूहिक विवाह सोहळा घेतात, गरिबांना मदत करतात आणि आकोटच्या बाजारात बॅटरी, टॉर्च विकतानाही ते दिसतात. इतर बापू, महाराजांसारख्या सामान्य माणसाला भुरळ पाडणाऱ्या कुठल्याही करामती ते करीत नाहीत, तरीही चार दशकांपासून साऱ्यांच्याच मनावर ते अधिराज्य गाजवून आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचा विचार त्यांच्या जीवनधर्माच्या मुळाशी आहे. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीला ते दिवसभर मोझरीत गुरुदेवभक्तांसोबत असतात. गाडगेबाबांनी पहिले सेवाकार्य जिथे सुरू केले, त्या ऋणमोचनच्या यात्रेतही ते न चुकता येतात. त्यांच्या घरात कुठलेही कर्मकांड होत नाही. कुटुंबातील महिला वटसावित्रीला वडाच्या झाडाला फेऱ्या मारीत नाहीत, घास टाकत नाहीत किंवा देवी-देवतांच्या नावाने उपवासही धरत नाहीत. दारिद्र्यामुळे आपल्याला शिकता आले नाही, ही खंत सत्यपाल महाराजांना सतत बोचत असते. म्हणूनच ज्या गावात कीर्तन असते, त्या गावातील मुलाना ते गणवेश, पुस्तके घेऊन देतात. सहा महिन्यांपूर्वी महाराजांची पत्नी गेली. त्यांनी तिचे देहदान केले. नातेवाईकांनी विरोध केला, पण या विरोधाला त्यांनी जुमानले नाही. हे बळ त्यांना या प्रबोधनातूनच मिळाले. समाजातील जातीयवादावर महाराज कळवळून बोलतात. या विद्वेषाचे चटके त्यांनी लहानपणी भोगले आहेत. गावातल्या सावकाराकडे लग्न असले की, सत्यपालच्या घराला आमंत्रण नसायचे. आपल्याला का बोलवत नाही? सत्यपाल अस्वस्थ व्हायचा. आई त्याला सांगायची, ‘खालच्या जातीचे आहोत म्हणून आपण बहिष्कृत असतो.’ महाराजांना ती जात अजूनही गावागावात भेटते. ती आपण संपवू शकत नाही म्हणून ते व्याकूळही होतात. साध्या सोप्या शब्दात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, ग्रामविकास आणि शिक्षणाचा विचार कीर्तनातून मांडताना ‘महाराज’ या उपाधीचा आपल्याला संसर्ग होणार नाही, याची काळजीही ते घेतात.
त्यांच्या कीर्तनाची जाहिरात वर्तमानपत्रात नसते. बातमीही येत नाही. ती यावी म्हणून बापू-नाथांप्रमाणे ते खटपटी-लटपटीही करीत नाहीत. पण हजारो लोक त्यांच्या कीर्तनासाठी येतात. ते आत्मसात करतात आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान घेऊन घरी परततात. लातूरनजीकच्या गावात महाराजांच्या कीर्तनात बंदोबस्तावर असलेला पोलीस त्यांचे प्रबोधन ऐकतो आणि एका क्षणात दारू सोडतो. लग्न, तेरवीतील अवाजवी खर्च हे बहुजनांच्या अनर्थाचे मूळ आहे, या त्यांच्या कळवळ्यातून शेकडो माणसे प्रेरणा घेतात. हे अद््भुत सत्यपाल महाराजांच्या कीर्तनातूनच घडू शकते. ते खरे ‘महाराष्ट्रभूषण’ आहेत. पण त्यासाठी ते राजकारण्यांचे, संपादकांचे लांगुलचालन करीत नाहीत. अशा सन्मानांचे त्यांना अप्रूपही नाही. परवाच्या प्रबोधनकार पुरस्काराने सत्यपाल महाराज मोठे झाले नाहीत तर उलट त्यामुळे महाराष्ट्र शासनाची प्रतिष्ठा उंचावली आहे. उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडल्यामुळे त्यांच्या वाट्याला उपेक्षाही आली खरी पण त्याबद्दल त्यांना, ना खंत ना खेद! विविध वाहिन्यांवर रोज सकाळी दिसणाऱ्या बाबांच्या गर्दीत सत्यपाल महाराज त्यामुळेच दिसत नाहीत. वर्तमानपत्रांच्या रकान्यातही ते झळकत नाहीत. प्रबोधनाच्या चळवळीतील या निष्कांचन कार्यकर्त्याचे मोठेपण कुठल्या पुरस्कार किंवा प्रसिद्धीतूनही सिद्ध होणारे नाही.
- गजानन जानभोर