भुकेनं जागविलेली ‘ज्योती’ची ऊर्जा प्रेरणादायी ठरावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:11 AM2020-05-28T00:11:51+5:302020-05-28T00:13:37+5:30

लॉकडाऊनमुळे वडिलांची रिक्षा बंद. घरात अन्नपाण्याची शाश्वती नाही.

The energy of 'Jyoti' awakened by hunger should be inspiring! | भुकेनं जागविलेली ‘ज्योती’ची ऊर्जा प्रेरणादायी ठरावी!

भुकेनं जागविलेली ‘ज्योती’ची ऊर्जा प्रेरणादायी ठरावी!

Next

- धनाजी कांबळे 

भूक माणसाला सैरभैर करते. अस्वस्थ करते. बेचैैन करते. तशीच ती छुप्या ऊर्ज$ेलादेखील जागी करते. स्वत्व जागं करते आणि ज्याला स्वत:ला ओळखता येते, तो जगातल्या कोणालाही ओळखू शकतो, हाच आजवरचा मोठ्या माणसांचा इतिहास आहे. स्वत:ला आणि स्वत:तील ऊर्जेला ओळखणारी माणसं एकदा उंच शिखराकडे झेपावली की, ती मागे वळून पाहात नाहीत. ती अग्निपंख होतात. फिनिक्सप्रमाणे भरारी घेतात. संघर्षाची आणि कष्टाची तयारी असेल, तर जगात अशक्य असे काही नसावे. १५ वर्षांच्या ज्योतीने आपल्या वडिलांना सायकलच्या कॅरिअरवर बसवून तब्बल १२०० किलोमीटर सायकल चालवत गाव गाठले आहे.

लॉकडाऊनमुळे वडिलांची रिक्षा बंद. घरात अन्नपाण्याची शाश्वती नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मिळेल त्या वाहनाने गावाच्या ओढीनं, पोटातली आग पायात एकवटून स्थलांतरितांचे तांडेच्या तांडे निघाले असताना आपल्याला वाहन मिळेल ना मिळेल, या विचारात न राहता सायकलच्या भरवशावर छोट्याशा अपघातात जखमी झालेल्या वडिलांना मागच्या सीटवर बसवून बिहारच्या दिशेने निघालेली ज्योती आता देशाची खऱ्या अर्थाने ‘आयडॉल’ आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यांच्या सीमा पार करून दुसºया राज्यात अडकून पडलेले मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने किंवा खाली जमीन, वर आकाश म्हणून अनवाणी रक्ताळलेल्या पायाने गावाकडची वाट तुडवत असताना गुरुग्राम ते बिहार असा १२०० किलोमीटरचा टप्पा केवळ सात दिवसांत पूर्ण करणारी ज्योतीकुमारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

एकीकडे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर होत असताना २० लाख कोटींतील कोणता शून्य आपल्या विकासासाठी आहे, याची तिळमात्र कल्पना नसलेल्या या ज्योतीकुमारीने सायकलीवर पार केलेल्या या प्रवासाची दखल सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने घेतली आहे. गावाकडे पोहोचलेल्या या ज्योतीला त्यांनी चाचणीसाठी बोलावले आहे. ज्योतीने ही चाचणी पूर्ण केल्यास नॅशनल सायकलिंग अकॅडमीमध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होण्याची शक्यता आहे.

सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी तशी घोषणा केली आहे. ही अकॅडमी स्पोर्टस् अथॉरिट आॅफ इंडियाची अत्याधुनिक सुविधांपैैकी एक मानली जाते. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च अकॅडमी करणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला या चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. तिने दाखविलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. ज्योतीचे वडील मोहन पासवान हे रिक्षाचालक होते. त्यांचा नुकताच एक छोटासा अपघात झाला आहे.

रोजगार बुडाल्याने कुटुंबाला जगविणे कठीण असल्याने गावाकडे परतण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अशा परिस्थितीत डोळ्यांसमोर दिसणारी सायकलच आपल्याला गावापर्यंत पोहोचवेल या विश्वासानेच ज्योतीकुमारीने वडिलांसोबत केलेला हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. जिद्द आणि चिकाटी असेल, तर ध्येय साध्य करता येते. मन ध्येयवेडं असेल तर अंगात बळही भरता येतं. त्यासाठी कोणतेही संकट आल्यावर रडत न बसता लढण्याची तयारी ठेवली, तर जग जिंकता येतं हे या ज्योतीकुमारीने दाखवून दिले आहे.
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, निर्धार पक्का आहे, त्याला कोणतेही ध्येय अशक्य नसते. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो, असं व. पु. काळे म्हणतात. ते ज्योतीकुमारीच्या बाबतीत चपखल खरे ठरले आहे.

प्रामाणिकपणे कष्ट करत राहणाºया माणसांना दु:ख, वेदना, संघर्ष नवा नसतो. कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्याठायी आपसूकच येते. जे लोक स्वत:ला ओळखतात, स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा ओळखतात, ते कधीच खचून जात नाहीत. ते संघर्ष करत राहतात. अनेकदा त्यांना समाजव्यवस्थेशीदेखील संघर्ष करावा लागतो. मात्र, ती लढत राहतात. ज्योतीकुमारीने कोणाच्या मदतीची वाट न पाहता स्वत:च पुढाकार घेऊन पोटातल्या भुकेतून आलेल्या ऊर्जेने वडिलांना गावाकडं नेलं. अशा अनेक रणरागिणी उन्हातान्हात तान्हुल्यांना अंगाखांद्यावर घेऊन आजही गावाकडची वाट तुडवत आहेत.

जातीय उतरंडीत तळातल्या समजल्या गेलेल्या समूहातील लोकांची संख्या यात मोठी आहे. हे वास्तव एकीकडे असताना ज्योतीकुमारीने दाखविलेल्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम.

अंधाराविरुद्ध संघर्ष करणाºया या ज्योतीपासून प्रेरणा घेऊन अशाच अनेक ज्योती निर्माण झाल्या, एकत्र आल्या, तर ही एकजुटीची मशाल नवीन प्रकाशपर्व घेऊन येईल. ...आणि तो दिवस फार दूर नाही.

Web Title: The energy of 'Jyoti' awakened by hunger should be inspiring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.