उमद्या सैतानाचा अंत
By Admin | Updated: June 15, 2015 00:35 IST2015-06-15T00:35:10+5:302015-06-15T00:35:10+5:30
रामसे बंधूंचे हास्यास्पद ‘भयपट’ पाहणाऱ्या किंवा पाहिलेल्या आजच्या पिढीला ख्रिस्तोफर ली हे काय प्रकरण आहे, याची कल्पना असण्याची शक्यता तशी कमीच

उमद्या सैतानाचा अंत
रामसे बंधूंचे हास्यास्पद ‘भयपट’ पाहणाऱ्या किंवा पाहिलेल्या आजच्या पिढीला ख्रिस्तोफर ली हे काय प्रकरण आहे, याची कल्पना असण्याची शक्यता तशी कमीच. पण खऱ्या अर्थाने भयपट म्हणजे काय, याचा जणू वस्तुपाठच सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ज्या उंच्यापुऱ्या, तगड्या ब्रिटिश कलाकाराने चंदेरी पडद्यावर ‘ड्रॅक्युला’ च्या भूमिका सादर करून घालून दिला, तोच तो ख्रिस्तोफर ली नुकताच वयाच्या ९२ व्या वर्षी मरण पावला. ड्रॅक्युला म्हणजे रक्तपिपासू सैतान! याआधीच मरण पावलेला पीटर कुशिंग नावाचा नट या सैतानाचा सेवक. त्याने सावज शोधून आणायचे आणि काऊंट ड्रॅक्युलाने त्या सावजाचे रक्त शोषून घ्यायचे आणि त्याचे सुळे ज्या सावजाच्या शरीरात घुसणार, ते सावजदेखील सैतान बनणार आणि सूर्यप्रकाश, लसूण, वाहते पाणी वा क्रूस समोर धरले की ड्रॅक्युलाचा अवतार पुढील सिनेमापर्यंत संपणार, हेच साधारण साऱ्या ड्रॅक्युला चित्रपटांचे सामाईक कथाबीज. ड्रॅक्युलाचा किल्ला, त्याची बग्गी, त्याची सावजं आणि अत्यंत पोषक पार्श्वसंगीत यामुळे कथाबीज जरी सामाईक, तरी ड्रॅक्युला मालिकेतील सारे चित्रपट यशस्वी होत गेले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ख्रिस्तोफर ली या नटाच्या शरीराची ठेवण, त्याचा उंचट चेहरा, भव्य कपाळ आणि मादक (?) आवाज! ड्रॅक्युलाच्या यशामुळे हॉॅलिवूडमध्ये व्हॅम्पायर, फ्रॅन्केस्टीन आणि तत्सम अनेक चित्रपट निघत गेले, पण ते भयपट कमी व गलिच्छपट अधिक होते. ड्रॅक्युलाची मौज किंवा क्रेझ ओसरल्यानंतरच्या काळात याच लीने जेम्स बॉण्डच्या ‘दि मॅन विथ गोल्डन गन’ या सिनेमात स्कॅरामांगा (त्याचा बुटका सेवक निकनॅक) नावाच्या खलनायकाची भूमिका केली आणि बॉण्ड बनलेल्या रॉजर मूरइतकाच तोही भाव खाऊन गेला. पण जेव्हा त्याला, त्यानेच साकारलेली त्याची स्वत:चीच सर्वाधिक आवडती भूमिका कोणती, असा प्रश्न विचारला तेव्हा, त्याने वेगळेच उत्तर दिले. पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मुहम्मद अली जीना यांची व्यक्तिरेखा त्याने ‘जीना’ याच नावाच्या सिनेमात साकारली होती. पण तो चित्रपट फारसा चालला नाही, त्यामुळे त्याची स्वत:ची आवडती भूमिका प्रेक्षकांपर्यंत तशी गेलीच नाही. इंग्लंडच्या राणीने त्याला ‘नाईटहूड’ प्रदान करून ब्रिटिश संसदेच्या उमरावसभेचे सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले होते. एक उमदा सैतान असे कचकडी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सर ली यांच्या निधनाने एक भयप्रद काळ निश्चितच मागे सरला आहे.