‘लोकमंगल’चा आठवा फेरा
By Admin | Updated: November 11, 2016 00:33 IST2016-11-11T00:33:44+5:302016-11-11T00:33:44+5:30
सामुदायिक विवाह चळवळीत रौप्यमहोत्सवी विवाह सोहळा साजरा करण्याचा विक्रम सोलापूरच्या ‘लोकमंगल परिवारा’ने केला. त्या विक्रमाला एका क्रांतिकारी संस्काराची जोड आहे, तो म्हणजे ‘आठवा फेरा’...

‘लोकमंगल’चा आठवा फेरा
सामुदायिक विवाह चळवळीत रौप्यमहोत्सवी विवाह सोहळा साजरा करण्याचा विक्रम सोलापूरच्या ‘लोकमंगल परिवारा’ने केला. त्या विक्रमाला एका क्रांतिकारी संस्काराची जोड आहे, तो म्हणजे ‘आठवा फेरा’...
विवाहसंस्था हे समाजव्यवस्थेचे अपरिहार्य अंग आहे. सामाजिक शास्त्रीय भाषेत या संस्थेचे स्वरूप कालानुरुप बदलत गेले तरी काही चालीरिती कायमच राहिल्या. हिंदूू धर्मात विवाह संस्कारात असणारी सप्तपदी किंवा वधू-वरांचे अग्निभोवतीचे सात फेरे हा त्यातलाच एक भाग. त्याच अपरिहार्य संस्कारात नव्याने क्रांतिकारी भर घालण्याचे धाडस सोलापूर जिल्ह्यातील ‘लोकमंगल’ या प्रतिष्ठानने केले आहे.
पुरोगामीत्वाची कास धरताना आणि सर्व जाती-धर्माच्या प्रथांचाही आदर राखताना, नव्या जगताची हाक म्हणून विवाह बंधनाच्या रेशीमगाठी बांधताना, नव्या वधू-वरांना सात फेरे घेताना, ‘स्त्री जन्माचे स्वागत’ म्हणून आठवा फेरा घेण्याची प्रथा तब्बल एका तपापासून सुरू करण्याचे काम राज्याचे सहकार, वस्त्रोद्योग व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या ‘लोकमंगल’ परिवाराने रुढ केली आहे. महिला सबलीकरणाच्या जमान्यात लोकशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विवाह सोहळ्याचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. केवळ प्रबोधन करून न थांबता स्वत:च्या वैवाहिक जीवनातील संस्कार म्हणून त्याचा मनापासून स्वीकार कसा केला जातो याचा अनुभव येथे येतो.
देशमुख यांना सोलापूरकर ‘बापू’ या नावाने संबोधतात. आता या बापूंचा परिवार खूपच व्यापक बनला आहे, याची प्रचिती परवा सोलापूरकरांना आली. बापूंनी एक महत्त्वाकांक्षी स्वप्न म्हणून हाती घेतलेला सामुदायिक विवाहाचा उपक्रम ११ वर्षांचा तर झालाच झाला, शिवाय सामुदायिक विवाहांचा रौप्यमहोत्सवही त्या उपक्रमाने साजरा केला. आता बापू तब्बल दोन हजार ५५७ जावयांचे सासरे बनले आहेत. रौप्यमहोत्सवी सामुदायिक विवाह सोहळ्यात १११ विवाह संपन्न झाले. जाती-पातीच्या भिंतींशी बंड करून सर्व जाती-धर्माच्या प्रथा-परंपरांचा आदर राखत आजवर लोकमंगल परिवाराने दोन हजार ५५७ विवाह पार पाडले. सामुदायिक विवाह ही काळाची गरज बनलेली आहे. आर्थिक क्षमता असो वा नसो केवळ विवाह सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कुटुंबांची चाललेली धडपड, त्यातून येणारा कर्जबाजारीपणा आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या कौटुंबिक समस्या टाळण्यासाठी सामुदायिक विवाहाची खरी गरज आता समाजाला जवळ करावीशी वाटू लागली आहे. ही चळवळ गतिमान होत असताना त्याच चळवळीला केवळ दर वर्षी होणाऱ्या एका सोहळ्यापुरते मर्यादित स्वरूप न ठेवता सुभाष देशमुख, त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख, शहाजी पवार, अविनाश महागावकर, इंद्रजित पवार, सचिन कल्याणशेट्टी आणि लोकमंगलच्या संपूर्ण टीमने तो ‘कायमस्वरूपी परिवार’ बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. केवळ ‘बापूंचे जावई’ हे बोलाचे नाते न राखता या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह बंधनात बांधलेल्या प्रत्येक जोडप्याचे जीवन सुखकर बनविण्याचा प्रयत्नही होताना दिसतो. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून मंगळसूत्रापासूनचा संपूर्ण संसार उभा करून देण्याचे काम हा परिवार करतो. सुखी संसारासाठी आवश्यक असणारी मानसिकता घडविण्यासाठी, नवविवाहितांपुढे येणाऱ्या समस्यांविषयी तज्ज्ञांकडून वधू-वरांचे समुपदेशन करण्यात येते. उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या रोजगार, व्यवसायासाठी केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष कर्ज देऊन त्यांना स्थैर्य दिले जाते. ते यशस्वी व्हावेत, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जातो. अशा जावयांना आजवर २५ लाखांहून अधिक अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. ४२२ वधू पित्यांना ४२ लाखांहून अधिक रुपयांचे अनुदानही या परिवाराने मिळवून दिले आहे.
स्त्री जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता घडविण्यासाठी ‘शुभमंगल’ नावाची एक खास योजना तयार करून या सामुदायिक सोहळ्यात विवाहित झालेल्या दाम्पत्यास पहिली मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षांसाठी दोन हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. आजवर अशा २२७ मुलींच्या नावे ‘लोकमंगल परिवारा’ने ठेवी ठेवल्या आहेत. सोलापूर येथे २० तर उस्मानाबाद जिल्ह्यात असे पाच सामुदायिक विवाह सोहळे आजवर पार पडले. त्या सोहळ्यातील वधू-वरांचा आठवा फेरा समाजाला नवी दिशा देत आहे.
- राजा माने