‘ट्रोलिंग’ करणं हा आजार आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:20 PM2021-08-12T16:20:08+5:302021-08-12T16:20:58+5:30

Trolling : ट्रोलिंग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणारं ऑनलाइन वर्तन. ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त टिपण्या केल्या जातात.

editorial view on trolling | ‘ट्रोलिंग’ करणं हा आजार आहे का?

‘ट्रोलिंग’ करणं हा आजार आहे का?

Next

ऑनलाइन चर्चा, वाद आणि ट्रोलिंग यात फरक असतो हे अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. ‘मी कुठं काय केलं. मी तर चर्चा करत होतो.’ असं अनेकांना वाटतं; पण चर्चा, टीका आणि ट्रोलिंग यांच्यातली पुसटशी सीमारेषा लक्षात न आल्यानं अनेकांचा गोंधळ उडतो. 
 ट्रोलिंगची तशी व्याख्या नाही; पण ट्रोलिंग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणारं ऑनलाइन वर्तन. ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त टिपण्या केल्या जातात. एखाद्या वादामध्ये शब्दांची आणि अभिव्यक्तीची, सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नसते त्या चर्चेला, टीकेला ट्रोलिंग म्हणता येत नाही; पण जिथं समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा, नामोहरम करण्याचा, शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवण्याचा, लैंगिक छळ करण्याचा, बदनामीचा हेतू असतो त्याला ट्रोलिंग म्हटलं जातं. सभ्य शब्दातही वाद होऊ शकतात; पण एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक गलिच्छ शब्दांत लिहायला सुरुवात करते ते ट्रोलिंग! ऑनलाइन पोस्ट, कमेंटस्‌च्या माध्यमातून धमक्या देणं, त्रास देणं, इजा पोहोचवण्याची भाषा करणं, शिव्या देणं, कुटुंबाबद्दल अपशब्द वापरणं, या सगळ्या गोष्टी ट्रोलिंगमध्ये मोडतात. 

ट्रोलिंग हे व्यसन आहे का? 

- या प्रश्नाचं सरळ उत्तर देणं अवघड आहे; पण  मनोविकारतज्ज्ञांनुसार सायकोपाथ हा मानसिक आजार बरा होत नाही. सायकोपाथ म्हणजे काय तर समाजविरोधी, दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्तीच व्यक्तिमत्त्वात असणं. अनेकदा ट्रोल्स सायकोपाथही असू शकतात. हे ट्रोल्स कधीतरी बदलून सकस संवाद साधू शकतात का? हो... आणि नाही! ट्रोलिंग थांबणं, व्हर्चुअल जगात वावरण्याचं भान लोकांना येणं ही अत्यंत व्यक्तिसापेक्ष प्रक्रिया आहे. माध्यम शिक्षणानं कदाचित या वृत्तीत फरक पडू शकतो.

ट्रोलिंग का केलं जातं? 

१) दुसऱ्याला त्रास देण्यातून मजा येते. आनंद मिळतो.
२) वैयक्तिक मतभेद, हेवेदावे, खुन्नस 
३) राजकीय आणि विचारधारेतील मतभेद 
४) संबंधित व्यक्तींचे लैंगिक अग्रक्रम न पटल्यानं  
६) सेलिब्रिटींबद्दल वाटणारी असूया 
७) प्रकाशझोतात राहण्याचा अट्टहास 
८) आपल्या आवडत्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी 
९) एका विशिष्ट गटात जागा मिळवण्यासाठी 

- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासक
muktaachaitanya@gmail.com

Web Title: editorial view on trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.