शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

बेभान झालेली माणसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 07:34 IST

सामाजिक कार्यकर्त्याने योजना भान ठेऊन आखाव्यात अन् त्या बेभान होऊन अंमलात आणाव्यात, असे थोर समाजसेवक बाबा आमटे सांगत.

- धर्मराज हल्लाळेसामाजिक कार्यकर्त्याने योजना भान ठेऊन आखाव्यात अन् त्या बेभान होऊन अंमलात आणाव्यात, असे थोर समाजसेवक बाबा आमटे सांगत. समाजानेच नव्हे तर कुटुंबाने नाकारलेल्या कुष्ठरूग्ण माणसांनाही बाबांनी आपलेसे केले. रस्त्यावर कुष्ठरोगाने विव्हळत पडलेल्या माणसापासून चार हात दूर जाणाऱ्या समाजमनाला जागृत करण्यासाठी बाबा आमटे यांनी आयुष्य दिले. हाता-पायाची बोटे नसलेल्या माणसांना जगायला शिकविले. दान माणसाला नादान बनविते, असे सांगत श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिले. सोमनाथच्या खडकाळ जमिनीवर शेत शिवार फुलविले. आनंदवन प्रकल्पात असंख्य अपंगांनी कौशल्य आत्मसात करून लघू उद्योग उभे केले. याच कामातून प्रेरणा घेऊन डॉ. भरत वाटवानी यांनी जगण्याचे भान विसरलेल्या माणसांना आधार देण्याचे काम केले. श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मनोरूग्णांना सामान्य माणसांप्रमाणे जगण्याचे बळ दिले. ज्याचा गौरव मॅगसेसे पुरस्काराने झाला.

घटनेने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला आहे. इतकेच नव्हे सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. मात्र ज्यांना आपण वेडी माणसे अथवा मनोरूग्ण ठरवितो त्यांनाही मन, वेदना असू शकते ही संवेदना आपण ठेवत नाही़ रस्त्याने जाताना मळकटलेले कपडे, अनेकदा अर्धवस्त्र तर कधी विवस्त्र अवस्थेत दिसणारी माणसे पाहून आपले मन सुन्न होत नाही़ मनाच्या कोप-यात कुठेतरी एक भावना असते ती म्हणजे ही व्यक्ती वेडी आहे़ म्हणजेच ती कशीही राहू शकते. अशावेळी तिच्या सन्मानाने जगण्याचा पुसटसाही विचार ध्यानी येत नाही़ बाबा आमटे यांना दिसलेला कुष्ठरूग्ण अनेकांनी पाहिला होता. प्रत्येकजण तेथून जाताना अंतर ठेवत होता़ बाबांनी विचार केला, हा जो कुष्ठरूग्ण रस्त्याच्या कडेला पडला आहे तिथे मी असतो तर अन् तिथेच सेवेची ज्योत प्रज्वलित झाली़ जेव्हा दुस-याची वेदना आपली बनते तेव्हाच मनात संवेदना निर्माण होते़ अशाच वाटेने जाणा-या महाराष्ट्रातील एका संवेदनशील मानसोपचार तज्ज्ञाचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव झाला. डॉ. वाटवानी यांनी पुनर्वसन केंद्रात हजारो मनोरूग्णांना सेवा दिली. ते बरे होऊन समाजात सन्मानजनक जीवन जगत आहेत.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे़ ताण तणावामुळे त्यात आणखी भर पडत आहे़ समुपदेशनाने बरे होऊ शकतील असे मनोरूग्ण आपल्या अवतीभोवती सुद्धा आहेत. परंतु, ज्यांना औषधोपचारांची गरज आहे, अशांकडेच अक्षम्य दुर्लक्ष होते. नियंत्रणाबाहेर गेलेल्या मनोरूग्णांना परिवारातही ठेवले जात नाही़ एक तर ते स्वत: घर सोडून जातात अन्यथा त्यांना तसे भाग पाडले जाते. ज्यांना घरात ठेवले जाते त्यांनाही साखळदंड बांधले जातात़ एखाद्या ठिकाणची बातमी होते़ चार-दोन लोकांची सुटका होते़ परंतु, आजही हजारो लोक मरणासन्न अवस्थेत आहेत. डॉ. वाटवानी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक लहान-मोठ्या शहरात पुनर्वसन प्रकल्प उभारणे ही काळाची गरज आहे. 

मेंटल हेल्थ अ‍ॅक्टमध्येही सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे. ज्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा व्यक्तीला उचलण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. सध्याची स्थिती घेतली तर पोलीस काय-काय करतील हा प्रश्न आहे. मनोरूग्ण व्यक्ती प्रसंगी हिंसक बनू शकते. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणी त्यांना जवळ करण्यास धजावत नाही़ कायद्याप्रमाणे पोलीसही मनोरूग्णाला थेट वेड्यांच्या इस्पितळात पाठवू शकत नाहीत़ त्या व्यक्तीला न्यायालयासमोर उभे करावे लागते. सगळीच प्रक्रिया किचकट आणि लांबलचक आहे. अशा नियमांच्या जोखडामध्ये न अडकता डॉ़ वाटवानी यांनी रूग्णांचे साखळदंड तोडले आहेत. परंतु, हे धारिष्ट्य सामाजिक भावना असलेल्या प्रत्येकाला करता यावे, यासाठी कायदा सुलभ केला पाहिजे. नक्कीच डॉ. वाटवानी यांनी हजारो लोकांना नवीन आयुष्य दिले. मात्र अजूनही जगण्याचे भान विसरलेले देशभरात लाखावर माणसे आहेत़, जी रस्त्यावर भटकताना तुम्ही आम्ही पाहतो. ज्यांना अंगावरच्या वस्त्राचे भान नसते. काय खातो आणि पितो, याचीही जाण नसते. उकीरड्यावर  अन्न वेचणारी, सांडपाणी ओंजळीने पिणारी माणसे हे विचित्र चित्र बदलण्याचे स्वप्न युवा पिढीला प्रत्यक्षात आणावे लागेल. त्यासाठी डॉ़ वाटवानी यांचे दोन हात पुरेसे नाहीत, त्यांना किमान शेकडो हातांचे बळ मिळाले तर आपल्या सभोवतालचे विदारक दृष्य कायमचे दृष्टीआड होईल.