शीला दीक्षित यांच्या निधनाने केवळ दिल्ली शहर व काँग्रेस पक्ष यांचीच नव्हे तर साऱ्या देशाची फार मोठी हानी झाली आहे. निष्ठावान, पारदर्शी, अनुभवी आणि कार्यक्षम अशा विशेषणांवर अधिकार सांगणारी जी थोडी माणसे देशाच्या राजकारणात होती व आहेत त्यात शीला दीक्षित या फार वरच्या क्रमांकावर राहिल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर ओळीने तीन वेळा निवडून आलेल्या शीलाजी यांनी त्या शहराचा चेहरामोहरा बदलून त्याला जागतिक दर्जाचे शहर बनविले.

Image result for sheila dixit

तसे करीत असताना त्याचा ऐतिहासिक व पारंपरिक वारसाही त्यांनी अतिशय काळजीने जपला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर कार्यक्षमता, सचोटी आणि स्वच्छता यांचा शिक्का होता. त्या सबंध काळात त्यांच्यावर कुणालाही कोणताही आरोप कधी करता आला नाही आणि ज्या राजकारण्यांनी तो केला त्यांना लोकांनी फारसे महत्त्व दिले नाही. १९९४ मध्ये त्यांचे श्वसूर व इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य दिवंगत उमाशंकर दीक्षित यांनी त्यांना राजकारणात आणले. त्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही होत्या. संयुक्त राष्ट्रसंघटनेत त्यांनी अनेकवार भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Image result for sheila dixit

गेल्या दोन निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या केजरीवालांनी त्यांच्यावर कमालीची विषारी टीका केली. ती त्यांच्या मनाला लागलीही. त्याचमुळे आम आदमी पार्टीशी समझोता नको अशी ठाम भूमिका त्यांनी गेल्या निवडणुकीत घेतली. केजरीवालांनाही आपल्या टीकेचा नंतर पश्चात्ताप झाला. कारण जनतेच्या मनात शीला दीक्षित यांनी केलेली कामे होती, दिल्लीची मेट्रो रेल्वे त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाली व ती नफ्यातही चालली. त्यांचा स्वभाव व सामान्य माणसांशी असलेले त्यांचे आत्मीयतेचे संबंधही लोकांच्या स्मरणात होते. त्याचमुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी त्यांचेच नाव पक्षाच्या नेत्या म्हणून पुढे केले. त्या कामालाही लागल्या होत्या. शहरात ब्लॉक व इतर समित्यांच्या नेमणुकांचे काम त्यांनी हाती घेतले होते. तशात त्यांना हा मृत्यू आला. दु:ख याचे की ज्या काळात काँग्रेस पक्ष देश व लोकशाही यांना प्रामाणिक व विश्वासू नेत्यांची गरज आहे त्या काळात तो आला. दिल्लीत आप पक्ष संपला आहे आणि काँग्रेसकडे कार्यक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे भाजपला तेथे लोकसभेच्या सातही जागा जिंकता आल्या. विधानसभेसाठी होणारी लढत चांगली करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले असताना शीला दीक्षित यांना असे जावे लागले आहे. देशाच्या राजकारणात स्त्रियांचे प्रमाण फार कमी आहे. तशातही यशस्वी व स्वतंत्र राजकारण करणाऱ्या आणि तशा भूमिका घेणाऱ्या स्त्रिया फारच थोड्या आहेत.

Image result for sheila dixit

बहुसंख्य स्त्रिया नेत्यांच्या सांगण्यानुसार व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आहेत. आपले ज्ञान, वय व अधिकार यांच्या बळावर नेतृत्वात मार्गदर्शन करण्याचे अधिकार फारच थोड्या स्त्रियांना आजवर मिळविता आले आहेत. शीला दीक्षित यांचा अधिकार असा होता. त्यांनी प्रसंगी इंदिरा गांधींना मार्गदर्शन केले आणि अनेकदा राहुल गांधींना त्यांचा निर्णय त्यांनी बदलायला लावला. राष्ट्रीय नेतृत्वावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा असा प्रभाव याआधी क्वचितच कुणा स्त्रीला प्राप्त करता आला आहे. शीला दीक्षित यांचे व्यक्तिमत्त्व सौम्य, संयमी व त्यांना पाहताच कुणालाही त्यांच्याविषयी आस्था वाटावी असे होते. त्या राजकारणी कमी व गृहस्थाश्रमी अधिक होत्या.

Image result for sheila dixit

लोकांशी असणारे त्यांचे संबंधही राजकीय असण्याहून सामाजिक व कौटुंबिक पातळीवरचे अधिक होते. त्याचमुळे त्यांच्या निधनाविषयीची हळहळ देशातील जवळजवळ प्रत्येकच पक्षांनी व पक्षनेत्यांनी व्यक्त केली आहे. सामान्य माणसेही त्यांच्या जाण्याने अशीच मनातून दु:खी झाली आहेत. ज्या दिल्ली शहराला त्यांनी आपली कर्मभूमी मानले व ज्याच्या सेवेत आपले सारे आयुष्य त्यांनी घालविले त्या शहराला यापुढे त्यांची उणीव कायमच जाणवणार आहे. त्याचवेळी राहुल गांधींसह काँग्रेस पक्षालाही त्यांचे जाणे कायमचे दुखावणारे ठरणार आहे.

Related image


Web Title: Editorial On Three-time former Delhi CM Sheila Dixit passes away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.