शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 05:38 IST

युवाल्डी गाव मेक्सिको सीमेलगत असल्याने तिथे तैनात सीमा सुरक्षा जवानांनी त्याला कंठस्नान घातले.

अमेरिका ही जगाची महासत्ता आहे. जगात कुठेही खुट्ट झाले की हा पोलीसदादा चुकलेल्यांना धडा शिकवायला तयार असतो. पण, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण मात्र महासत्तेला करता येत नाही. सतत कुणीतरी माथेफिरू हातात बंदूक घेऊन शाळेत घुसतो, गणवेशातल्या लहानग्यांवर अंदाधुंद गोळीबार करतो, चिमुकल्यांचे जीव जातात, रक्ताचा सडा पडतो, माता-पित्यांचे हंबरडे आकाशाला भिडतात. तेवढ्यापुरत्या मुला-मुलींच्या तसबिरींपुढे मेणबत्त्या पेटवल्या जातात, शोकसभा होतात. गनलाॅबीविरूद्ध संताप व्यक्त होतो. हळूच घटना विस्मरणात जाते. कधी कनेटीकटमधील सँडी हुक, कधी फ्लोरिडातील पार्कलँड तर काल मंगळवारी टेक्सासमधील युवाल्डी येथे रॉब इलिमेंटरी स्कूल अशा मालिकांनी ही महासत्ता रक्ताळलेली आहे.  निरागस, निष्पाप चिल्यापिल्यांच्या रक्ताचा सडा फक्त अमेरिकनांनाच नव्हे तर अख्ख्या जगाला सुन्न करून जातो. साल्वाडोर रामोस नावाच्या १८ वर्षांच्या माथेफिरूने  टेक्सासमध्ये अवघ्या सात ते दहा वर्षे वयाची कोवळी मुले मारली. युवाल्डी गाव मेक्सिको सीमेलगत असल्याने तिथे तैनात सीमा सुरक्षा जवानांनी त्याला कंठस्नान घातले.

रामोसच्या संतापाचे कारण तसे किरकोळ हाेते. तो त्याच शाळेत होता म्हणे. बोलताना अडखळायचा म्हणून शाळेत त्याला मुले चिडवायची. आई ड्रग्जच्या आहारी गेलेली असल्याने घरीही वाद व्हायचे. त्यामुळे शाळा सुटली. स्थानिक स्टोअरमध्ये तो रात्री काम करू लागला. सतत विमनस्क राहायचा. नुकतीच त्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली. कायद्याने त्याला आता शस्त्र बाळगता येत होते. त्याने ते विकत घेतले. मैत्रिणीला “आज काहीतरी करणार”, असा इन्स्टाग्रामवर मेसेज केला. शाळेकडे जाण्याआधी घरी आजीवर गोळी झाडली आणि शाळेत गेल्यावर माता-पित्यांच्या गाड्यांच्या दिशेने, पिवळ्या स्कूलबसकडे हात उंचावत, हसत-खेळत, बागडत निघालेल्या निष्पाप मुला-मुलींवर अमानुष गोळीबार केला. अठरा मुलांसह क्रूरकर्मा रामोस आणि दोन प्रौढ असे एकवीसजण मरण पावले. २०१२मधील सँडी हुक शाळेतील नरसंहारानंतर गेल्या दहा वर्षांमधील ही सर्वात भयंकर घटना आहे. हे रक्तरंजित दुष्टचक्र थांबता थांबेना. २०२०मध्ये अमेरिकेत अग्निशस्त्रांनी मृत्यूच्या तब्बल १९ हजार ३५० घटना घडल्या. आधीच्या वर्षापेक्षा त्या ३५ टक्क्यांनी अधिक होत्या. प्रगत अमेरिकेत रस्ते अपघातांमधील मृत्यूंपेक्षा आता अशा मृत्यूंचा आकडा मोठा आहे आणि या साऱ्याचे मूळ तिथल्या ‘गन पॉलिसी’त दडले आहे.

बंदूक ही अमेरिकेची जुनी, अगदी वसाहत काळापासूनची गंभीर समस्या आहे. बहुतेक राज्यांमध्ये मालमत्तांचे रक्षण ते स्वसंरक्षणासाठी ठराविक वयोमर्यादेनंतर कोणालाही बंदूक बाळगता येते. सगळ्या प्रकारच्या बंदुका दुकानांमध्ये विक्रीसाठी सहज उपलब्ध असतात. अध्यक्ष जो बायडेन संतापाने ज्या गन लॉबीबद्दल बोलले, तिची राजकीय ताकद मोठी आहे. बंदुकीच्या गैरवापराला चाप लावण्याबद्दल बायडेन यांचा डेमोक्रॅट पक्ष कितीही बोलला तरी ते सोपे नाही. रिपब्लिकन पक्षाचा नव्या कायद्यात अडथळा आहे, असे मानले जाते. म्हणूनच अमेरिकन काँग्रेसमध्ये नवा कडक कायदा होऊ शकलेला नाही. असा कडक कायदा होऊ नये म्हणून नॅशनल रायफल असोसिएशन राजकीय पक्षांना मोठा निधी देते, असे म्हटले जाते. परिणामी, काँग्रेसने ही भानगड राज्यांच्या गळ्यात मारली आहे. तसे पाहता टेक्सास हे बंदुकीच्या वापरावर कडक निर्बंध असलेले राज्य समजले जायचे. तिथे २१ वर्षांच्या आतील व्यक्तीला बंदूक खरेदी करता येत नव्हती. परंतु, गेल्या सप्टेंबरमध्येच कायदा शिथिल झाला आणि १८ वर्षानंतर साल्वाडोर रामोसने वापरली त्या ‘एआर-१५’ रायफलसारखी हॅण्डगन खरेदी करण्याची मुभा मिळाली. अमेरिकेतल्या या रक्तरंजित प्रवासाने अलीकडे एक वंशवादाचे भयंकर वळण घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. १४ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये श्वेत वर्णवर्चस्ववादी तरुणाने केलेल्या गोळीबारात दहा लोक मारले गेले. बफेलो येथे जिथे हा गोळीबार झाला ती मुख्यत्त्वे आफ्रिकन-अमेरिकन लोकांची वस्ती. कॅलिफोर्नियातील लगुना वूडस् चर्चमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. तिथे तैवानीज-अमेरिकन राहतात, तर आता टेक्सासमध्ये जिथे हा चिमुकल्यांचा नरसंहार घडला, तिथे प्रामुख्याने हिस्पॅनियन कष्टकरी राहतात. कडव्या वर्णवर्चस्ववादी मंडळींच्या हातात बंदुकीचा स्वैर कारभार गेल्यामुळे शस्त्रास्त्र वापरावर निर्बंधाचा कायदा झाला तरी या समस्येचे काय करायचे, ही चिंता कायम राहील.

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबारJoe Bidenज्यो बायडन