यांना आत्महत्या म्हणायचं की खून?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:34 AM2020-06-16T02:34:18+5:302020-06-16T02:35:51+5:30

नैराश्य हा आता प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार आहे. आपल्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा नैराश्य आपल्याला ग्रासून टाकते. ग्लॅमरजगताशी या शब्दाचा अगदी जवळचा संबंध आहे.

editorial on sushant singh rajputs suicide and depression in glamour world | यांना आत्महत्या म्हणायचं की खून?

यांना आत्महत्या म्हणायचं की खून?

Next

वूडी अ‍ॅलनच्या सिनेमात त्याच्या नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘माझ्या बाबांनी आत्महत्या केली. कारण त्यांना रोज सकाळी माध्यमांत येणारी बातमी खूप उदास करत होती.’ अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याने अ‍ॅलनच्या सिनेमातील या वाक्यावर पुन्हा विचार करण्याची गरज भासू लागलीय. सुशांतने आत्महत्या केल्याने ग्लॅमर जगतातील ताणतणाव, नैराश्य हे मुद्दे प्रकर्षाने समोर येत आहेत. याआधीही अनेक तारे-तारकांनी आपलं जीवन अशाचप्रकारे संपवलं आहे. मात्र, नैराश्येच्या खोलात जाऊन हे पाऊल उचलणं कितपत योग्य याची चर्चाच करणं योग्य नसून, इलाज काय यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. अचानक तरुण वयात झालेले मृत्यू यांना जसं गूढ वलय आहे, तसंच विचित्र समीकरण त्याच्याशी जोडलं गेलंय आणि तेही ग्लॅमरचं.



माणूस जगण्याची इच्छा असूनही जगणं शक्य नाही असं वाटून आत्महत्या करतो, तेव्हा आपल्याला या समाजात डोकावावं वाटतं. मग ती सुशांतची आत्महत्या असो वा कर्जबाजारी शेतकऱ्याची. यांना आत्महत्या म्हणायचं की खून, असाच प्रश्न पडायला लागला आहे. समाज वा समाजातले घटक माणसाचं जगणं इतकं नामुश्कीचं करून ठेवतात की, एखाद्याला जगायला आवडत असतानासुद्धा मरून जावंसं वाटतं. चित्रपटसृष्टीत किंवा ग्लॅमरच्या विश्वात अशा अनेक आत्महत्या घडतात. कधी स्पर्धेमुळे, तर कधी अपयश न पेलता आल्याने. कधी प्रेमातलं अपयश, तर कधी स्पर्धेत टिकून राहू की नाही, या अनिश्चितीमुळे. हेच ग्लॅमरजगातील स्टार मृत्यूला कवटाळतात व तेही सहजपणे. असं का होतं? याकडे बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे.



सुशांतच्या आत्महत्येने अनेक प्रश्नांनी डोक्यात खेळ मांडायला सुरू केले आहे. नैराश्य, विफलता अशी कारणं पुढे येत असली, तरी कधीकधी वस्तुस्थिती वेगळी असूही शकते. ग्लॅमरजगतातल्या लोकांचं आयुष्य भिंगाखाली बघितलं जातं. या क्षेत्रात येण्यास करावं लागणारं स्ट्रगल, एकदा हे ग्लॅमर मिळालं की, ते कायम ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड यासाठी स्टार जिवाचं रान करतात. यात या क्षेत्रात आलेल्या अपयशाच्या बातम्या चवीने चघळल्याही जातात व याचा थोडाबहुत का होईना परिणाम या स्टार्सच्या मनावर होत असतो. आज सामान्य, साध्यासुध्या आयुष्यातही नानाविध अडचणी असतात. या स्टार्सच्या आयुष्यात तर या अडचणींचा करिअरच्या टप्प्याटप्प्यांवर जणू डोंगरच असतो.



सोशल मीडियाच्या अवास्तव महत्त्वामुळे स्टार्सच्या खासगी जीवनात सामान्य माणूसही इतका शिरला आहे की, नेमकं हे यश टिकवायचं कसं किंवा आपण काही चुकीचं वागलो तर त्याचे पडसाद कसे उमटतील, या विवंचनेत अडकणाऱ्या मानसिक अवस्थेकडे पाहायला कोणाला वेळ नाही. दुसरी गोष्ट या ग्लॅमरच्या जगात आज प्रचंड लोकप्रिय स्टार उद्या तितकाच लोकप्रिय असेल की नाही, याची शाश्वती नाही. लोकप्रियतेचा कळस गाठल्यानंतर राहणीमानातील बदल व आपण स्टार असलेली भावना अपयशाच्या गर्तेत अडकल्यानंतर अधिक विखारी होते. आपण करिअरच्या वाटेवर घेतलेले निर्णय, चुकीची किंवा बरोबर होत असलेली टीका, त्यात आलेलं अयशस्वी प्रेमप्रकरण, याचा स्टारच्या मनावर थोडाबहुत परिणाम घडत असतो. मात्र, या निराशेतून त्याला किंवा तिला बाहेर पडण्याची ताकद मिळत असेल, तर अशी अनेक माध्यमं त्याला वा तिला हे विसरायला भाग पाडत नाहीत आणि सततची ही नकारात्मक चर्चा ग्लॅमरच्या या मोहमयी क्षेत्रात इतकी मारक ठरते की, एकतर तो प्रवाहातून लांब तरी फेकला जातो किंवा नवीन वादांचा कायम बळी ठरत राहतो.



नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा आता प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार. आपल्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा नैराश्य आपल्याला ग्रासून टाकते. ग्लॅमरजगताशी या शब्दाचा अगदी जवळचा संबंध आहे. स्वत:बद्दल आत्मविश्वास राहिला नसून, सतत इतरांनी मला पसंत करावं किंवा स्तुती करावी असं वाटत राहण्याचं प्रमाणही या क्षेत्रात पाहायला मिळतं. सुशांतसिंहच्या बाबतीत हीच बाब जास्त प्रकर्षाने पाहायला मिळते आहे. आपल्या अत्यंत खासगी गोष्टी शेअर करता येतील, असं कोणी आजूबाजूला राहतच नसावं. हे सगळं बाहेर आलं तर आपल्याबद्दल कोण कसा विचार करेल, याची शाश्वती नसल्याने आत्महत्येचं पाऊल उचलण्याआधी हे सगळे विचार त्याच्याही मनात येणं साहजिक आहे. याला कारणीभूत आहे ते या ग्लॅमर क्षेत्रातील स्पर्धा व करिअरमधील चढ-उतार.

Web Title: editorial on sushant singh rajputs suicide and depression in glamour world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.