एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. मागील अकरा वर्षांत त्यांनी केलेले काम हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असेच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मी मोदीजींशी संवाद शाधून त्यांचे आशीर्वाद घेतले, तेव्हा ते म्हणाले होते, तुम्ही एक तळागाळातील नेते आहात, महाराष्ट्राला निश्चितपणे नवी उंची द्याल. चांगले काम करा, जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा नक्की सांगा, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू - त्यांचे हे शब्द आजही ऐकू येतात आणि नवे बळ देतात.
मुक्ततेविरोधात अपिलास प्रत्येकासाठी दार उघडे नाही; मालेगाव बॉम्बस्फोट : हायकोर्टाचे निरीक्षण
मी खरे तर शिवसैनिक. भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य पक्षाचे नेतृत्व करणारे मोदीजी माझ्यासारख्या शिवसैनिकाला विश्वासाने जबाबदारी देतात, ही अत्यंत मोठी बाब होती. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या. कधी काही मिनिटांचा संवाद, तर कधी दीर्घ चर्चा. प्रत्येक भेटीत त्यांचा सुस्पष्ट विचार, हलक्या-फुलक्या कोपरखळ्या आणि आत्मीयता अनुभवायला मिळाली.
मोदीजींचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या घरात जन्मलेला मुलगा, संघाचे संस्कार घेणारा स्वयंसेवक, नंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आणि अखेरीस देशाचा पंतप्रधान हा त्यांचा प्रवास म्हणजे एक यशकथा आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा यांची जिवंत प्रतिमा म्हणजे मोदीजी. गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आणि जगातील तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.
नुकतेच जीएसटी कर प्रणालीत ऐतिहासिक सुधारणा घडवून त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन आणखी सुकर केले. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या उपक्रमांनी देशाला नवी ओळख दिली. प्रधानमंत्री जनधन योजनेने आर्थिक समावेशन घडवून आणले. स्वच्छ भारत अभियानातून प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली. आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांना आरोग्याची हमी मिळाली, तर उज्ज्वला योजनेतून घराघरांना धुरमुक्त स्वयंपाकघर मिळाले.
जी-२० अध्यक्षपद भारतासाठी मोठी संधी ठरली. कोविडच्या कठीण काळात लहान देशांना लस पुरवून भारताने जगाला माणुसकीचा खरा चेहरा दाखवला. मेक इन इंडियामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची क्रांती झाली. दहशतवादाविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट कारवाई आणि ऑपरेशन सिंदूरसारखी पावले उचलून मोदीजींनी देशवासीयांच्या मनात नवा आत्मविश्वास जागवला. वेळोवेळी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून त्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली.
आज महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांत जो प्रगतिपथावर आहे तो त्यांच्यामुळेच हे नि:संकोचपणे मी सांगतो. गेमचेंजर अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, पालघर येथील जगातल्या आघाडीच्या वाढवण बंदराचे काम हे सर्व मोदीजी यांच्यामुळे होऊ शकले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने शेतकऱ्यांना आणि उद्योगांना नवी संधी उपलब्ध करून दिली. पीएम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो सन्मान योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली. स्मार्ट सिटी योजनेत पुणे, नागपूर, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांना नवे रूप प्राप्त झाले. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव आणि अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करणे त्यांच्यामुळे शक्य झाले. आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा त्यांचा निर्णय कोण विसरेल?
मी दोनदा दावोसला गेलो होतो. मोदीजींच्या नावाचा प्रभाव काय आहे तो तिथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात त्यांची जादू कामाला आली.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारांसोबतच मोदीजींचे कार्यही आम्ही शिवसैनिक असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देते. देशासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास जनतेचा विश्वास मिळतो हा त्यांचा संदेश मला आयुष्यभर मार्गदर्शक ठरेल.
आज भारत विकासाच्या मार्गावर झेपावला आहे. महिलाकेंद्रित धोरणे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त कारभार यामुळे देशात नवी आशा निर्माण झाली आहे. अकरा वर्षांत मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. काही विरोधकांनी देशाबाहेर जाऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेने त्यांच्यावरचा विश्वास अबाधित ठेवला. त्यांचे भाषण कौशल्य, संवाद साधण्याची शैली आणि संवेदनशीलता यामुळे ते आज जगभरात लोकप्रिय झाले आहेत.
मोदीजींनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र आता देशाचा मूलमंत्र झाला आहे. त्यांनी दिलेली गती केवळ वर्तमानापुरती नाही, ती भावी पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
आमचे सगळ्यांचे आशास्थान, नवे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!