शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आपण ते हमाल, भारवाही !

By किरण अग्रवाल | Updated: June 7, 2018 07:26 IST

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हल्ली अभिव्यक्तीचे पाट वाहू लागले आहेत, हे एका अर्थाने चांगलेच म्हणायला हवे; कारण विचारांना चालना देण्याचे काम त्यातून घडून येते.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हल्ली अभिव्यक्तीचे पाट वाहू लागले आहेत, हे एका अर्थाने चांगलेच म्हणायला हवे; कारण विचारांना चालना देण्याचे काम त्यातून घडून येते. परंतु हे होताना, अनेकजण अनावश्यकरीत्या दुसऱ्याच्या विचारांचे वाहक बनू लागल्याने त्यांच्या स्वत:च्या प्रतिमा, प्रतिष्ठा व वैचारिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक ठरून जावे. यात व्यक्तिगत भाव-भावनांशी अगर विचारांशी साधर्म्यता साधण्यातून लाभणारी सहमती समजता येणारी असली तरी, विशेषत: राजकीय टीका-टिप्पणीच्या बाबतीतही केली जाणारी ‘ढकलेगिरी’ (फॉरवर्डिंग) संबंधितांची जाण व त्यांचा आवाका उजागर करून देणारीच ठरते. राजकीय भक्त संप्रदाय वाढीस लागले आहेत तेही यातूनच.

विज्ञानाने मनुष्याला प्रगतिशील बनविले हे खरेच, परंतु त्याचबरोबर त्याला भारवाहकही कसे बनविले हे जाणून घ्यायचे असेल तर, आपल्याकडील ‘सोशल मीडिया’वरील आचार-विचारांच्या फॉरवर्डेड सुळसुळाटाकडे पाहायला हवे. तरुण पिढीच काय, पण हल्ली सेवानिवृत्तीमुळे किंवा कामधंद्यातून रिकामपण वाट्यास आलेली ज्येष्ठ मंडळीही हातातील मोबाइललाच बिलगलेली आढळून येते. मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी बहुविधमार्गे लाभणारी संप्रेषणाची सुविधा पाहता, आज जग प्रत्येकाच्या हाती आले आहे. त्यामुळे माहिती, मनोरंजनासोबतच अभिव्यक्तीच्या वाटाही मोकळ्या होऊ लागल्या आहेत. याबद्दल आक्षेप असण्याचेही कारण नाही. पण, स्वत:चा वेळ घालवता घालवता अनेकजण उधार-उसनवारीच्या विचाररांची, संदेशांची ढकलेगिरी करून आपल्याच ग्रुपमधील किंवा ‘वॉल’वरील सहकारी मित्रांना भंडावून सोडू लागल्याने यासंबंधीचे दुखणे सार्वत्रिक ठरून गेले आहे. मोबाइलवरील ‘एसएमएस’च्या चलतीच्या काळात अमुक इतक्या जणांना मॅसेज फॉरवर्ड करा व चोवीस तासात ‘गुडन्यूज’ मिळवा, अशा आशयाचे फालतु प्रकार खूप चालत; आजही ते सुरूच आहेत हा भाग वेगळा, परंतु तो प्रकार जितका वा जसा संबंधितांची अक्कल काढणारा ठरत असतो तसा व तितकाच तो राजकीय नेत्यांवरील टीका-टिप्पणीयुुक्त संदेशाची ‘ढकलेगिरी’ करणाºयांच्या बाबतीतही त्यांची ‘समज’ तपासण्यास उद्युक्त करणारा ठरतो. म्हणूनच दुसऱ्यांनी पाठविलेले राजकीय संदेश ‘फॉरवर्ड’ करण्यापूर्वी साकल्याने विचार केला जाणे गरजेचे आहे.

या प्रदीर्घ प्रस्तावनेचे कारण असे की, सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारची नियत चांगली नाही असे म्हणत, शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. या अनुषंगाने पवार यांना उद्देशून सोशल मीडियात ‘कळलाव्या नारद’ अशा आशयाने एक संदेश फिरत आहे. सातत्याने व दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या व त्यातही देशाचे कृषिमंत्रिपद भूषविलेल्या पवार यांनी त्यांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांचे किती भले केले हा वेगळा चर्चेचा विषय नक्कीच व्हावा. तथापि, तशी चर्चा करताना राजकारणापलीकडील या नेत्याचे कार्य, अभ्यास अगर जाणतेपण कसे व कुणाला दुर्लक्षिता यावे? परंतु राजकीय अभिनिवेष बाळगणाऱ्यांखेरीज मिसरुडही न फुटलेले किंवा पवारांच्या राजकीय अनुभवाएवढे वय नसलेले तरुणही असले संदेश पुढे ढकलताना दिसून येत आहेत. बरे, हे पहिल्यांदाच किंवा केवळ पवार यांच्याच बाबतीत होते आहे अशातलाही भाग नाही. पंतप्रधान नरेंदद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी व अन्यही अनेक नेत्यांबाबत असे राजकीय प्रेरणेतून आकारास आलेले प्रचारकी साहित्य सोशल मीडियावर भिरभिरत असते. स्वत:चे मत नसलेले अनेकजण असे संदेश फॉरवर्ड करण्यात स्वारस्य दाखवतात. हे खरे की, अलीकडे तरुणांच्याही राजकीय जाणिवा प्रगल्भ झाल्या आहेत. ते चांगलेच आहे. राजकारणातील स्वच्छतेसाठी या तरुण पिढीचा पुढाकार गरजेचाही आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, अजाणतेपणातून उगाच कुणाच्याही निंदा-नालस्तीच्या मोहिमेत त्यांचा सहभाग घडून येणार असेल, तर ते कुणी लक्षात आणून द्यावे की नाही?

राजकीय मुद्दे अथवा व्यक्तीसंबंधीच्या मतांबद्दल सहमती असलेली व्यक्ती ही आक्षेपिताच्या समकालीन असेल किंवा त्या विषयातील जाणकार असेल तर एकवेळ समजूनही घेता यावे; परंतु राजकीय मत व जाण नसलेले ‘नेट’करी, ज्यात विद्यार्थीवर्गाचाही समावेश आहे, उगाच इकडून आलेले संदेश तिकडे ढकलण्यात समाधान मानताना दिसून येतात. हा प्रकार म्हणजे ‘मी तो हमाल, भारवाही’ अशातलाच आहे. कारण कथित बाबीतल्या वास्तविकतेशी परिचित नसताना किंवा त्यासंबंधी जाण नसताना सोशल मीडियातील हे हमाली काम घडून येत असते. असे करण्यातून त्यांच्या ‘समजे’चे तारे तर तुटतातच, परंतु संबंधित राजकीय भक्ती संप्रदायाचा शिक्काही बसून गेल्याखेरीज राहत नाही. राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ‘मॅनेजर्स’ना हे असे भारवाही हवेच असतात. कारण त्यातून त्यांना आपल्या पक्षासाठी पूरक ठरणारा परिणाम साधणे अपेक्षितच असते. तेव्हा अशांचे आपण भारवाहक बनायचे का, हा यातील खरा प्रश्न आहे. सोशल मीडियातून उगाच घडून येणाऱ्या या ओढवलेपणाकडे वा अडकलेपणाकडे म्हणूनच गांभीर्याने बघायला हवे. आपली मते असतील तर ती ठामपणे मांडायला हरकत नाही, मात्र दुसऱ्यांचे ‘भारवाही’पण नको, हाच यातील सांगावा.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरFacebookफेसबुक