शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आजचा अग्रलेख: शुभांगी, आम्हाला माफ कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:13 IST

Editorial : ज्या सामाजिक सुधारणांचा, प्रबोधनाचा आणि पुरोगामी परंपरेचा आपण अभिमान बाळगतो, त्यावर वारसा हक्क सांगायच्या लायक आपण आहोत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा घटना वारंवार घडत आहेत.

ज्या सामाजिक सुधारणांचा, प्रबोधनाचा आणि पुरोगामी परंपरेचा आपण अभिमान बाळगतो, त्यावर वारसा हक्क सांगायच्या लायक आपण आहोत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा घटना वारंवार घडत आहेत. पुण्यातील सातजणांच्या निर्घृण हत्याकांडाच्या बातमीची शाई वाळते ना वाळते तोच प्रेमसंबंधाच्या विरोधातून वडील, भाऊ आणि इतर नातेवाइकांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना समोर आली. संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना नेमक्या याच दिवशी ही घटना उघडकीस यावी, हा कसला दैवदुर्विलास? मानवी मूल्यांची, हक्कांची आणि अधिकारांची जपणूक करण्याची मुभा देणाऱ्या लोकशाही राज्यव्यवस्थेत एक सुजाण नागरिक म्हणून राहण्याची आपली अर्हताच अक्षम ठरविणारी ही घटना आहे. शिवाय, ती एकमेव नक्कीच नाही. जातीय अहंता आणि खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी अशा अनेक तरुण-तरुणींच्या नरडीला नख लावले गेले आहे.

नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी गावात राहणारी शुभांगी जोगदंड ही उच्चशिक्षित तरुणी होती. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या मुलीचा गुन्हा काय, तर गावातीलच एका तरुणावर जडलेले प्रेम! घरच्यांना ते मान्य नव्हते. प्रेम ही हळुवार भावना असते. अलवार वयात एखाद्याच्या प्रेमात पडणं, ही तशी नैसर्गिक बाब. प्रेमासाठी परवानगी घेणं अथवा घरच्यांना विचारून प्रेम करणं या दोन्ही गोष्टी अशक्यप्राय. तितक्याच हास्यास्पद; पण मुलांना खासगी मालमत्ता समजणाऱ्यांना हे कोण समजावून सांगणार? मुलगी मग ती सज्ञान असो की उच्चशिक्षित. कुटुंबाने आखलेली लक्ष्मणरेषा तिने ओलांडता कामा नये, ही अपेक्षाच मुळात गैरवाजवी. सामाजिक, जातीय चौकटी मोडून प्रस्थापित उंबरठा ओलांडणाऱ्या तरुण/तरुणींना जीवानिशी मारून टाकण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ ही बुरसटलेल्या मानसिकतेचे द्योतक आहे.

खर्ड्यातील नितीन आगेपासून ते सोनईतील हत्याकांडापर्यंत जातीय अहंकारातून निर्माण झालेल्या सूडभावनेने घेतलेल्या बळींची संख्या मोठी आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून पोटच्या मुलीला फासावर लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची घटना मागच्याच महिन्यात जालन्यात घडली. वैजापुरात तर जन्मदात्री माताच वैरीण निघाली. तिने लहान मुलाच्या सोबतीने मुलीचा जीव घेतला. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या’ (एनसीआरबी) आकडेवारीनुसार वर्षभरात किमान शंभर एकजण अशा ‘ऑनर किलिंग’चे बळी ठरत आहेत. आदिम अवस्थेतील मानवाकडूनदेखील अशाप्रकारचे अमानवीय कृत्य घडल्याचे दाखले मानववंशशास्त्रात मिळत नाहीत. मिळतील तरी कसे? सभ्य समाजाने आखलेल्या जातीय, धार्मिक चौकटी तेव्हा होत्याच कुठे! आधुनिक म्हणविणाऱ्या समाजाने अशा बेगडी अहंगंडाने आजवर पोटच्याच जीवांचे किती बळी घेतले, याची गणतीच नाही. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या, मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या अशा घटना ज्या समाजात वारंवार घडतात, तो समाज सभ्य कसा असू शकतो? कायद्याने अशा घटनांना अटकाव बसू शकेल, ही तर निव्वळ अफवाच! बालविवाहापासून स्त्री भ्रूणहत्येपर्यंत सामाजिक कुप्रथांना प्रतिबंध घालणारे कायदे तयार झाले म्हणून त्यास आळा थोडाच बसला? ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनांसाठी आजवर हरयाणा, राजस्थान ही राज्ये चर्चित होती. खापसारख्या जातीय पंचायतींचा त्याला हातभार असे. मात्र, महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यदेखील आता मागे राहिलेले नाही. जातीय अभिमानाचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. आंतरजातीय विवाहाचा रक्तरंजित शेवट केवळ आता ‘सैराट’ सिनेमापुरता मर्यादित राहिलेला नाही. बेगड्या सामाजिक प्रतिष्ठेने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत.

शुभांगीने तर जातीचीदेखील पायरी ओलांडली नव्हती. स्वजातीतील मुलाच्याच ती प्रेमात होती. प्रेम करणं हा गुन्हा नाही. मग त्यासाठी एवढी शिक्षा का? पोटच्या मुलीचा जीव घेताना बापाचा हात कसा थरथरला नाही? शुभांगी, तू मुलगी म्हणून जन्माला आलीस हाच तुझा दोष. ‘वंशाच्या दिव्या’साठी तुझ्यासारख्या अनेक ‘पणत्या’ आजवर या समाजाने विझवून टाकल्या आहेत. आज त्यांचीच लग्नाळू खोंडं विवाहायोग्य मुलींच्या शोधात दारोदार फिरत आहेत. शुभांगी, तुझ्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल; पण समाज म्हणून आम्ही तुझा आणि तुझ्यासारख्या अनेकींचा जीव वाचवू शकलो नाही. जमलं तर आम्हाला माफ कर!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र