शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:59 IST

शिंदेंचा पवारांनी सत्कार करणे, शिंदेंचे रुसवेफुगवे, अजित पवारांचे फडणवीसांना भक्कम समर्थन या घडामोडींचा अर्थ काय आहे?

यदु जोशी, सहयोगी संपादक,लोकमत

बारामतीत पाऊस पडला की संजय राऊत मुंबईत छत्री उघडतात असे गमतीने म्हणतात. कोणी असा दावा करीत होते की, शरद पवार यांचे डोके दुखत असेल तर राऊत सॅरिडॉन घेतात अन् आश्चर्य म्हणजे त्यांनी सॅरिडॉन घेतल्याने पवार यांना लगेच बरे वाटते. पवारांशी इतके सख्य असलेल्या राऊतांवर त्यांचे विरोधक हे शिवसेनेतील पवारांचा माणूस असाही आरोप करत आले आहेत. 

उद्धव ठाकरे आणि राऊत एकाच हेलिकॉप्टरमधून जात होते, राऊत यांना झोप लागली आणि ते झोपेत ‘होय पवार साहेब, होय पवार साहेब!’ असे म्हणाले. ते ऐकून उद्धवजींच्या भुवया उंचावल्या, असाही विनोद मध्यंतरी फिरला होता. परवा मात्र गहजब झाला. राऊत थेट पवारांवर भडकले, राजकारण आम्हालाही कळते, असे त्यांनी सुनावले. असा सामना पहिल्यांदाच पाहायला मिळाला; त्याचा पुढचा अंक काय असेल? एकनाथ शिंदेंचा सत्कार पवार यांनी केल्याने उद्धव सेना अस्वस्थ झाली आहे. आता दिल्लीतील त्याच समारंभाला उद्धवसेनेचे मुंबईतील खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते, ही बाब समोर आल्याने उद्धवसेनेची जरा पंचाईत झाली आहे. 

पवारांनी शिंदेंचे कौतुक केले, त्याचवेळी उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटले, दोघांत गुप्तगू झाली होती. राऊत यांचा त्यावर आक्षेप नाही. अमित शाह यांनी शिंदेंच्या मदतीने शिवसेना फोडली म्हणून दोघांवरही त्यांनी आगपाखड केली. पण, सगळ्या हालचालींचे खरे सूत्रधार आणि ‘अंमल’दार तर फडणवीसच होते. शाह, शिंदेंचा तिटकारा अन् फडणवीसांच्या गळाभेटी हे तर्कसंगत वाटत नाही. शिंदेंचा पवारांनी सत्कार करणे, शिंदेंचे रुसवेफुगवे, अजित पवारांचे फडणवीसांना भक्कम समर्थन या घडामोडींचा अर्थ काय आहे? राजकारणात आपली जागा स्वत:च बनवायची असते.  प्रत्येक जण ती बनवत असतो आणि राजकीय शहाणपणही त्यातच असते. ज्याला तसे करण्यात अपयश येतेे, तो मागे पडतो. उद्धवसेनेला याचा विचार करावा लागेल. 

पुढच्या पाच वर्षांतही कालसंगत राहण्यासाठी शरद पवार भूमिका शोधत आहेत. दहा आमदार असले तरी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहायचे आहे, संख्याबळाच्या आधारे ते शक्य नाही. अशावेळी  टिकून राहण्यासाठी शिंदेंच्या सत्कारासारख्या खेळी ते खेळत राहतील.  मध्येच पुणेरी पगडी, फुले पगडीसारखे विषय हाताशी असतीलच. भावनिक, सामाजिक, धार्मिक मुद्यांना हात घातल्याने राजकारणाचा फोकस आपल्यावर राहतो हे पवार यांना साठ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाने नेमके कळले असणारच. अजितदादांनी भूमिका शोधली आहे आणि ते पाच वर्षांसाठी निश्चिंत झाले आहेत. फडणवीसांचे बोट घट्ट धरून ते सत्ताकवचाखाली सुरक्षित राहतील. काँग्रेसला फरक पडत नाही. या पक्षाची मुळेच इतकी घट्ट आणि खोलवर आहेत की वर्ष-दोन वर्षे कोणती भूमिकाच  घेतली नाही तरी पक्ष चालत राहतो. त्यामुळे काही महिने, वर्षे काँग्रेस कुंभकर्ण राहिली तरी पक्ष चालूच राहणार आहे. शिंदेंचे जे रुसवेफुगवे चालले आहेत, त्याने फार काही साध्य होईल, असे वाटत नाही. सरकारमधील वजन आणि जनतेतील प्रतिमा कशी उंचावेल यावर फोकस करणे,  हीच त्यांच्यासाठी योग्य भूमिका असू शकते. उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता फक्त त्रागाच करीत राहिली तर अडचणी वाढतील. भाजप आणि त्यातल्या त्यात फडणवीस तर चाणाक्ष आहेत, कोणाला कधी, कसे खेळवायचे, याचे कौशल्य आहेच त्यांच्याकडे. ते कौशल्य बरोबर वापरतील अन् आरामात सत्ता करतील. हे सपकाळ कोण आहेत?

नाना पटोले यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.  प्रस्थापित नावे स्पर्धेत असताना त्यांना संधी मिळाली. राज्यातील काँग्रेस प्रस्थापितांच्या हातून काढून घेण्याचे हे स्पष्ट संकेत मानले पाहिजेत. सपकाळ हे बुलढाण्याचे. तेथे ते जिल्हा परिषदेचे दोन वेळा सदस्य होते, तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते, एकदा आमदारदेखील होते. स्वत:चे शाळा, कॉलेज वगैरे काही नाही, पत्नी शाळेत शिक्षिका आहे. सपकाळ गेल्या काही वर्षांमध्ये दिल्लीच्या पक्षसंघटनेत रमले. राहुल ब्रिगेडचे सदस्य मानले जातात. बावनकशी काँग्रेसमन आहेत. छक्केपंजे नाहीत, निर्मळ मनाचे आहेत. पक्षाची लाइन सोडत नाहीत. हायकमांडने त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस प्रदेशाध्यक्ष म्हणून दिला आहे. त्यामुळे गटबाजी न करता सगळ्यांना त्यांचे ऐकावेच लागेल. सपकाळ हे बिनडाग आहेत; नेत्यापेक्षा कार्यकर्तेच अधिक वाटतात. मात्र, डावपेचांशिवाय न करमणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या गर्दीत त्यांची घुसमट होण्याची भीती वाटते. गोमाल या जळगाव जामोद तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावचा सरपंच जुमानसिंगची एक स्टोरी सपकाळ यांनी मध्यंतरी सोशल मीडियावर शेअर केली होती, त्यात जुमानसिंगची नकारात्मक व्यवस्थेने कशी कोंडी केली, त्याचे वर्णन होते. ते प्रदेशाध्यक्ष झाले आहेत; काँग्रेसमधील नकारात्मकतेने त्यांचाही जुमानसिंग होऊ नये एवढेच.

जाता जाता : पेशव्यांच्या दरबारात नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्यात शह - काटशह चालत. महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात मात्र फडणवीस - शिंदे एकत्र आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणतात, पण ती या नावांबाबत अजून तरी झालेली नाही. पण होणारच नाही हे कोणी पाहिले?    yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस