शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भोंदूबाबाचे भोळे बळी ! पाखंडाला मानवतेचे ढोंग जोडण्याचा प्रयत्न करणारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 06:02 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घोषित केली आहे

दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सिकंदराराऊ येथे सत्संगावेळी चेंगराचेेंगरीत मरण पावलेले १२२ जण हे श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या अव्यस्थेचे निष्पाप बळी आहेत. नारायण साकार हरी ऊर्फ भोले बाबा नावाच्या भोंदूचे प्रवचन ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेले भोळेभाबडे भक्त तो बुवा आलिशान गाडीत निघून जात असताना त्याच्या दर्शनासाठी तसेच त्याच्या वाटेवरची माती कपाळाला लावण्यासाठी वेड्यासारखे धावले. त्या बाबाच्या सेवादारांनी महिला, मुले अधिक असलेल्या भक्तांचा लोंढा निर्दयीपणे रोखला. परिणामी, चेंगराचेंगरी झाली. त्या बाबाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्पर्श, दर्शन मोक्ष देणार आहे असे समजून गर्दीच्या लोंढ्यात अनेकजण खाली पडले. बाकीच्यांनी बेभान होऊन त्यांच्या शरीरांचा व मृतदेहांचा चिखल बनविला.

हे इतके भयंकर होते की चोवीस तासांनंतरही अनेकांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये महिला व मुले मोठ्या संख्येने आहेत. ही अत्यंत उद्विग्न करणारी दुर्घटना आहे. अशिक्षित, अंधश्रद्धांच्या जोखडांमध्ये अडकलेला समाज सार्वजनिक भान आणि सोबतच स्वत:च्या जीविताबद्दल किती बेफिकीर होऊ शकतो, याचे हे अत्यंत उद्विग्न करणारे उदाहरण आहे. तथापि, केवळ दुर्घटना म्हणून या बळींकडे पाहता येणार नाही. मुळात सत्संगाच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येणार हे माहिती असतानाही प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही, आपल्यामागे लाख-दोन लाखांचा लोंढा धावतो आहे, हे लक्षात येऊनही स्वत:ला संत म्हणविणारा तो भोंदू बाबा थांबला का नाही, सेवादार म्हणविणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी जमावाची काळजी का घेतली नाही, आजूबाजूच्या शेतात उतारावर घसरून पडलेल्या व त्यांच्या अंगावरून इतर लोक धावत गेल्याने चेंदामेंदा झालेल्या भक्तांचा आकडा लपवून ठेवण्याचा प्रयत्न का झाला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती घोषित केली आहे. तथापि, अशा समित्यांचे अहवाल काय असतात व त्यांचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असल्याने या चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांना न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर पाखंडी बाबा गायब आहे. मानव मंगल मिशन असे नाव देऊन आपल्या पाखंडाला मानवतेचे ढोंग जोडण्याचा प्रयत्न करणारा हा भोले बाबा प्रत्यक्षात भोळा अजिबात नाही. मूळचा कासगंज जिल्ह्यातील बहादूरनगर गावचा रहिवासी असलेल्या या बाबाचे खरे नाव सूरजपाल जाटव. तो पोलिस खात्याच्या स्थानिक गुप्तचर विभागात शिपाई होता. नोकरीवर असताना विनयभंगाच्या आरोपात त्याला अटक झाली. तो निलंबित झाला. नंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला पुन्हा नोकरी मिळाली आणि ती मिळताच त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग, त्याला परमेश्वरी साक्षात्कार झाला म्हणे. स्वत:चे नाव त्याने नारायण साकार हरी असे बदलून घेतले व तो प्रवचने झोडायला लागला. लोक त्याला भोले बाबा म्हणायला लागले.

यादरम्यान, अघाेरी उपचार प्रकरणात आग्रा येथे या बाबासह सातजणांवर गुन्हाही दाखल झाला होता. सबळ पुराव्याअभावी तो सुटला. इतर बाबांसारखा हा भोले बाबा सोशल मीडियावर नाही. त्याऐवजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व हरयाणा या राज्यांच्या सीमाभागात म्हणजे राजधानीच्या दिल्लीच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे फरिदाबाद, पलवल, मथुरा, आग्रा, पिलिभित, अलीगढ, बुलंदशहर ते अगदी औरेया, कानपूर व ग्वाल्हेरपर्यंत गावोगावी त्याचे मोठे प्रस्थ आहे. मंगळवारच्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये या चार राज्यांमधील तब्बल सोळा जिल्ह्यांचे भक्त आहेत, यावरूनच काय ते स्पष्ट व्हावे. एरव्ही अशी घटना घडली की काहूर माजते.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. परंतु, उत्तर प्रदेशात धर्माचे अधिकारी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यांचे विरोधक, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच गेल्या वर्षी या बाबाच्या दरबारात हजेरी लावून भक्तांपुढे भाषण केले होते. त्यामुळे भाेले बाबाला शिक्षा होण्याची शक्यता नाही. त्यातही अशा विषयावर राजकारण नको, असे उपदेशाचे डोस योगींनी विरोधकांना पाजले आहेत. निरपराध, भोळ्याभाबड्या, श्रद्धाळू सामान्य माणसांच्या अशा शे-सव्वाशे बळींच्या मुद्द्यावर बोलायचे नसेल, मग राजकारण करायचे तरी कशावर, हे एकदा योगी व त्यांच्या भक्तांनी सांगून टाकायला हवे.