कवी प्रदीप यांच्या सिद्धहस्त प्रतिभेचे लावण्य आणि लता मंगेशकर यांच्या कोकीळकंठातून काळाच्या कातळावर कोरल्या गेलेल्या, कोई सिख, कोई जाट-मराठा; कोई गुरखा, कोई मदरासी, सरहद पर मरनेवाला; हर वीर था भारतवासी...
या अजरामर ओळींना सहा दशके उलटून गेली आहेत. भारत-चीन युद्धानंतर दिल्लीच्या रामलीला मैदानावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासमक्ष हे गीत २७ जानेवारी १९६३ ला पहिल्यांदा गायले गेले. काल, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नरसंहारात जीव गमावलेल्या बंगाली, मराठी, ओडिया, गुजराथी पर्यटकांचे संदर्भ दिले. तेव्हा, ‘ऐ मेरे वतन के लाेगो...’ गीतामधील विविधता अधोरेखित झाली. काश्मीर खोऱ्यातील मंगळवारच्या भ्याड हल्ल्यानंतर देश क्षुब्ध आहे. अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोरात आहे. देशभर मृत पर्यटकांना श्रद्धांजलीच्या मेणबत्त्यांसोबतच पाकिस्तानचे प्रतीकात्मक पुतळे पेटविले जात आहेत. भारतीयांच्या मनात संतापाचा आगडोंब उसळला आहे. अशावेळी वाईट प्रसंगातही काही चांगले घडत असेल तर ते देशवासीयांच्या चिरपरिचित एकजुटीचे दर्शन. धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, प्रादेशिक विविधतेचे आवाज एकमेकांत मिसळून गेले आहेत. त्या सर्वांमधून देशभक्तीचा एकच आवाज बुलंद झाला आहे.
भारतीयांमध्ये काही मतभेद असतील, काहीवेळा मनभेदही होत असतील, भांडणे किंवा वाद असतील; तथापि, संकटसमयी आपण भारतीय एक होतो. ऐक्याची वज्रमूठ बांधली जाते. शत्रूंवर तिचा मर्मभेदी प्रहार होतो, हेच यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. अशा निस्सीम राष्ट्रप्रेमाचे दर्शन १९६२ च्या चीन युद्धावेळी घडले. १९६५ मध्ये ‘जय जवान, जय किसान’ नारा घुमला. भुकेचा सामना करण्यासाठी आठवड्यात एका उपवासाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आवाहन देशाने स्वीकारले. १९७१ साली बांगलादेशनिर्मितीवेळी पाकिस्तानसोबत अमेरिकेनेही डोळे वटारले, तेव्हा स्वाभिमानी भारतीयांनी त्या महाशक्तीच्या नजरेला नजर भिडवली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पाकिस्तानचे दोन तुकडे केले. १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल-द्रास भागात घुसखोरीची आगळीक केली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात सैन्याने पुन्हा अदम्य शाैर्य दाखविले. पाकिस्तान्यांना पळता भुई थोडी केली. तसाच एकमुखी आवाज आणि एकसंध प्रतिसाद आता पहलगाम हल्ल्यानंतर उमटतो आहे. या एकजुटीचा पहिला हुंकार जम्मू-काश्मिरातून झाला.
पहलगामचा दहशतवादी हल्ला मानवतेवर, काश्मिरियतवर, भारतीयत्वावर आहे, असे सांगून खोऱ्यातील जनतेने निषेध नोंदविला. दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रतिसादापेक्षा काश्मिरी जनतेमधील हे स्थित्यंतर पाकिस्तानसाठी अधिक धक्कादायक असावे. कारण, खोऱ्यातील जनता साेबत असल्याच्या वल्गना पाकिस्तान गेले पाऊण शतक करीत आला आहे. पाठोपाठ देशभरातील राजकीय पक्षांनी एकजूट दाखविली. गुरुवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सरकार जे करील त्याला एकमुखी पाठिंबा जाहीर केला. हा हल्ला झाल्यानंतर काही तासांतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सहकार्याचा शब्द दिला. दोघांची ही कृती दुर्मीळ होती. राजकीय अभिनिवेश स्पर्धेऐवजी शत्रुत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची अलीकडच्या काही वर्षांतील अनेक उदाहरणे समोर असताना अशा संकटसमयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची भूमिका घेतली म्हणून सरकारचे आणि त्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘हम सब एक है’ ही कोट्यवधींची भावना समजून घेतली म्हणून विरोधकांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या बैठकीत सहभागी झाले असते आणि त्यांनी विरोधकांच्या या प्रतिसादाचा आदर केला असता तर अधिक चांगले झाले असते.
पहलगाममधील रक्तपाताने केवळ राजकीय वैरच बाजूला फेकले गेले असे नाही, तर टोकाला पोहोचलेला धार्मिक द्वेषही देशप्रेमात विरघळून गेला आहे. देशभरातील मुस्लीमधर्मीयांनी शुक्रवारी पवित्र नमाजावेळी दंडावर काळ्या फिती बांधून व्यक्त केलेली सहवेदना हीदेखील दखलपात्र आहे. काही जण अजूनही या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते यशस्वी होणार नाहीत, याची ती सामूहिक ग्वाही व जगाला दिलेली द्वाहीदेखील आहे.