शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 05:44 IST

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

अलीकडील एक-दोन दशकात मान्सूनच्या पावसाची लय आणि चाल दोन्ही बिघडत असल्याचे दरवर्षी दिसते आहे. भारतात मान्सूनचा पाऊस  हा एकच पावसाळ्याचा ऋतू आहे. तो साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर असतो. मात्र या चार महिन्यातील कोणत्या आठवड्यात किंवा महिन्यात जोरदार पाऊस होईल याचा अंदाज लागत नाही. गतवर्षी जूनमध्ये एकूण पावसाच्या २१ टक्के पाऊस अपेक्षित असताना तो ३५ टक्के पडला. ऑगस्टमध्ये २८ टक्के अपेक्षित असताना केवळ १६ टक्केच पडला. वर्षाअखेरीस सरासरी १०९ टक्के पाऊस पडला. टक्केवारीच्या भाषेत उत्तम  अपेक्षेइतका पाऊस झाला असला तरी तो सलग होत नसल्याने पिकांच्या उगवणीवर  आणि वाढीवर परिणाम करून जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. यावर्षीची थंडी लवकर संपली आणि मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतात कडक ऊन पडल्याने गव्हाचे उत्पादन एक कोटी टनाने घसरले. हा फटका शेतकऱ्यांना बसला आणि ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. निर्यातीवरही बंधने घालण्याची वेळ आली.  

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्राचे पाऊसमानाचे मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील प्रत्येकी एक-दोन जिल्ह्यांचा अपवाद सोडला  तर पावसाने अजून सरासरी गाठलेली नाही. २० ते ५६ टक्क्यांपर्यंत या जिल्ह्यात पाऊस कमी आहे. विदर्भात यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांत फारच कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली इत्यादि जिल्ह्यांत अपवादवगळता बहुतांश तालुके कोरडे आहेत. हीच अवस्था मराठवाड्यात आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. याचा परिणाम जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी महाराष्ट्रात सरासरी साठ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आणि जुलैमध्ये दांडी मारल्याने दुबार पेरण्यांचे संकट उद्भवले होते. यासाठीच मावळते कृषिमंत्री दादा भुसे पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन करीत खरिपाच्या तयारीचा विभागवार आढावा घेत होते.

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना गती आलीच नाही. ज्या भागात पाऊस झाला आहे तेथे सोयाबीन आणि इतर कडधान्यांची पेरणी झाली आहे. जुलैपासून पावसाने जोर धरला असला तरी काही जिल्ह्यात सात दिवस एक मिलीमीटरदेखील पावसाची नोंद झालेली नाही. त्या तुलनेने कोकण किनारपट्टी आणि  सह्याद्री पर्वतरांगांच्या भागात आता पावसाने जोर धरला आहे. धरणांचा सरासरी पाणीसाठा आता वाढू लागला आहे. मुंबईने सरासरी बावीसशे मिलीमीटरपैकी एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद  गाठली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये महाबळेश्वर, आंबोली, कोयनानगर, भंडारदरा, ताम्हिणी घाट या परिसराने चार-पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी गाठली आहे.  लय आणि चाल बदलणाऱ्या मान्सूनच्या पावसाची धडकीच भरते आहे. याचा सर्वात मोठा फटका २००५  मध्ये मुंबई महानगरीला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापणाऱ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला बसला होता. २००६, २०१९ आणि २०२१ या तीन हंगामात पावसाने लय आणि चाल बदलून झोडपून काढले होते.

गतवर्षी मान्सूनच्या परतीच्या पावसाने मराठवाडा अक्षरशः धुवून काढला होता. प्रचंड हानी झाली. वाईटात चांगले घडते म्हणतात तसे मराठवाड्याचा रब्बीचा हंगाम चांगला गेला. उसाचे प्रचंड उत्पादन आले. सलग दोन वर्षे पावसाने उत्तम सरासरी गाठल्याचा तो  परिणाम होता. पण, पीकपद्धतीनुसार होणारे अतिउत्पादन किंवा नापिकी या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांचा तोटा करून जातात. सरकारलादेखील शेतमालाच्या उत्पादनाचा अंदाज येत नाही. आयात-निर्यातीचे वेडेवाकडे निर्णय घेऊन बाजारपेठेत विनाकारण हस्तक्षेप केला जातो, परिणाम शेतमालाचे दर कमी होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. हवामान बदलाने हे सर्व घडते आहे. याबद्दल आता संदिग्धता नाही. आसाम गेले तीन-चार आठवडे महापुरात डुबतो आहे आणि राजस्थान अचानक झालेल्या जोरदार पावसाने सावरतो आहे. याचा अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस