मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:05 AM2022-04-14T07:05:56+5:302022-04-14T07:06:25+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध निमित्ताने होणारी भाषणे आणि महाराष्ट्राची वाटचाल याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही, ते अंतर अधिकच वाढत चालले आहे.

editorial on mns chief raj thackeray speech | मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

googlenewsNext

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध निमित्ताने होणारी भाषणे आणि महाराष्ट्राची वाटचाल याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही, ते अंतर अधिकच वाढत चालले आहे. राज ठाकरे यांचा विचार, आचार आणि कृतीत कोणतेही सातत्य नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण’ या पक्षाची संकल्पनाच स्पष्टपणे मांडता आलेली नाही. त्यानुसार कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही. प्रभावी भाषणाने अनेक जुनेच मुद्दे नव्या आवेशात जनतेसमोर मांडण्याचे कौशल्य राज ठाकरे यांच्याकडे आहे. एवढीच त्यांची जमेची बाजू! पण तो काही राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. महाराष्ट्रात नवे काय निर्माण करायचे आहे आणि त्याचा कृती आराखडा काय असू शकतो, याची स्पष्टता नाही. हिंदुत्वासारखे मुद्दे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेले आहेत.

भारतातील बहुसंख्याकांनी अद्यापही हिंदुत्व किंवा हिंदुराष्ट्राला बहुमत दिलेले नाही. महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर घ्यायच्या भूमिकेवर स्पष्ट धोरण नसल्याने त्यांना राजमार्गच सापडत नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देश पातळीवर उदयास आले तेव्हा राज ठाकरे त्यांचे समर्थक होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मते द्या, असे न सांगता त्यांनी भाजपविरोधात दहा मोठ्या सभा घेतल्या. त्यात नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचे व्हिडिओ आणि सत्तेवर आल्यावर घेतलेल्या भूमिका याची मांडणी केली; पण कोणाला मते द्या, हे सांगितले नाही. राज ठाकरे यांना राजमार्गच सापडलेला नाही, हाच त्याचा अर्थ होता. त्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात जाहीर सभा घेऊनही या युतीने दणदणीत विजय मिळवीत ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या.

राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या; पण मतदारांनी त्यांची नोंद न घेता मतदान केले. आजही त्यांच्या सभा ऐकायला लोक जमतात; पण मते देत नाहीत हे अनेक निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यावर शिवसेनेला टार्गेट केले. नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. नंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केले आणि आता शरद पवार यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला भक्कम कार्यक्रम नसेल तर तो पक्ष वाढत नाही. कारण त्यांच्या नवनिर्माणच्या संकल्पनेत काही नवे नाही. त्यावर ते काही बोलत नाहीत. मशिदीवरील भोंगे काढून टाका, ते बंद करा, हा राजकीय कार्यक्रम होत नाही. तो एक भावनिक आणि धार्मिक श्रद्धांना गोंजारणारा विषय होऊ शकतो. तो माणसांच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार नाही.

मंदिरावरही अनेक ठिकाणी दररोज भोंगे वाजत असतात. धर्माचे आचरण घरात असावे ही भूमिका योग्य आहे. मात्र, ती सर्वच धर्मांना लागू होते. हिंदू-मुस्लिम वादाचे राजकारणही आता मागे पडत चालले आहे. देशातील धार्मिक दंगलींचे कमी झालेले प्रमाण हे त्याचे द्योतक आहे. नव्या अर्थव्यवस्थेत दंगा-धोपा, बंद, रास्ता रोकाे अशा मार्गांना आता जागा राहिलेली नाही. हा विषय वगळता मनसेकडे राजकीय कार्यक्रमच नाही. डाव्या पक्षांनी वैचारिक मांडणीची फेररचना न केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेला मर्यादा आल्या. त्यापेक्षा वाईट अवस्था मनसेची आहे. सध्याच्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगळता कोणत्याही राजकीय पक्षाला जागा नाही. किंबहुना लोकांनाच या चार राजकीय पक्षांव्यतिरिक्त नव्या शक्तीची गरज उरलेली नाही. राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत सातत्य ठेवून राजकीय कार्यक्रम मनसेच्या कार्यकर्त्यांना द्यायला हवा. शरद पवार म्हणतात तसे दोन-चार महिन्यांत एकदा घराबाहेर पडून इव्हेंट आयोजित करावा, तशी जाहीर सभा आयोजित करून राजकारण होत नाही.

पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालावा लागतो. वयाची ऐंशी वर्षे झाल्यावरही शरद पवार जेवढे किलोमीटर दरमहा फिरतात, तेवढी पावलेही राज ठाकरे टाकत नसतील. अशाने पक्ष वाढत नाही. मनसे, डावे, समाजवादी किंवा इतर राजकीय पक्षांना आता महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान नाही. हीच खरी खंत राज ठाकरे यांच्या मनातील खदखद असावी. लोक एक आक्रमक शैलीतील भाषण ऐकायला आवडत असल्याने जमत असावेत. शरद पवार यांनी त्यांच्या टीकेवर चोवीस तासांच्या आत मुद्देसूद उत्तर देऊन राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात नोंद घेण्याजोगी नसल्याचे दाखवून दिले. आता भाजपचे बोट धरून टिकून राहावे एवढाच  ‘राज’ मार्ग उरला आहे.

Web Title: editorial on mns chief raj thackeray speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.