राजधानी दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. शनिवारचे सगळे कार्यक्रम पार पडले. तालकटोरा स्टेडियमच्या परिसरात जत्रा भरली. तरी पूर्वानुभव विचारात घेता अजून एखादी सनसनाटी कशी निर्माण झाली नाही, असा विचार काहीजण करीत असतानाच अचानक विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे या मंडळींच्या मदतीला धावून आल्या. रविवारी दुपारी ‘असे घडलो आम्ही’ या राजकीय नेत्यांची वाटचाल उलगडणाऱ्या मुलाखतींच्या सत्रात आपल्या पक्षांतराचे समर्थन करताना नीलमताईंनी त्यांचे आधीचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर ‘एका पदासाठी दोन मर्सिडीज’ असा सनसनाटी आरोप केला. त्यावर उद्धव ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अनेक वर्षे डाॅ. गोऱ्हे या स्वत:च उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय राहिल्या असल्याने अशा व्यवहारांमधील त्यांच्या मध्यस्थीबद्दलही लगोलग काही आरोप झाले. नाशिकचे माजी महापाैर विनायक पांडे यांनी तर थेट हल्ला चढविला. नीलमताई स्वत:च्याच गाडीचे टायर कार्यकर्त्यांकडून बदलून घेत होत्या, असा आरोप पुण्यातून झाला. त्यांना साड्याही 'द्याव्या' लागत् असे कुणी म्हणाले. खरे तर मूळ विषय होता- कधीकाळी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून समाजवादी विचारांसाठी झटणाऱ्या डाॅ. गोऱ्हे यांनी वैचारिक उडी कशी मारली, कडव्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत त्या कशा काय गेल्या आणि ठाकरे आडनावाच्या प्रभावामुळे त्यांनी असा ध्रुव बदलला असेल, तर मग पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना त्यांनी का सोडले? त्यावर फार खोलात न जाता डाॅ. गोऱ्हे यांनी हा विषय ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानातील मुदपाकखान्यापर्यंत नेला. हे लक्षात घ्यायला हवे की, डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी खूप उशिरा म्हणजे सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे रंगलेले शिवसेनेतील फुटीचे नाट्य संपल्यानंतर, ७ जुलै २०२३ ला तंबू बदलला. त्याला विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाचा संदर्भही होता.
घटनात्मक पदांवरील व्यक्तींना राजकीय अभिनिवेशाचा वारा लागू नये किंवा पक्षांतर वगैरेत या व्यक्ती अडकू नयेत, हा अर्थहीन सुविचार झाला. मुळात अशी पदे बहुमतानुसारच मिळतात, हे वास्तव आहे. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेंप्रति निष्ठा सिद्ध करतानाच संधी मिळेल तिथे उद्धव ठाकरे यांच्या कडव्या विरोधक आहोत, हे दाखविण्याची राजकीय गरज डाॅ. गोऱ्हे यांना वाटत असावी. त्यातूनच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही मर्सिडीजची आठवण त्यांना झाली असणार. याच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याही अत्यंत मर्मभेदी मुलाखती झाल्या. आपापल्या राजकीय विरोधकांवर तुटून पडण्याची संधी त्यांनाही होती. तथापि, साहित्य संमेलनाचे गैरराजकीय व्यासपीठ राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी न वापरण्याचे भान त्यांनी बाळगले. तसे ते डाॅ. गोऱ्हे यांना जमले नाही. त्या अनाठायी बोलल्या आणि सात दशकांनंतर राजधानीत मराठी साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलणारे आयोजक मात्र अडचणीत आले.
अर्थात, या वादाच्या निमित्ताने ज्यावर चर्चा करायला हवी तो मुद्दा आहे औचित्यभंगाचा. मोठी पदे मिळविण्यासाठी खरेच अशा महागड्या आलिशान गाड्या द्याव्या लागतात का, वगैरे तपशिलात जाण्याची काही गरज नाही. कधीकाळी घरावर तुळशीपत्र ठेवून करावयाच्या जनसेवेचे साधन असलेले राजकारण आता चोख व्यवसाय झाला आहे. हे पैशांच्या देवाणघेवाणीचे, पेट्या व खोक्यांचे आरोप, ‘आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला जड जाईल,’ वगैरे शब्दांतल्या थेट धमक्या याकडे राजकारणातील पैशांच्या अतिरेकी वापराचे उदाहरण म्हणून पाहायला हवे. केवळ शिवसेनेच्या दोन फळ्या नव्हे, तर पवार घराण्यात वाटप झालेली राष्ट्रवादी किंवा गेला बाजार भाजप, काँग्रेसमधील नेतेही वैयक्तिक पातळीवर अशा धमक्या रोजच देत असले तरी एकदाची काय देवाण-घेवाण झाली हे सांगून मामला मात्र संपवून टाकत नाहीत. त्याचे कारण ‘हमाम में...’ अशा अवस्थेत सगळे आहेत. एकमेकांची पोलखोल केली, तर कुणालाच तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तेव्हा, अधूनमधून असे आरोप झाले की, त्यावर प्रत्यारोप होणार, पाॅलिटिकल ब्लॅकमेलिंग’चा पुढचा अध्याय लिहिला जाणार, लोकांचे मनोरंजन होणार. यापलीकडे काही होईल, असा भाबडेपणा बाळगण्यात काही अर्थ नाही.