संपादकीय: संसदेत मराठी ‘कल्ला’; देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:20 AM2023-08-10T08:20:02+5:302023-08-10T08:22:00+5:30

मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली!

Editorial: Marathi 'clash' in Parliament; is that Maharashtra has given many excellent parliamentarians to the country | संपादकीय: संसदेत मराठी ‘कल्ला’; देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र

संपादकीय: संसदेत मराठी ‘कल्ला’; देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र

googlenewsNext

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने मंगळवारी काही मराठी खासदारांनी लोकसभेत त्यांच्या वक्तृत्व कलेचे जे प्रदर्शन केले, त्यामुळे उभ्या महाराष्ट्राची मान खाली गेली. चर्चेचा विषय, मुद्दे आणि भाषेची मर्यादा यापैकी एकाही बाबीचे भान न बाळगता, केवळ एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचा एककलमी कार्यक्रम त्या खासदारांनी राबविला. उच्च संसदीय परंपरा लाभलेला, देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न त्यामुळे उर्वरित देशाला नक्कीच पडला असावा. काही सन्माननीय अपवाद वगळता, मराठी खासदार हिंदी आणि इंग्रजी भाषेतून संवाद साधताना नेहमीच कमी पडतात. तरीदेखील मराठी खासदार संसदेत मोडकीतोडकी हिंदी बोलण्याचा प्रयत्न का करतात, हे अनाकलनीय आहे.

इतरही अनेक राज्यांतील खासदारांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसते; परंतु ते कधीही त्याचा न्यूनगंड न बाळगता, थेट मातृभाषेतून त्यांचे विचार व्यक्त करतात. आपले बोलणे सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी किती जणांना कळत आहे, याची ते अजिबात तमा बाळगत नाहीत. मी काय बोलतोय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही संसदेत उपलब्ध अनुवाद सेवेचा वापर करा, मी माझ्या मातृभाषेतच बोलेन, असा त्यांचा अभिनिवेश असतो. मराठी खासदार त्यांचा कित्ता का गिरवू शकत नाहीत, हा प्रश्न तमाम मराठी बांधवांना आपल्या खासदारांची संसदेतील भाषणे ऐकताना नेहमीच पडत असावा. आपले म्हणणे सभागृहात उपस्थित बहुसंख्य सदस्यांपर्यंत थेट पोहोचावे, हाच हिंदीतून मतप्रदर्शन करण्यामागील मराठी खासदारांचा हेतू असतो, हे स्पष्ट आहे; पण ते जे मराठीमिश्रित मोडके तोडके हिंदी बोलतात, तेच त्यांच्या हेतूला नख लावते! बरे, स्वत:चे भाषण निवांतपणे पुन्हा ऐकण्याची, बघण्याची सोय उपलब्ध असूनही, आपले खासदार ते करत नाहीत का, असाही प्रश्न पडतो; कारण त्यांनी तसे केले असते, तर एकतर हिंदी भाषेवर मेहनत घेऊन सुधारणा केली असती किंवा मग इतर गैर हिंदी भाषिक राज्यांमधील खासदारांप्रमाणे थेट मातृभाषेत व्यक्त होणे सुरू केले असते. दुर्दैवाने त्यापैकी काहीही होत नाही. त्याचाच अर्थ आत्मपरीक्षण करून स्वत:मधील वैगुण्य दूर करण्याची त्यांना गरज वाटत नाही किंवा मुळात आपण कुठे तरी कमी पडतो, हेच त्यांना मान्य नाही!

संसदेच्या प्रत्येकच अधिवेशनात, काही सन्माननीय अपवाद वगळता, मराठी खासदारांचे हे वैगुण्य उघडे पडत असते. बऱ्याच मराठी खासदारांच्या गाठीशी संसदेचा अनेक वर्षांचा अनुभव आहे तरीदेखील ते या वैगुण्यावर मात करू शकले नाहीत, हे महाराष्ट्राचेच दुर्दैव म्हटले पाहिजे. मराठी खासदारांचा हिंदी अथवा इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचा अभाव आणि मातृभाषेतून बोलण्याचा न्यूनगंड हे नित्याचेच झाले असल्यामुळे त्याकडे एकदाचे दुर्लक्षही करता येईल; पण मंगळवारी संपूर्ण देशाचे लोकसभेतील कामकाजाकडे लक्ष लागलेले असताना, मराठी खासदारांनी मोडक्या तोडक्या हिंदीतून ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते लज्जास्पद आणि अक्षम्य आहे. गावगुंड नाक्यावरील भांडणात जसे शब्दप्रयोग करतात, तसे संसदेत करण्यात आले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर नाथ पै, रामभाऊ म्हाळगी, नानासाहेब गोरे, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, मधु लिमये, वसंत साठे, प्रमोद महाजन असे आपल्या वाकपटुत्वाच्या बळावर संसद गाजविणारे एकाहून एक सरस संसदपटू देशाला देणारा हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न इतर राज्यांमधील खासदारांना नक्कीच पडला असावा!

मराठी माणूस संकुचित असतो, तो आपल्या चौकटीच्या बाहेरचा विचार करत नाही, असा आक्षेप नेहमीच घेतला जातो. मंगळवारी चर्चेत सहभागी होताना, मराठी खासदारांनी त्या आक्षेपाला बळ देण्याचेही काम केले. आपण देशाच्या पंतप्रधानांवर अविश्वास व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होतोय, मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली! इतर राज्यांमधील खासदार अत्यंत गंभीर मुद्यांवर चर्चा करत असताना, आपले खासदार मात्र असंसदीय भाषेत कधी काळी सहकारी असलेल्यांची उणीदुणी काढत होते! गत काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर सातत्याने खालावत आहे. मंगळवारी आणखी खालची पातळी गाठली!

Web Title: Editorial: Marathi 'clash' in Parliament; is that Maharashtra has given many excellent parliamentarians to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.