नाशिकच्या कुंभमेळ्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने कुंभमेळा हा केवळ सोहळा नसून तो श्रद्धेचा महासंगम आहे. कुंभ काळात गोदावरी तीरावर लाखो भाविक एकत्र येतात, संत परंपरा जागृत होते आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर हे आध्यात्मिक नकाशावर ठळकपणे उमटते. या पार्श्वभूमीवर हजारो कोटींची विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, सौंदर्यीकरण प्रकल्प यांची घोषणा झाली आहे. शिवाय, यंदा त्याला ‘हरित कुंभ’ असे आकर्षक लेबलही देण्यात आले आहे. पण या ‘हरित’ शब्दामागचे वास्तव अनुभवणारे नाशिककर नागरिक सध्या मेटाकुटीला आले आहेत.
‘हरित’ म्हटल्या जाणाऱ्या या कुंभासाठी शंभर शंभर वर्षांची वड-पिंपळाची झाडे धारातीर्थी पडताना पाहाणे आणि त्यासाठीची हळहळ सोसत पुन्हा शहरभर खोदलेल्या रस्त्यातून वाट काढणे चिडलेल्या नागरिकांच्या नशिबी आले आहे. हरित कुंभासाठी नाशिक परिसरात होत असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून वारंवार निदर्शने, आंदोलने आणि वादाच्या फैरी झडत आहेत. कुंभकाळात विविध स्वरूपाचे सामाजिक, धार्मिक वाद, बखेडे निर्माण होण्याची जणू परंपराच आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेही ही परंपरा अव्याहत राहिली आहे. पण, यावेळी मात्र कुंभकाळाच्या आधीच अवघे शहर वादविवादांनी कासावीस झाले आहे. विकासाला विरोध असण्याचे कारण नाही. कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे अपरिहार्यच आहे. त्यासाठी काही झाडे तोडावी लागणार, रस्ते रुंद करावे लागणार, वाहतूक सुलभ करावी लागणार हे वास्तव कुणीही मान्य करील; पण नागरिकांच्या मनात खदखदते प्रश्न आहेत - ‘किती’ आणि ‘का’? सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली वृक्षतोड ही किमान आवश्यकतेपुरती मर्यादित राहिल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी जुन्या, डेरेदार, वारसा-वृक्षांची सर्रास कत्तल होताना दिसते. हे दृश्य सामान्य नागरिकाच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे.
वृक्ष म्हणजे केवळ अडथळा नव्हे, तो शहराचा श्वास असतो. त्याचे पुनर्स्थापन वर्ष-दोन वर्षांत शक्य नाही, ही जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. ते तर सोडाच; पण वृक्षतोडीला असणारा पर्यावरणप्रेमींचा विरोध मोडून काढताना प्रशासनाची मुजोरी शहरवासीयांच्या संतापाचे खरे कारण ठरली आहे. संवादाचा अभाव, जनभावनांकडे दुर्लक्ष आणि विरोध करणाऱ्यांना थेट विरोधक म्हणून पाहण्याची मानसिकता लोकशाहीला न शोभणारी आहे. विकास हा केवळ कंत्राटे आणि प्रकल्पांमध्ये मोजला जाऊ शकत नाही, तो लोकांच्या विश्वासात आणि सहभागातही मोजला गेला पाहिजे. कुंभमेळामंत्री आणि कुंभमेळ्यासाठी नियुक्त विशेष प्रशासनाने हे समजून घ्यायलाच हवे. दुसरीकडे, केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या हटवादी दृष्टिकोनाच्या काही पर्यावरण कार्यकर्त्यांचे वास्तवाकडे होणारे दुर्लक्ष मुजोर प्रशासनाच्या पथ्यावरच पडते. रस्त्याच्या मध्यात आलेल्या झाडाला धडकून जीव गेलेल्या वाहनधारकांचे आप्त पर्यावरणप्रेमींच्या विरोधात उभे राहिल्याचे विचित्र दृश्य नाशिक शहराने पाहिले, ही भविष्यातल्या विचित्र संघर्षाची खूणच म्हणावी लागेल. नाशिक शहराचा स्वभाव मुळातच स्थिर आणि संयमी. ‘मेकओव्हर’च्या नावाखाली मूळचे सगळे उद्ध्वस्त करून नव्याने काही उभे करणे ही बाब शहरवासीयांच्या पचनी पडणारी नाही.
या शहराची स्वतःची एक पूर्वापार ओळख आहे, स्वभाव-संस्कृती आहे आणि इतर शहरांच्या तुलनेत तोच ‘यूएसपी’सुद्धा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवताना पाहून नाशिककर संतापले आहेत. प्रशासनाने या संघर्षातून धडा शिकला पाहिजे आणि या जातीच्या संतापाच्या लाटा यापुढे ‘विकसित’ होऊ घातलेल्या सगळ्याच शहरांमधल्या विकासकामांना थोपवून धरू शकतील याचे भान बाळगले पाहिजे. शहरवासीयांची नस ओळखण्यात प्रशासनाने चुका केल्या की सगळा तोल बिघडतो आणि सध्याच्या हायपर-कनेक्टेड काळात संतप्त नागरिकांच्या भिंती प्रशासनाच्या विरोधात उभ्या ठाकतात. नाशिकचा कुंभ ‘हरित’ असेल-नसेल; तो समतोल आणि सावध असलाच पाहिजे.
आवश्यक तेवढीच किमान वृक्षतोड, त्याबदल्यात ठोस आणि पारदर्शक पुनर्लागवड, स्थानिकांचा सहभाग आणि सर्व निर्णयांमध्ये स्पष्टता या गोष्टी अपरिहार्य आहेत. कुंभमेळा हा श्रद्धेचा सोहळा आहे, संघर्षाचा नव्हे. तो पर्यावरणपूरक, सामाजिकदृष्ट्या समंजस आणि प्रशासन-नागरिक यांच्यातील विश्वास टिकवणारा असला पाहिजे. भव्यदिव्यतेच्या नादात वर्तमानाचे भान सुटून भविष्य तिरपागडे होऊन बसले, असे घडता कामा नये!
Web Summary : Nashik's Kumbh Mela faces controversy over excessive tree cutting for development. Citizens protest lack of transparency and environmental damage, fearing Nashik's unique identity is being lost amidst modernization. A balanced approach is urged.
Web Summary : नाशिक के कुंभ मेले में विकास के लिए अत्यधिक पेड़ काटने पर विवाद। पारदर्शिता की कमी और पर्यावरणीय क्षति का नागरिकों ने विरोध किया, जिससे डर है कि आधुनिकीकरण के बीच नाशिक की अनूठी पहचान खो रही है। संतुलित दृष्टिकोण का आग्रह किया गया है।