घराबाहेर धोका अन् बोचरी अलिप्तता!

By किरण अग्रवाल | Published: April 9, 2020 04:16 PM2020-04-09T16:16:12+5:302020-04-09T16:19:13+5:30

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशातच लॉकडाउन पुकारला गेल्याने प्रत्येकावरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अर्थात घरात बसणे सुरक्षिततेचेही आहे. कारण आपण बाहेर पडलो तर कोरोनाचा विषाणू घरात येऊ शकेल.

editorial on isolating situation everyone is facing due to lockdown amid coronavirus | घराबाहेर धोका अन् बोचरी अलिप्तता!

घराबाहेर धोका अन् बोचरी अलिप्तता!

Next

- किरण अग्रवाल

मनुष्य हा मुळात सार्वजनिक - सामाजिक कवचात सुरक्षित राहणारा प्राणी आहे. यात प्रत्येकाचे वैयक्तिक खासगी आयुष्य आहे हे खरेच, पण त्याला सामाजिकतेचे वलय लाभले आहे हेदेखील तितकेच खरे. तसे नसते तर जगण्यातला आनंद अगर सुख-दु:खातल्या भावभावनांचे हसरे वा रडके तरंग त्याला अनुभवता आले नसते. ही सामाजिकता प्रत्येकाच्या सरावाचीच झालेली असते. तिचे अस्तित्व आहेच, किंवा असतेच; पण प्रत्येकवेळी ते जाणवतेच असेही नाही. एकटेपण वाट्यास येते तेव्हा मात्र ही समाजापासूनची अलिप्तता मनाला बोचते, जाणवते. काहीतरी राहून अगर सुटून जाते आहे असे यावेळी प्रकर्षाने वाटते, त्यातून आकारास येणारी हुरहूर संवेदनशील मनाला कुरतडणारीच ठरते. सध्याच्या कोरोनातून ओढवलेल्या लॉकडाउनच्या स्थितीत अनेकांना तेच अनुभवास येत आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशातच लॉकडाउन पुकारला गेल्याने प्रत्येकावरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अर्थात घरात बसणे सुरक्षिततेचेही आहे. कारण आपण बाहेर पडलो तर कोरोनाचा विषाणू घरात येऊ शकेल. त्यामुळे ते आवश्यकच आहे. या घरबसलेपणामागे भीती आहे हेदेखील खरे; मात्र त्यातील चांगली बाजू अशी की, निदान यानिमित्ताने प्रत्येकाला कुटुंबासाठी खास वेळ देता येतो आहे. अशात टीव्हीसमोर बसून बसूनही किती वेळ बसणार, म्हणून काही हौशी स्वयंपाकघरात मदत, तर काही मुलांसोबत खेळण्यात वेळ घालवताना दिसत आहेत. इतरही कामात काहींनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. हे सारे एकीकडे होत असताना नेहमीच्या भेटीगाठी दुरावल्या आहेत. मोबाइलच्या माध्यमातून संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेटीतला आनंद काय असतो याची जाणीव यानिमित्ताने होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून नाईलाजाने घराबाहेर पडावे लागलेल्यांनाही कसे चुकचुकल्यासारखे होते आहे. इमारती आहेत तिथेच आहेत, रस्ते तेच आहेत; पण त्यावर वर्दळ नाही, की नेहमी वाटेत भेटणारी वा दिसणारी माणसे नाहीत. वाहनांचा तो गोंगाट नाही, की हॉर्नचा कर्कश आवाज नाही. आपण हे रस्ते, त्यावरील इमारती, तेथील गजबजाट- गर्दी या साऱ्यांना इतके सरावलेले असतो की त्याशिवायची स्थिती कशी ओकीबोकी, भकास, विषण्ण वाटते. चौकाचौकात गाडी थांबल्यावर पुढे येत फुगे किंवा फुले विकणारी मुले असोत अथवा असहायतेने भिक्षेसाठी हात पुढे करणारी मंडळी, त्यांचे ते केविलवाणे चेहरे परिचित होऊन गेलेले असतात प्रत्येकासाठी; पण कोरोनाच्या भयाने तेही गायब आहेत. ना सिग्नल मुळे चौकात थांबण्याचा प्रश्न येतो, ना हे नेहमीचे चेहरे दृष्टीस पडतात. कशाला, कोणत्याही शहरातले उदाहरण घ्या; तेथील रिक्षावाल्याला टाळून कोणालाच पुढे जाता येत नाही, वाहनधारकाला नाही आणि पादचाऱ्यांनाही नाही. पण तेही आता रस्त्यावर नाहीत. सरकारी पक्षाने पुकारलेला असो, की विरोधकांचा; कुठला बंदही इतका कडक वा असा निर्मनुष्य नसतो. एकूणच या शुकशुकाटामुळे काही तरी राहून जाते आहे अशी रुखरुख अधिक प्रगाढ होते. सभोवतालच्या सजीवतेतील ही कमालीची अलिप्तता संवेदनशील मनाला बोचणारीच ठरली आहे.

नाईलाजातून व अंतिमत: स्वत:च्याच सुरक्षेपोटी स्वीकारावा लागलेला हा एकांतपणा व शुकशुकाट आपल्याभोवती राहणाऱ्या सामाजिक-सार्वजनिक वलयाची, त्याच्या अभिन्नतेची आणि आवश्यकतेचीही जाणीव करून देणाराच ठरला आहे. समाजापासून दूर राहून कुणीही फार काळ टिकू अगर तरू शकत नाही, हेच यातून दृगोच्चर व्हावे. आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण स्वत:साठी धावत असतो. मी व माझेपणाची भावना कमालीची वाढीस लागलेली आहे, पण हे सारे खरे असले तरी समाज वा कुटुंबाशिवाय आयुष्यात तो आनंद नाही. मर्यादित काळासाठी व कारणांसाठीचे खासगीपण ठीक असले तरी सामाजिक, सार्वजनिकतेखेरीज त्यात गोडी नाही. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही सामाजिक सामिलकीची संकल्पना मांडली होती, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून उमटलेले दिसते. या सामिलकीखेरीज राहायची वेळ ओढवते तेव्हा साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखे ते ठरते, वाहत्या पाण्यातील नाद अगर लय त्यात नसते. तेव्हा कोरोनाच्या लॉकडाउनमधून हाच धडा घ्यायचा. आज सामाजिक भान जपत एकांतवास पत्करून घरात थांबूया, पण सामाजिक सामिलकीसह वसुधैव कुटुम्बकमची भावना जोपासण्याचा निश्चय नक्कीच मनाशी करूया एवढेच यानिमित्ताने.  

Web Title: editorial on isolating situation everyone is facing due to lockdown amid coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.