शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 07:02 IST

गुलामगिरीच्या शृंखला झुगारून देताना, तमाम देशाने एक स्वप्न बघितले होते, गरिबीवर मात करून वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र घडवायचे!

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय नुकताच लिहिला गेला. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाय ठेवला आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील नेत्रदीपक वाटचालीतील आणखी एक ठसा उमटला. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाच्या सोयूझ टी-११ या अंतराळयानातून पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या होत्या. ते भारताचे पहिले अंतराळवीर होते. त्यानंतर शुभांशू शुक्ला यांना हा बहुमान मिळाला आहे. शुभांशू म्हणजे शुभ किरण ! 

नावाला साजेसी कामगिरी करताना, शुभांशू शुक्ला यांनी खरोखरच भारतीय अंतराळ क्षेत्रात एक नवे किरण आणले आहे; कारण भारत लवकरच देशातच विकसित केलेल्या ‘गगनयान’ या अंतराळयानातून भारतीय अंतराळवीरांना अवकाशात धाडणार आहे आणि त्यानंतर स्वत:चे अंतराळ स्थानकही निर्माण करणार आहे. हा केवळ वैयक्तिक यशाचा क्षण नाही, तर तो भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा, धोरणात्मक दूरदृष्टीचा आणि जागतिक स्पर्धेतील सक्षम सहभागाचाही सुवर्णक्षण आहे. 

केरळमधील थुंबा येथून एक सामान्य ‘साउंडिंग रॉकेट’ अवकाशात धाडून, १९६३ मध्ये भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर काही दशकांतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) हे नाव जागतिक मंचावर चमकू लागले. ‘एसएलव्ही’, ‘पीएसएलव्ही’, ‘जीएसएलव्ही’, ‘एलव्हीएम’ असे एकापेक्षा एक शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपक विकसित करत, अग्निपंखांनी भरारी घेतलेल्या ‘इस्रो’ने ‘चंद्रयान’, ‘मंगलयान’सारख्या मोहिमा स्वबळावर आणि तुलनेत अत्यंत अल्प खर्चात यशस्वी करून जगाला आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावली ! 

‘मंगलयान’ ही ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ मोहीम अवघ्या ४५० कोटी रुपयांत पूर्ण झाली होती. एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या निर्मितीसाठीही यापेक्षा मोठी रक्कम खर्ची पडते ! भारताच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि परिणामकारक नियोजन क्षमतेची त्यातून साक्ष मिळाली. शुभांशू शुक्लांचा अंतराळप्रवास ही भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेपूर्वीची एक महत्त्वाची पायरी आहे.‘`गगनयान’ ही भारताची मानवयुक्त अंतराळ मोहीम असून, त्याद्वारे भारतीय बनावटीच्या अंतराळयानातून भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहेत. 

अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे यश मिळवणारा भारत हा केवळ चौथा देश ठरेल ! अनेक प्रगत देशांनाही हे यश अद्याप चाखता आलेले नाही. ‘गगनयान’ मोहीम केवळ आत्मप्रौढीसाठी नसून, त्यामुळे भारतात प्रगत रोबोटिक्स, मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली अंतराळातील उपकरणे आणि अचूक नेव्हिगेशन प्रणालीचा झपाट्याने विकास होईल. त्याचा फायदा केवळ अंतराळ क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर वैद्यकीय, संरक्षण, शेती, हवामान अभ्यास अशा अनेक क्षेत्रांना होईल. 

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जैवतंत्रज्ञान व सूक्ष्म गुरुत्वातील जे प्रयोग करणार आहेत, त्यांचे पुढील टप्पे भारतीय अंतराळ स्थानकात गाठता येतील आणि त्यातून आरोग्य, औषधनिर्मिती, जलशुद्धीकरणासारख्या क्षेत्रांत अनेक नवे मार्ग उघडण्यास मदत होईल. भारत सरकारने अलीकडेच अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्याने क्रांती घडत आहे. ‘अग्निकुल’, ‘स्कायरूट’, पिक्सेल, ‘बेलाट्रिक्स’, ‘ध्रुव’ यांसारख्या ‘स्टार्टअप’नी अगदी कमी वेळात उपग्रह प्रक्षेपणाच्या तयारीत झपाट्याने प्रगती केली आहे. ही उद्योजकता शुभांशू शुक्ला यांच्या प्रवासामुळे प्रेरित होऊन अधिक गती घेईल, यात शंका नाही. 

शुभांशू शुक्ला यांचा प्रवास तरुणांना केवळ प्रेरणा देणारा नाही, तर ‘स्पेस इज फॉर ऑल’ हा संदेश ठामपणे देणारा आहे. विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि संशोधन यांच्यात ‘करिअर’ घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही घटना प्रेरक ठरेल. पुढील दशक भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. 

‘गगनयान’नंतर ‘शुक्रयान’, ‘चंद्रयान-४’, ‘अदित्य एल-२’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा रांगेत आहेत. या मोहिमांमुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक विश्वासार्हतेत भारत मोठी झेप घेईल. शुभांशू शुक्लांचा प्रवास हा केवळ एका भारतीयाचा अंतराळात जाण्याचा अनुभव नाही, तर तो संपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण आहे. गुलामगिरीच्या शृंखला झुगारून देताना, तमाम देशाने एक स्वप्न बघितले होते, गरिबीवर मात करून वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र घडवायचे ! शुभांशू शुक्ला यांच्या साहसी गगनझेपेतून आपण त्या स्वप्नपूर्तीच्या आणखी नजीक पोहोचलो आहोत !

टॅग्स :NASAनासाisroइस्रोSpaceअंतरिक्षscienceविज्ञान