शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: ‘डेटा’ची सरकारी राखणदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 08:19 IST

मोबाइल अथवा अलेक्सासारख्या डिव्हाईसचा वापर करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून त्यांचे जगणे प्रभावित करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

संपूर्ण मानवी विश्व व्यापून टाकणाऱ्या इंटरनेटसारख्या संवादी आणि संपर्क माध्यमाने मानवी जीवनात एकूणच क्रांतिकारक बदल घडवून आणले असले तरी या माध्यमाने आपल्या खासगी आयुष्यात शिरकाव केल्याने अनेक प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत. मानवी क्रिया, प्रतिक्रिया, वर्तनावर सातत्याने निगराणी आणि नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या या जगड्व्याळ अशा महाजालावर आता अंकुश ठेवला पाहिजे, असा सूर जगभर उमटू लागला आहे. चीनसारख्या राष्ट्राने तर याआधीच आपल्याभोवती चिरेबंदी भिंतीसारखी ‘डिजिटल वॉल’ उभारून माहितीच्या अदान-प्रदानास अटकाव केला आहे. गुगलसारखे लोकप्रिय सर्च इंजिन अथवा फेसबुक, ट्विटर आदी डिजिटल प्लॅटफॉर्म्सना ही भिंत ओलांडून ‘आत’ प्रवेश नाही. चीनच्या एकूण स्वभावाला ते साजेसेच; परंतु आता लोकशाहीवादी राष्ट्रेदेखील यासाठी पावले उचलत आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमे, इंटरनेट जोडणी पुरविणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि ॲमेझॉन आदी व्यावसायिक माध्यमांनी वापरकर्त्यांचा डेटा परस्पर विकून करोडो रुपयांची कमाई केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. शिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून या तंत्रज्ञानाने आपल्या खासगी आयुष्यातदेखील प्रवेश केला.

मोबाइल अथवा अलेक्सासारख्या डिव्हाईसचा वापर करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून त्यांचे जगणे प्रभावित करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती म्हणून आजवर आपण ते गोड मानून घेतले. मात्र, आता डोक्यावरून पाणी जाण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, परवा लोकसभेत मंजूर झालेले ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल २०२३’ महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे  विधेयक आणण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सरकार प्रयत्नशील होते. मात्र, हे विधेयक येण्यास अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय  कारणीभूत ठरला. गोपनीयतेचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच निवाड्याचा हवाला देत, गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत नागरिकांचा डेटा गोळा करणे, संग्रहित करणे आणि वापरणे यासाठी इंटरनेट कंपन्या, मोबाइल ॲप्स आणि व्यावसायिक कंपन्यांना अधिक जबाबदार बनविण्याच्या उद्देशानेच हे विधेयक आणल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

व्यक्तिगत माहितीच्या आडून राष्ट्रहिताला बाधा पोहोचविण्याचे धाडस कोणी करू नये, म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आला आहे. त्यासाठीच विधेयकातील तरतुदींचा भंग करणाऱ्या कंपन्यांना २५० कोटी रुपये, असा जबर दंड आकारण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाले असले तरी, अनेकांच्या मनात त्याबद्दल काही किंतु-परंतु मात्र जरूर आहेत. एक म्हणजे, सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा होऊ न देता हे विधेयक मंजूर करून घेतले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. मात्र, त्यादेखील फेटाळून लावण्यात आल्या. देशातील करोडो नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित विषय असल्याने  हे विधेयक पुनर्विलोकनासाठी  संयुक्त संसदीय समितीकडे सोपवावे आणि त्यावर सखोल चर्चा, मंथन झाल्यानंतर मगच ते मंजूर करावे, अशी विरोधकांची मागणी होती. तीदेखील अमान्य करण्यात आली. सरकारने हे विधेयक मंजूर करून घेताना जी घाई केली, त्यावरून सरकारच्या हेतूविषयीच शंका उपस्थित केली जात आहे. माहितीचा अधिकार हादेखील नागरिकांच्या मूलभूत अधिकारात मोडतो. या विधेयकाच्या आडून सरकार आता माहिती अधिकार कायद्यालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

एडिटर्स गिल्ड, या देशभरातील संपादकांच्या संघटनेनेदेखील हीच शंका उपस्थित केली आहे. या विधेयकामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक हितांसाठी वृत्तांकन करताना पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टचा अडसर ठरू शकतो. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती मिळेलच, याची शाश्वती नसते. तिथेही गोपनीयतेचे कारण पुढे करून माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. लोकसभेत मंजूर झालेल्या या ‘डेटा प्रोटेक्शन’ विधेयकावर राज्यसभा आणि नंतर राष्ट्रपतींची मोहोर उमटल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे, हे खरेच. मात्र ही राखणदारी मूळ मालकाच्या मुळावर येऊ नये म्हणजे झाले!