शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

हवाई प्रवासाचे झोके, धोके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:30 IST

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ ...

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणणारी, दुसरी लहरी हवामानामुळे हवाई प्रवासातील जोखीम अधोरेखित करणारी, तर तिसरी घटना महानगर नावाच्या बजबजपुरीत प्रवाशांच्या जिवाशी संभाव्य खेळ उजेडात आणणारी आहे. एक महिन्यापूर्वी देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो कंपनीच्या मुंबई ते वाराणसी विमानात चक्क जास्तीचा प्रवासी चढला. त्याने दुसऱ्याची जागा बळकावली. परिणामी, तिकीट कन्फर्म असूनही दुसऱ्याला उभे राहावे लागले. हे चित्र बसायला जागा न मिळाल्याने एसटी किंवा रेल्वेत उभे राहून प्रवास केल्यासारखे होते. 

विमान प्रवासात असे शक्यच नाही. कारण, जेवढ्या जागा तेवढीच तिकिटे विकली जातात. इंडिगोने जास्तीचे तिकीट कसे विकले आणि बोर्डिंगवेळी ते लक्षात कसे आले नाही, याची चौकशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे. यातून हेच स्पष्ट होते, की प्रवाशांना अवाच्या सव्वा दराने तिकिटे विकणाऱ्या या कंपन्या प्रचंड बेफिकीर असतात, केंद्र सरकारच्या नियमांना वाकुल्या दाखविल्या जातात. असा सावळागोंधळ पहिल्यांदाच घडला, असे नाही. काही महिन्यांपूर्वी तब्बल ५५ प्रवाशांना विमानतळावरच सोडून वैमानिक बंगळुरू येथून विमान घेऊन दिल्लीकडे रवाना झाला होता. त्यासाठी गो फर्स्ट कंपनीला संचालनालयाने दहा लाखांचा दंड ठोठावला. विमानात उभे राहून प्रवास केला, तर काय होऊ शकते, हे दर्शविणारी दुसरी घटना सिंगापूर एअर लाइन्सच्या विमानात घडली. 

लंडन ते सिंगापूर या तेरा तासांच्या प्रवासादरम्यान दहा तासांनंतर विमान हिंदी महासागरावर, तब्बल ३७ हजार फूट उंचीवर असताना भयंकर वावटळीत सापडले. त्याने जीवघेणे हेलकावे खाल्ले. आधी वर गेले, मग खाली आले. पुन्हा वर गेले आणि अचानक सूर मारावा तसे अवघ्या दीडेक मिनिटांत जवळपास सहा हजार फूट खाली आले. त्यामुळे ज्यांनी सूचना मिळताच सीट बेल्ट लावले होते ते सोडून अन्य प्रवासी वरच्या सामान कक्षाला, छताला आदळले. या हेलकाव्यांमुळे जोडे, फोन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खाण्यापिण्याच्या वस्तू, प्लेट्स, चमचे वगैरे सामान इतस्तत: फेकले गेले. ही आदळआपट व भिरकावल्या गेलेल्या सामानांचा तडाखा बसून तीसेक प्रवासी जखमी झाले. ७३ वर्षे वयाच्या एका ब्रिटिश नागरिकाचा यात हृदयविकाराने मृत्यू झाला. विमानात २११ प्रवासी व १८ कर्मचारी होते. जखमींवर उपचारासाठी मग विमान मध्येच बँकाॅकला उतरविण्यात आले. विमान प्रवासात असे टर्ब्युलन्स किंवा वावटळी नव्या नाहीत. 

विजांच्या कडकडाटासह येणारी वादळे किंवा परस्परविरोधी दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा वावटळी येतात. त्यात प्रवासी जखमीही होतात. मृत्यू मात्र खूपच क्वचितच होतात. जखमींमध्ये बहुतेक वेळा प्रवाशांच्या सेवेत असलेले कर्मचारी असतात. कारण, ते सीट बेल्ट लावून एका ठिकाणी बसू शकत नाहीत. इंडिगोच्या मुंबई- वाराणसी विमानासारखे जास्तीचे प्रवासी उभे राहून प्रवास करायला लागले, तर काय होईल, याचीही कल्पना सहज येऊ शकते. मुंबईत घडलेली तिसरी घटना मात्र खूपच गंभीर, आपल्या विकासाच्या चुकीच्या संकल्पना आणि त्यातून उद्भवणारे धोके, भविष्यातील भीषण अपघातांना निमंत्रण, अशा अनेक मुद्यांना स्पर्श करणारी आहे. 

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाणारी विमाने पश्चिमेकडे उड्डाण करतात, तर येणारी विमाने पूर्वेकडून नवी मुंबई, घाटकोपरकडून धावपट्टीकडे येतात. दुबईवरून आलेल्या अशाच एका विमानाला फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांचा थवा धडकला व जवळपास चाळीस पक्ष्यांच्या चिंधड्या उडाल्या. ठाणे खाडी व नव्या मुंबईतील पाणथळ जागी हजारो, लाखोंच्या संख्येने नजरेस पडणारे, शहरी मंडळींना नेत्रसुख देणारे हे देखणे पक्षी विमानाला धडकून मरण्याच्या घटनेकडे केवळ निसर्ग व पर्यावरणाच्या नजरेतून पाहता येणार नाही. पक्ष्यांची धडक बसल्यामुळे विमानाचे अपघात झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. असा अपघात मुंबईसारख्या महानगरात झाला, तर काय होईल, ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. 

ठाणे खाडी व नवी मुंबईतील बांधकामे, त्यासाठी वापरली जाणारी यंत्रे व स्फोटके, घाबरून आकाशात झेपावणारे राेहित पक्षी यातून टोलेजंग इमारती व अहोरात्र गजबजलेल्या वस्त्यांमध्ये विमान अपघाताचा मोठा धोका उद्भवू शकतो. नव्या मुंबईतील प्रस्तावित विमानतळ तर या स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाजवळच आहे. तेव्हा, पक्षी व प्रवासी दोन्हींना वाचविण्यासाठी गंभीर चिंतन गरजेचे आहे.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात