आॅलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपावा
By Admin | Updated: August 1, 2016 05:15 IST2016-08-01T05:15:43+5:302016-08-01T05:15:43+5:30
दोन आठवडे चालणाऱ्या रिओ आॅलिम्पिकला येत्या पाच तारखेला प्रारंभ होत आहे

आॅलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपावा
दोन आठवडे चालणाऱ्या रिओ आॅलिम्पिकला येत्या पाच तारखेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये विविध १६ क्रीडाप्रकारांमध्ये १२ भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धांमध्ये यंदा भारताचे सर्वात मोठे पथक सहभागी होत आहे. भारतीय खेळाडू तिरंदाजी, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, कुस्ती, गोल्फ, हॉकी, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, नौकानयन, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस, भारोत्तोलन आणि मुष्टियुद्ध या क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी बजावतील, अशी आशा बाळगून आपण त्यांना शुभेच्छा देऊ.
आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये इतर देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी वाईट होते आणि पदकांचा दुष्काळ असतो, याबद्दल आपण खेद व्यक्त करत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी असल्याशिवाय आपण जगातील शक्तिशाली देश होण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. १.२२ अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशाने आतापर्यंत ११६ वर्षांचा इतिहास असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये केवळ ०.१६ टक्के पदके मिळविली आहेत. ज्या चीनशी आपण नेहमी आपली तुलना करीत असतो, त्या देशाने २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळविली आहेत. केवळ पाच लाख लोकसंख्या असलेला बहामा हा छोटासा देश आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवितो, हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.
आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला मिळणारी कमी पदके या मुद्द्यावर आजपर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे; मात्र या चर्चेतून भरीव असे काही निष्पन्न झालेले दिसून आले नाही. आपला देश लोकशाहीवादी असल्याने कडक निर्बंधाबाबत आपल्याला काही मर्यादा येतात. त्यामुळे खेळांडूच्या पालनपोषणाबाबत तसेच तयारीबाबत आपण निर्बंध आणू शकत नाही. गरिबी हा सुद्धा क्रीडापटू निर्माण करण्यातील एक अडथळा असल्याचे प्रतिपादन केले जाते व ते काही प्रमाणात खरेही आहे, असे असले तरी भारतीय पालकांची ‘पढोगे-लिखोगे बनोगे नबाब, खेलोगे-कुदोगे होंगे खराब’ ही वृत्तीही क्रीडापटू निर्माण करण्यात अडथळा ठरणारी आहे. ही चर्चा कधीही निश्चित निर्णयाशिवाय संपणारी नाही, असे असले तरी अनेक आॅलिम्पिक स्पर्धांनंतरही भारतीय खेळांडूच्या कामगिरीमध्ये फारशी सुधारणा झालेली दिसत नाही हेच खरे.
क्रीडाविषयक महासत्ता बनणे हे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट असले पाहिजे. आपला देश सैनिकी अथवा आर्थिक महासत्ता बनावा यासाठी जसे प्रयत्न होतात, तसे प्रयत्न क्रीडाविषयक महासत्ता बनण्यासाठी होताना दिसत नाही. किंबहुना याबाबत आपण फारसे गंभीर नाही. ब्रिटिशांची सत्ता असलेल्या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळात आपण चमक दाखविली असली तरी त्यामुळे आपले श्रेष्ठत्व क्रीडा विश्वात सिद्ध होत नाही. सायना नेहवाल अथवा सानिया मिर्झा, कुस्ती, मुष्टियुद्ध अथवा नेमबाजीतील काही खेळाडूंची कामगिरी यावरच आपण समाधानी असल्याचे दिसते. आपले पंतप्रधान स्वच्छतेचा संदेश देऊन ते राष्ट्रीय मिशन बनवितात; मात्र क्रीडाविषयक श्रेष्ठत्वही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब दिसत नाही. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी कोणतीही योजना आखलेली दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला क्रीडा संघटनांमधील खराब प्रशासन, जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांची वानवा, सुविधा उपलब्ध नसणे आणि विविध खेळाडूंमधील वितुष्ट या बाबी आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या दिसून येतात. काही वेळा खेळाडूंना निधीचीही चणचण भासते; मात्र विविध कंपन्या या खेळाडू किंवा संघांना दत्तक घेऊन हा प्रश्न काही प्रमाणात सोडविताना दिसतात.
क्रीडाविषयक महासत्ता बनण्यासाठी आपल्याला निश्चित असे धोरण ठरविणे गरजेचे आहे. हे धोरण थेट पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आखले जावे तसेच अंमलातही आणले जावे. पंतप्रधानांनी वैयक्तिकदृष्ट्या हे करावे असे येथे अपेक्षित नाही; मात्र धोरण ठरविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तसेच त्याची नियमित तपासणी करणे ही कामे पंतप्रधानांनी करावीत. याबाबत आपली पंतप्रधानांशी व्यक्तिगत चर्चा झाली आहे. याशिवाय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबाबतही मी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. पर्यटन वाढल्यास भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा तसेच अर्थव्यवस्था बदलून जाऊ शकते; मात्र यासाठी व्यक्तिगत लक्ष देण्याची गरज आहे. क्रीडापटूंमधील गुणवत्तेचा शोध हा बालवयापासून घेतला जावा. शाळेच्या पहिल्या वर्षापासून त्याकडे लक्ष दिले जावे आणि त्यामधील गुणात्मक बदल हा केवळ गुणवत्तेवर जोखला जावा. क्रीडा विषयासाठी ग्रेडिंग सिस्टीम असावी. त्यामुळे खेळ म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे, ही भावना नष्ट होणे सोपे जाईल. खेळामधील सहभाग आणि विजय यावर आधारित ग्रेड दिली जावी. या सर्व प्रकारातून वशिलेबाजी ही बाहेर ठेवली जावी. असे झाल्यास सध्या सुरूअसलेल्या डोपिंगसारखे प्रकार होणार नाहीत. नरसिंग यादव याच्या संदर्भात हा वाद निर्माण झाला आहे.
क्रीडाविषयक या राष्ट्रीय कार्यक्रमात विविध राज्यांचा सहभागही आवश्यक आहे. काही विभागांतून ठरावीक क्रीडा प्रकारांतील चांगले खेळाडू या आधीही तयार झालेले आहे. आॅलिम्पिकमधील २८ क्रीडा प्रकारांपैकी केवळ १६ प्रकारांमध्ये आपण सध्या सहभागी होतो. इतर प्रकारांमध्येही सहभागासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. २०१२ च्या आॅलिम्पिकमध्ये आपण ५० व्या स्थानावर होतो. त्यामध्ये सुधारणा होऊन किमान पहिल्या दहामध्ये येण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत. आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यापेक्षा सहभागी होणे जास्त महत्त्वाचे हे जरी खरे असले तरी पदके मिळविणारे किमान १०० खेळाडू आपण त्यामध्ये उतरवू शकणे महत्त्वाचे. रिओ आॅलिम्पिकमधील वाईट कामगिरीबद्दल शोक सुरू करण्यापूर्वीच पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून आपण क्रीडाविषयक महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे जाहीर करणे गरजेचे आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष असला तरी एक मुद्दा ठासून सांगितला पाहिजे की, तेथील हिंसाचार ताबडतोब थांबविला पाहिजे. वादाच्या सबबीखाली कोणीही काश्मिरींचा शांततेने जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. हिंसाचाराचे उदात्तीकरण अथवा समर्थन करणे कोणत्याही मुद्द्यावर ग्राह्य नाही. विशेष म्हणजे दोन्ही देशांनी या मुद्द्यावरील आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. गेली ६८ वर्षे दोन्ही पक्षांना या मुद्द्यावर अपयशच आले असल्याने याबाबतच्या दृष्टिकोनात बदल घडणे गरजेचे आहे.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)