शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांच्या घशाला कोरड!

By किरण अग्रवाल | Updated: May 5, 2024 13:08 IST

Water scarcity : ओरड वाढून मोर्चे निघण्यापूर्वीच प्रशासनाने कार्यतत्पर होत उपाय योजना राबविणे अपेक्षित

 - किरण अग्रवाल पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांवर संपूर्ण उन्हाळा निघणे अवघड आहे. त्यामुळे माणुसकी धर्माला जागत प्रत्येकानेच पाणी जपून वापरण्याबाबत स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे.

मतमोजणी व निकाल बाकी असला तरी, निवडणुकीची धामधूम संपल्याचा उसासा यंत्रणांकडून टाकला जातो न जातो, तोच पाणीटंचाईच्या समस्येने घशाला कोरड पडली आहे. राजकारणातील जय पराजय होत राहतील, त्या संबंधातील आकडेमोडीत अडकून न राहता यंत्रणांनी तातडीने याकडे लक्ष पुरविणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे.

विदर्भातील मतदान पहिल्या दोन चरणात झाल्याने निवडणुकीची धामधूम तशी आटोपली आहे, आता निकाल काय यायचा तो ४ जूनला येईल व त्यातून कोणाला काय फटका बसायचा तो तेव्हा कळेलच. परंतु, तोपर्यंत उन्हाचा जो चटका अंग भाजून काढणारा ठरत आहे आणि त्यातून पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत चालली आहे त्यातून मार्ग काढला जाणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या आकडेमोडीतून बाजूला होत आमदार तसेच जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनीही यासंदर्भातील उपाययोजनांबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

निवडणुकीच्या रंगात सारेच असे काही रंगून गेले आहेत, की त्यातून पाणीटंचाईच्या समस्येकडे काहीसे दुर्लक्षच होताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे मिळून एकूण ३० प्रकल्प असून, त्यात अवघा २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, तर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक ७७ प्रकल्पांमध्येही सुमारे तितकाच म्हणजे २८.७०% जलसाठा आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर यापेक्षा बिकट अवस्था असून, तेथील ४७ प्रकल्पांमध्ये अवघा १७ टक्केच जलसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प आताच कोरडा पडला आहे. निसर्गाचे बदलते वेळापत्रक बघता जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होईलच याची शाश्वती देता येऊ नये, तेव्हा संपूर्ण मे महिना व जूनचे काही दिवस या साठ्यावर काढायचे तर खूप अवघड होणार आहे. बरे, उन्हाचा कडाका असा आहे की बाष्पीभवनाचा वेगही वाढून गेला आहे; त्यामुळे या जलसाठ्याचे नियोजन केले तरी पाऊस येईपर्यंत ते टिकणे मुश्किलीचे आहे.

ग्रामीण भागातून आताच ओरड होऊ लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर टँकर्सही सुरू झाले आहेत. हे संकट हाताळणे वाटते तसे सोपे नाही, कारण काही ठिकाणी प्रकल्प उशाला असूनही केवळ पाणी वहन यंत्रणा सक्षम नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. माता भगिनींना दोन दोन, चार चार किलोमीटर अंतरावरून झिरप्यामधून दूषित पाण्याचे हंडे घेऊन गरज भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यासंबंधीची ओरड अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. लोकसभेचा मांडव उठून गेला, पण ज्यांना विधानसभेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मांडवाखालून जायचे आहे त्यांच्यासाठी ही बाब अडचणीचीच ठरू शकेल.

महत्त्वाचे म्हणजे, एकीकडे ग्रामीण भागातील माता भगिनींचे पाण्यावाचून हाल होत असताना दुसरीकडे विशेषतः शहरी भागात सायंकाळी उकाड्यापासून सुटका मिळून निवांत झोप लागावी म्हणून अंगणात पाणी मारले जात असल्याचेही दिसून येते. काही वाहनचालक छानपैकी नळी लावून वाहने धुताना दिसून येतात. या अशांना स्वतःला पाण्याचे मोल कळणार नसेल, तर महापालिकेच्या यंत्रणांनी तरी त्यांचे कान धरायला हवेत; परंतु पाण्याची नासधूस करणाऱ्यांवर कसलीही कारवाई केली गेल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही.

जिल्हा प्रशासनातर्फे संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणार्थ ज्या काही उपाययोजनांचे नियोजन केले गेले होते, त्याचे काय झाले याबाबतचा आढावा तत्काळ घेतला जायला हवा. पालकमंत्री व शासनाला भलेही यासाठी वेळ मिळो न मिळो, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे, कारण स्थानिक पातळीवर जनतेला त्यांना तोंड द्यायचे आहे. निवडणुकीच्या धामधुमीत जो अवकाळीचा तडाखा बसून गेला त्याचे पंचनामे आता मतदान संपल्यानंतर सुरू झाले आहेत. त्याचसोबत पाणीटंचाईची ओरड वाढण्यापूर्वीच त्यासंबंधीच्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

सारांशात, यंदा पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसण्याची चिन्हे असल्याने राष्ट्रीय संसाधनाच्या जपणुकीच्या अंगाने व माणुसकीच्या दृष्टीने पाणीटंचाईच्या या समस्येकडे सर्वांनी बघायला हवे, परंतु तेच होताना दिसत नाही. यंत्रणांनीही निवडणूक संपली म्हणून ''रिलॅक्स'' न राहता जनता जनार्दनाचा घसा कोरडा पडणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.