स्मार्ट सिटीतील ड्रेनेज बळी!
By Admin | Updated: August 5, 2016 05:59 IST2016-08-05T05:59:08+5:302016-08-05T05:59:08+5:30
केन्द्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या देशातील पहिल्या १० स्मार्ट शहरात सोलापूरची नोंद झाली.

स्मार्ट सिटीतील ड्रेनेज बळी!
केन्द्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या देशातील पहिल्या १० स्मार्ट शहरात सोलापूरची नोंद झाली. परंतु सर्व मूलभूत सुविधांची वाट लागलेली असताना केवळ चारच चांगल्या रस्त्यांकडे पाहायचे आणि आम्ही ‘स्मार्ट’ झालो म्हणायचे! ड्रेनेजचे खड्डे आणि रस्त्यावरील खड्डे यातच गुरफटलेल्या सोलापूरकरांना स्वत: स्मार्ट बनून सिटीही स्मार्ट करण्याचा मार्ग कोण बरे दाखवेल!
आजही राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात सोलापूरचा समावेश आहे. त्यातही जेवढा पाऊस झाला तेवढ्यानेच सोलापूर शहराची तारांबळ उडवली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. अनेकांचे संसार रस्त्यावर आले. चिखल आणि घाणीच्या साम्राज्याने अनेकांचा जीव मेटाकुटीला आणला. खड्ड्यांनी सजलेले रस्ते, सांडपाणी व कचऱ्याने व्यापलेली उपनगरे आणि अनियमित असूनही अशुद्धतेच्या बाबतीत नियमित असणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे साथीच्या रोगाने हे शहर ग्रासले आहे. तरीही सोलापूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणायचेच! कारण शासनदरबारी कागदावर तरी देशातील पहिल्या १० स्मार्ट शहरांमध्ये सोलापूरची नोंद झाली आहे. सर्व मूलभूत सुविधांची वाट लागलेली असतानाही बोटांवर मोजल्या जाणाऱ्या चारच चांगल्या रस्त्यांकडे पाहायचे आणि आम्ही ‘स्मार्ट’ झालो म्हणायचे!
स्मार्ट सिटीच्या हेडखाली २८८ कोटी आले... नगरोत्थानाच्या हेडखाली १८७ कोटी मंजूर झाले... रस्ते विकासासाठी २६० कोटी... फक्त कोटींच्या आकड्यांचा खेळ आणि केवळ गप्पाच! अर्धवट कामांकडे असलेले कमालीचे दुर्लक्ष, स्वच्छतेपासून मूलभूत नागरी सुविधांकडे फिरलेली महापालिकेची पाठ आणि कोटी-कोटींची उड्डाणे घेत स्वप्नरंजनात मग्न असलेल्या करंट्या प्रशासनाने एका चिमुकल्याचा बळी घेतला.
रविवारी काही मुले सिंधुविहार परिसरात क्रिकेट खेळत होती. जवळच ड्रेनेजच्या कामासाठी खड्डा खणलेला होता. खेळताना मुलांचा चेंडू त्या खड्ड्यात पडला. चेंडू आणण्यासाठी पीयूष प्रसाद वळसंगकर हा १३ वर्षांचा मुलगा खड्ड्याकडे धावला आणि खड्ड्यात पडला. बाकीच्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच असलेल्या काही मजुरांनी मदतीसाठी धाव घेतली; पण ते पीयूषला वाचवू शकले नाहीत. पीयूषच्या माता-पित्यांचा आक्रोश तरी आता ड्रेनेज लाईनच्या कामासंदर्भात महापालिकेला खडबडून जागे करील काय, हा खरा प्रश्न आहे.
पीयूषच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत, हे बरे झाले. परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वळसंगकर यांचा गेलेला मुलगा परत नक्कीच येणार नाही. अशा चुकांची पुनरावृत्ती यापुढे होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.
अर्धवट पडलेल्या कामांच्या खड्ड्यात पाणी साठते, त्यावर झाकणेही लावली जात नाहीत आणि धोक्याचा इशारा देणारे फलकही लावले जात नाहीत. ड्रेनेजच्या खड्ड्याने घेतलेल्या पीयूषच्या बळीने केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या १० शहरांच्या प्रतिष्ठित यादीत आलेल्या सोलापूर शहरापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेत आल्यामुळे शहर विकासात आणि नागरी सोयीसुविधांच्या बाबतीत जी क्रांती होण्याची स्वप्ने आम्हाला आज पडत आहेत, ती साकार होतील तेव्हा होतील! पण आज मात्र देशाच्या स्मार्ट सिटी यादीत येण्यापूर्वी सुरू झालेल्या व रखडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे काय झाले व काय होणार, हा खरा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
२०१० पासून शहरातील ८२ कि.मी. लांबीच्या ४१ रस्त्यांचा २३८ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडला आहे. २०११ पासून शहरातील ड्रेनेज लाईनचा १८७ कोटी रुपयांचा प्रकल्पही तसाच आहे. देगाव, प्रतापनगर आणि कुमठे येथील ८१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील रखडला आहे. आणखी कहर म्हणजे सहा महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटीसाठी आलेला २८८ कोटी रुपयांचा निधी पडूनच आहे.
या पार्श्वभूमीवर किमान लोकांच्या सुरक्षेची तरी काळजी घेण्याची संवेदनशीलता प्रशासनाने अंगिकारावी; अन्यथा ड्रेनेजचे खड्डे आणि रस्त्यावरील खड्डे यातच गुरफटलेल्या सोलापूरकरांना स्वत: स्मार्ट बनून सिटीही स्मार्ट करण्याचा मार्ग कोण बरे दाखवेल!
- राजा माने