ड्रॅगनचा विळखा

By Admin | Updated: April 8, 2016 02:39 IST2016-04-08T02:39:01+5:302016-04-08T02:39:01+5:30

चीनमधील आर्थिक पेचप्रसंग संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या गळ्यालाच नख लावू शकतो, अशी साधार भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.

The Dragon's Ark | ड्रॅगनचा विळखा

ड्रॅगनचा विळखा

चीनमधील आर्थिक पेचप्रसंग संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या गळ्यालाच नख लावू शकतो, अशी साधार भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. चीन हा साम्यवादी विचारसरणीवर चालणारा देश असला तरी, मुक्त अर्थव्यवस्थेच्या या युगात, चीनभोवतालचा पोलादी पडदा केव्हाच वितळला आहे. आता त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची नाळ इतर देशांच्या अर्थव्यवस्थांशी घट्ट जुळली आहे. त्यामुळे एखादा धुलीकण चिनी अर्थव्यवस्थेच्या नाकात शिरताक्षणी उर्वरित जगाच्या अर्थव्यवस्थेला सटासट शिंका येऊ लागतात. चीनची गेल्या काही वर्षातील अभूतपूर्व आर्थिक प्रगती, प्रचंड उत्पादन व त्याच्या जगभरातील विपणनावर बेतलेली आहे; परंतु जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीने घेरल्यापासून चिनी उत्पादनांची मागणी जगभर घटली आहे. या पार्श्वभूमीवर आता चीनने जागतिक विपणनाऐवजी देशांतर्गत विपणनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे; पण देशांतर्गत मागणी काही जगभरातील मागणीची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे चीनचा आर्थिक वृद्धी-दर घटणार आहे आणि त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेत अपरिहार्यरीत्या उमटणार आहेत. गेल्या १५ वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत जी वाढ झाली, तिच्यातील निम्म्या वाढीचे श्रेय चीन, रशिया, ब्राझील व भारत या चार उगवत्या अर्थव्यवस्थांना जाते. त्यामुळे या चार देशांच्या अर्थव्यवस्थांमधील छोट्याशा हालचालीचे पदसादही बड्या राष्ट्रांमधील शेअर बाजारांमध्ये उमटत असतात. भरीस भर म्हणून आता चीनने देशांतर्गत बाजार विदेशी गुंतवणुकीसाठी खुले केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळलेली चीनची नाळ अधिकाधिक घट्ट होत जाणार आहे. परिणामी चिनी अर्थव्यवस्थेमधील प्रत्येक खड्डा जागतिक अर्थव्यवस्थेच्या गाडीला तगडा झटका देणार आहे. नियंत्रित आणि मुक्त या दोन्ही अर्थव्यवस्थांचे लाभ एकाचवेळी उपटण्याचा चीनचा दुटप्पीपणाही उर्वरित जगाला भोवत आहे. त्यातच चीनचे चलन परिवर्तनीय नाही. युआनचा इतर चलनांसोबतचा विनिमय दर बाजार ठरवत नाही, तर चीन स्वत: निश्चित करतो. त्यामुळे स्वत:च्या सोयीनुसार चलनाचे अवमूल्यन करायचे किंवा बाजाराची मागणी असूनही विनिमय दर गोठवून ठेवायचा, अशी खेळी चीन सतत करीत असतो. त्याचे दुष्परिणाम इतर देशांना भोगावे लागतात. अगदी अमेरिकेसारखी महासत्ताही यासंदर्भात तक्रार करीत असते; पण चीन अगदी ढिम्म असतो. इतरांची अजिबात तमा न बाळगता आपल्याला हवे तेच करण्याचा चीनचा हा अट्टहास, कधी तरी इतरांना भोवण्याची दाट शक्यता आहे; कारण चिनी ड्रॅगन आता पूर्वीसारखा पोलादी पडद्याआड सुस्तपणे पहुडलेला नाही. स्वत:ची भूक भागविण्यासाठी झडप घालून इतरांचा लचका तोडायचा आणि पुन्हा पडद्याआड जाऊन दडायचे, ही ड्रॅगनची नीती इतरांच्या अंगलट येऊ शकते.

 

 

Web Title: The Dragon's Ark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.