डोनाल्ड ट्रम्प तर जिंकले, पण अमेरिका हरली!
By Admin | Updated: November 10, 2016 00:27 IST2016-11-10T00:22:46+5:302016-11-10T00:27:26+5:30
हिलरी क्लिन्टन हरल्या. त्यांना मागं सारून डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली खरी, पण या सामन्यात पराभव झाला आहे, तो अमेरिकेचा!

डोनाल्ड ट्रम्प तर जिंकले, पण अमेरिका हरली!
प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
हिलरी क्लिन्टन हरल्या. त्यांना मागं सारून डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली खरी, पण या सामन्यात पराभव झाला आहे, तो अमेरिकेचा!
...कारण डोनाल्ड ट्रम्प ज्या धोरण चौकटीच्या आधारे जनमत आपल्या बाजूला वळवू शकले, ती अमेरिकेनं गेल्या २५० वर्षे जपलेल्या सर्व मूल्यांना बाजूला सारणारी आहे. पराकोटीचा वर्णविद्वेषी, स्त्रीकडं एक उपभोगाचं साधन म्हणून बघणारा, टोकाचा तोंडाळ व कोठलाही विधिनिषेध नसणारा असा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा पूर्णपणे उठवळ व बाहेरून पक्षात आलेला नेता इतर १६ दिग्गज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मतं मिळवून रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतो, हेच मुळात अत्यंत आश्चर्यकारक होतं. दुसरीकडं डेमॉक्रॅटिक पक्षानं हिलरी यांना उमदवारी दिल्यानं अमेरिकेच्या इतिहासात महिला अध्यक्ष निवडली जाण्याची शक्यता पहिल्यांदाच निर्माण झाली होती. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, तेव्हा ट्रम्प व क्लिन्टन असा हा सामना एकतर्फीच वाटत होता. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराच्या अमेरिकी पद्धतीप्रमाणं दोन्ही उमेदवारांत वादविवादाच्या तीन फेऱ्या झाल्या, त्यात क्लिन्टनच आघाडीवर राहिल्या. हिलरीच निवडून येणार, फार झाल्यास त्यांचं मताधिक्य कमी होईल, पण विजय होणार तो त्यांचाच, असं एकूण वातावरण मतदान तोंडावर आलेलं असतानाही होतं.
तरीही ट्रम्प जिंकले. निर्णायकरीत्या व निर्विवादपणे!
असं कसं घडलं?
पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या लोकप्रियतेला कमी ओहोटी लागली आहे, अशा उमेदवाराची निवड करण्याचाच पर्याय अमेरिकी मतदारांपुढं होता. या आधीच्या दोन्ही निवडणुकांत ‘मी अध्यक्ष झालो, तर तुमचं आयुष्य कसं सुधारीन’, असा आशावाद मतदारांच्या मनात जागवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी केला होता. त्यात ओबामा यांची भूमिका प्रभावी ठरली. ‘यस, वी कॅन’ या ओबामा यांनी दिलेल्या घोषणेनं एक उत्साहाची लाटच आली. त्या आधीच्या आठ वर्षांत ९/११ चा हल्ला, इराकमधील युद्ध, २००८ ची मंदीची लाट यांनी अमेरिकी जनमत अस्वस्थ होतं. एकीकडं जनतेच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूस देशाचं काही बरं चाललेलं नाही, अशी सर्वसाधारण भावना बळावत होती. त्या पार्श्वभूमीवर ‘यस वी कॅन’ ही ओबामांची घोषणा जनमनाला भावली.
मात्र ओबामांच्या गेल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत असा आशावाद टप्प्याटप्प्यानं ओसरत गेला. प्रत्यक्षात आर्थिक आकडेवारीच्या अंगानं बघितल्यास अमेरिकेतील बेरोजगारीचं प्रमाण घटत गेलेलं आढळतं. तसंच युरोपीय व इतर विकसित देशांच्या तुलनेत अमेरिकेच्या आर्थिक विकासाचा दर जास्त राहिला. या पार्श्वभूमीवर खरं तर डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून हिलरी क्लिन्टन यांंना मोठा फायदा उठवता आला असता. पण त्या आड आली, ती त्यांची गेल्या काही वर्षांत डागाळलेली प्रतिमा. आर्थिक गैरव्यवहार, ई-मेल प्रकरण व त्याचा अमेरिकी सुरक्षा धोरणावर होऊ शकणारा संभाव्य परिणाम इत्यादी प्रकरणांचे डाग हिलरी यांच्या प्रतिमेला लागत आले होते. ते पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. उलट हिलरी यांच्या या प्रकरणांचा ट्रम्प वारंवार पुनरूचार करीत राहिले आणि त्या कशा भ्रष्ट, विधिनिषेधशून्य, आपमतलबी आहेत आणि असा अध्यक्ष तुमचे प्रश्न सोडवेल की, स्वत:चे हितसंबंध जपेल, असा सवाल ट्रम्प मतदारांना करीत राहिले. अमेरिकी मूल्यांच्या धोरण चौकटीबाहेरचं ट्रम्प यांचं वावदूक वागणं व बोलणं यावर बोट ठेवण्याचा क्लिन्टन यांच्या प्रचाराचा रोख होता. साहजिकच आर्थिक अडचणीनं गांजलेले समाजातील काही घटक ट्रम्प यांना पाठबळ देत असले, तरी एकूण अमेरिकी समाज इतका अतिरेकी नेता अध्यक्षपदी निवडून देणार नाही, अशीच सर्वसाधारण भावना होती. निदान तसं प्रसार माध्यमांतून प्रतिबिंबित तरी होत होतं.
मात्र घडलं उलटंच. ट्रम्प विजयी झाले. बहुतांश अमेरिकी प्रसार माध्यमांचे अंदाज साफ चुकले. ट्रम्प अध्यक्ष झाल्यास काय होईल, असं जे चित्र या प्रसार माध्यमांनी रंगवलं होतं, ते मतदारांनी नाकारलं. तसंच लॅटिन अमेरिकेतून आलेले स्थलांतरित, कृष्णवर्णीय, महिला असे समाजातील घटक बहुतांशानं ट्रम्प यांच्या विरोधात जातील, हा होराही खरा ठरलेला नाही. लॅटिन अमेरिकेतून आलेले स्थलांतरित मोठ्या प्रमाणात हिलरी यांच्या बाजूनं मतदान करतील, असे आडाखे निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी अनेक अमेरिकी वृत्तपत्रं व वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केले होते. प्रत्यक्षात फ्लोरिडा या राज्यातील अटीतटीच्या सामन्यात ट्रम्प यांच्या बाजूनंही लॅटिन अमेरिकी स्थलांतरितांचं लक्षणीय मतदान झालं. ज्या चार-पाच राज्यांत दोन्ही उमेदवारांत चुरशीची लढत होईल, असा अंदाज होता, तिथे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांच्या पारड्यात मतं टाकल्याचं मतदानोत्तर चाचण्यांनी दाखवलं.
याचा अर्थ एकच आहे की, काही अपवाद सोडल्यास, उदारमतवादाच्या चौकटीत वावरणाऱ्या बहुसंख्य अमेरिकी प्रसार माध्यमांंना गौरवर्णीय अमेरिकी मतदारांच्या मनात जी खळबळ आहे, तिचा खरा अंदाजच आला नाही. अमेरिकेतील बेरोजगारीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटलं असलं, तरी उरलेल्या बेरोजगारांत पदवी नसलेल्या गौरवर्णीय तरूणांतील बेरोजगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ट्रम्प यांनी नेमकी या मतदारांच्या मनातील खळबळ ओळखून तिला अत्यंत प्रक्षोभकरीत्या तोंड फोडलं. भारत व चीन या देशांत तुमच्या नोकऱ्या जात आहेत, हा त्यांचा मुद्दा अशा मतदारांना भावला तर नवल ते काय? जे अडचणीत असतात, त्यांना परखड वस्तुस्थितीऐवजी सोपी उत्तरं भावतात. तीच गोष्ट स्थलांतरित व मुस्लीम यांच्याबाबतची. अमेरिकी जीवनपद्धतीला या लोकांमुळंं धोका निर्माण होत आहे, येत्या २० वर्षांत गौरवर्णीय अमेरिकी नागरिकांची संख्या ४७ टक्क्यांपर्यंत खाली येईल, उलट लॅटिन अमेरिकी स्थलांतरितांचे लोकसंख्येतील प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत जाईल, हा ट्रम्प यांचा मुद्दा, किती खरा वा किती खोटा याचा लेखाजोखा न घेता, मतदारांना भावला. आपण आधी आपलं बघावं, नसती जगाची उठाठेव कशाला करायची, हा ट्रम्प यांचा पवित्रा आणि अशी उठाठेव केल्यानंच देशावर आजची परिस्थिती ओढवली आहे, हा ट्रम्प यांचा रोखही अमेरिकी मतदारांना भावला.
उदारमतवाद, मानवतावाद, सर्व प्रकारचे व्यक्तिस्वातंत्र्य, ही मूल्यं हा अमेरिकी लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळेच विविध संस्कृतीचे लोक अमेरिकेत येऊन एकत्र नांदत गेले आणि त्यातूनच आजची समर्थ अमेरिका घडली आहे. हेच मुळात चुकलं, असं ट्रम्प म्हणत आहेत. त्याचं म्हणणं मतदारांना पटलं आहे. त्यामुळंच ट्रम्प जिंकले. पण जगाला जी अमेरिका ठाऊक आहे, ती हरली आहे.
जगभर उदारमतवादी विचारांची जी पिछेहाट चालू झाली आहे, तिचा एक मोठा व महत्वाचा टप्पा ट्रम्प यांच्या विजयानं गाठला गेला आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर ट्रम्प म्हणतात, तसं त्यांनी खरंच केलं, तर जगापासून फटकून वागणाऱ्या अमेरिकेमुळं आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्तासमतोलात मूलभूूत स्थित्यंतर होणार आहे. त्यामुळं जगावरही अस्थितरतेचं सावट धरलं जाण्याची शक्यता आहे.