सोडणार नाही, असेही आणि तसेही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2015 04:41 IST2015-10-24T04:41:13+5:302015-10-24T04:41:13+5:30

प्रश्न अखेर ‘आवाज कोणाचा’, हे जगाला दाखवून वा खरे तर ऐकवून दाखविण्याचा होता. त्यामुळे अधिकाधिक संख्येने सैनिकांची जमवाजमव करणे क्रमप्राप्तच होते.

Do not leave it, and so on! | सोडणार नाही, असेही आणि तसेही!

सोडणार नाही, असेही आणि तसेही!

प्रश्न अखेर ‘आवाज कोणाचा’, हे जगाला दाखवून वा खरे तर ऐकवून दाखविण्याचा होता. त्यामुळे अधिकाधिक संख्येने सैनिकांची जमवाजमव करणे क्रमप्राप्तच होते. तसेही हे आन्हिक पूर्ण करण्यासाठी सैनिक मुंबईत जमतच असतात. यंदाही ते जमले. तेवढीच जीवाची मुंबई! तरीही यंदा अंमळ अधिक मोठ्या संख्येने सैनिक जमले म्हणतात. बहुधा गेल्या वर्षीचा बॅकलॉग भरुन काढायचा होता. सैनिकांची ही जमवाजमव विचारांचे सोने लुटण्यासाठी होत असते, असे म्हटले जाते. हल्ली हल्ली सोन्याचे भाव घसरत चालले असले तरी अजूनही ते तसे सामान्यांच्या आवाक्यात नाहीतच. त्यातून लुटणे वगैरे हा काही सैनिकांचा प्रांत आणि स्थायीभाव नाही, असेही म्हणतात! तसेही मऱ्हाटी मुलखात सोन्याच्या ऐवजी आपट्याची पाने लुटण्याचा वा उधळण्याचा रिवाज अनेक वर्षांपासून रुजू झालाच आहे. तेव्हां ज्या न्यायाने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे, त्याच न्यायाने ‘विचारांचे सोने लुटण्या’च्या संकल्पनेचे आता ‘आदळआपट करुन आपट्याची पाने उधळणे’ असे झालेच पाहिजे! कारण तसे करणेच कालसंगत आणि सयुक्तिक ठरु शकेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे आपट्याची पाने उधळताना अनेकांना आपटून काढले. त्यातून दिल्लीतले मोदी सरकारही सुटले नाही. कोण म्हणते दिल्ली दूर आहे? पण तरीही त्यांनी उधळलेल्या आपट्याच्या पानांपैकी एकच पान त्यातल्या त्यात दखलपात्र म्हणावे असे होते आणि ते म्हणजे ‘सरकार सोडणार नाही आणि सरकारलाही सोडणार नाही’! खरे तर सेनेचा आजवरचा इतिहास लक्षात घेता हेही तसे आश्चर्यकारक नाही. सत्तेचे सारे लाभ स्वीकारायचे पण जबाबदारी झटकून द्यायची या ब्रीदावर सेनेची आणि खरे तर सेनेच्या नेत्यांची प्रथमपासूनच अढळ श्रद्धा. पण तरीही यंदा या संदर्भात काढल्या गेलेल्या विधानाला अंमळ वेगळा संदर्भ आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हणण्याऐवजी खरे तर गेल्या वर्षभरापासून म्हणजे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या सरकारातील सेना आणि भाजपा यांची भांडी परस्परांवर आपटली नाहीत (आला पुन्हा आपटा) असा एकही दिवस गेला नाही. तरीही त्या दोहोतील धुमसणे अलीकडच्या काळात जरा जास्तीच धूर ओकू लागले होते. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पक्षप्रमुख आपल्यातील जातीवंत बाणेदारपणाची तलवार उपसून ‘या दळभद्र्या, महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या, महागाईवर न बोलता गाईंवर बोलणाऱ्या, महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या, कुचकामी सरकारपासून आम्ही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अलग होत आहोत. आता दिल्लीचे सध्याचे तख्त फोडून आपले तख्त तिथे बसवीत नाही तोवर विश्रांती नाही, जय भवानी, जय शिवाजी’, अशी काही तडाखेबंद घोषणा करतील असे अनेकाना वाटत होते. प्रसार माध्यमे तशी शक्यता व्यक्त करीत होती तर मुख्यमंत्र्यांसकट भाजपातील यच्चयावत सारे नेते ताम्हनात गणपतीची प्रतिष्ठापना करुन त्यावर संततधार अभिषेक करीत होते! पण कसचे काय! तशी घोषणा न होता, नाते सत्तेशी नव्हे तर जनतेशी असल्याचे गुळमुळीत विधान करुन सत्तात्याग नाही असे पक्षप्रमुखांनी जाहीर करुन टाकले. कोण म्हणतो, मराठा गडी ‘आव ना देखा ताव’ या न्यायाने फारसा विचार न करता मुसंडी मारुन मोकळा होतो? आता तसे राहिलेले नाही. सेनेचा मराठा गडी देखील विचार करु लागला आहे. आपण बाणेदारपणा दाखवून सत्ता सोडण्याने भाजपाला काहीही फरक पडत नाही हे विचारांती सेनेच्या ध्यानात आले होते. किंबहुना आपण एकदाचे सोडून जावे अशी अपेक्षा बाळगणाऱ्या भाजपाचा अपेक्षाभंग करण्यात अधिक मौज असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्याचबरोबर नखशिखांत मराठीपण खच्चून भरलेले असल्याने पक्ष प्रमुखांना ‘शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले’ ही म्हण चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे एकीकडे भाजपाला अपेक्षाभंगाचे दु:ख द्यायचे आणि दुसरीकडे बारामतीकरांना नुसतेच जिभल्या चाटत ठेवणे यामध्येच खरोखरी तुंबळ मौज असल्याचे पक्षप्रमुखांना चांगलेच ज्ञात होते वा झाले होते. एकदा या महत्वाच्या आणि महाराष्ट्रातील तमाम आया-बहिणींच्या ‘जिव्हाळ्या’च्या प्रश्नावर सेनेची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित भाषणात तेच ते आणि तेच ते होते. जेव्हां कोणत्याही व्यक्तीला, संघटनेला किंवा पक्षाला स्वत:च्या गैरकृत्यांमध्येही सत्कृत्यांचा साक्षात्कार होत असतो तेव्हां अशा व्यक्ती वा पक्षाच्या भूमिकांची चिकित्सा करणे आणि त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारची अपेक्षा ठेवणे निरर्थक ठरत असते. सेनेच्याच भाषेत बोलायचे तर कोण्या एका सुधीन्द्र कुळकर्णींचे ‘थोबाड रंगविणे’, पाकिस्तानी गायकाला हुसकावून लावणे आणि कोणा पाकी माजी मंत्री-लेखकाच्या पुस्तक प्रकाशन समारंभास अपशकून करणे यात ज्यांना राष्ट्रसेवेचा भास होत असतो आणि त्यातच मग पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा आनंदही होत असतो त्यांच्या एकूणच व्याख्या इतरांच्या व्याख्यांशी मेळ खाणे दुरापास्तच नव्हे तर असंभव असते. तरीदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनास दस्तुरखुद्द मोदींनी आपली ‘गर्विष्ठ’ मान पुन्हा एकदा झुकवून एक पाट सात ठिकाणी केला असता तर तथाकथित विचारांचे इतके आपटबार फुटले असते?

Web Title: Do not leave it, and so on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.