मी सुगम गाणार आणि शास्त्रीयही गाणार!.. एकच का निवडायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:07 AM2024-04-06T11:07:22+5:302024-04-06T11:09:59+5:30

Dnyaneshwari Gadge News: ‘सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चा सन्मान प्राप्त करणारी तरुण गायिका ज्ञानेश्वरी गाडगे : शास्त्रीय आणि सुगम संगीतातील उगवत्या प्रतिभेशी संवाद!

Dnyaneshwari Gadge: I will sing sugam and sing classical too!.. why choose only one? | मी सुगम गाणार आणि शास्त्रीयही गाणार!.. एकच का निवडायचे?

मी सुगम गाणार आणि शास्त्रीयही गाणार!.. एकच का निवडायचे?

‘सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चा सन्मान प्राप्त करणारी तरुण गायिका ज्ञानेश्वरी गाडगे : शास्त्रीय आणि सुगम संगीतातील उगवत्या प्रतिभेशी संवाद!

तू रिॲलिटी शोमधून पुढे आलीस. लोक आपल्यावर इतकं प्रेम करतील, असं वाटलं होतं का तुला? 
आपण इतके लोकप्रिय होऊ असा विचार मी स्वप्नातदेखील केला नव्हता. पण रिॲलिटी शोमध्ये स्वत:च्या आवडीचं गाता येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आधी एक रिॲलिटी शो मी पहिल्या पाचात आल्यानंतर  सोडून दिला होता. कारण मला शास्त्रीय गाणं गायचं होतं आणि मला फिल्मी गाणी दिली जात होती. शेवटी बाबांनी आणि मी ठरवून त्या शोमधून माघार घेतली. सारेगम लिटिल चॅम्पमध्ये मला विचारणा झाली तेव्हा  आधी नाही म्हटलं होतं. शास्त्रीय गाणं गायला मिळणार नसेल तर शोमध्ये भाग नाही घ्यायचा, असंच ठरवलं होतं . पण त्यांनी माझी  अट मान्य केली आणि मी सारेगम लिटिल चॅम्पच्या मंचावर गाऊ लागले. रिॲलिटी शोमध्ये शास्त्रीय गायनाला इतका वाव याआधी कधी मिळाला नव्हता.. 

शंकर महादेवन, अन्नू मलिक यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रतिक्रियांचं, त्यांच्या कौतुकाचं दडपण यायचं का? 
मला दडपण कधीच आलं नाही. कारण मी रंगमंचावरच लहानाची मोठी झाली आहे. उलट  कौतुक झालं की यानंतर आणखी काय नवीन गाता येईल याचा विचार  मी करायचे. रसिकांना  नेहमी वेगळं ऐकवण्याची सवय मला नियमित भजन स्पर्धेत गायल्याने लागली. आम्ही वारकरी संप्रदायातले. आमच्या घरात कीर्तनकारांच्या अनेक पिढ्या झाल्या आहेत. मी साडेतीन वर्षांची होते. बालवाडीमध्ये घरात ऐकलेली गवळण सगळ्यांसमोर म्हणून दाखवली होती. तेव्हा शाळेतल्या शिक्षकांना ती खूप आवडली. त्यांनी माझ्या बाबांना बोलावून माझं कौतुक केलं. मग माझ्या बाबांनी माझ्या गाण्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. बाबा हे माझे पहिले गुरू. मी गाण्यात पुढे जावं हे स्वप्न  त्यांनी बघितलं. बाबा माझ्याकडून रोज तीन ते साडेतीन तास रियाझ करून घेतात. माझ्या बाबांना लहानपणापासून शास्त्रीय गाणं आवडायचं. त्यांना हार्मोनियम, पखवाज वाजवता यायचा. पण केवळ आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने ते रीतसर गाणं शिकू शकले नाहीत.  उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत असूनही  त्यांनी आपली गाण्याची आवड कायम जपली. गुलाम अली खान, कौशिकी चक्रवर्ती, अजय चक्रवर्ती, शोभा मुदगल यांच्या बंदिशी आमच्या घरात कायम वाजतात. आता मला गाणं इतकं आवडतं की कोणत्याही व्यासपीठावर कितीही दिग्गज गायकांसोबत गाताना मला  दडपण येत नाही. 

शाळा, रियाझ, गाण्याचे कार्यक्रम, स्पर्धा हे सगळं कसं सांभाळतेस? 
- मी पहाटे लवकर उठून रियाझ करते. नंतर शाळेत जाते, शाळेतून आल्यावर अभ्यास झाला की पुन्हा रियाझ करायला बसते. षडजचा थोडा वेळ सराव केला की मी बडा ख्याल घेते. कार्यक्रमांसाठी गाणी बसवलेली असतात त्याची प्रॅक्टिस करते. गाण्याचे कार्यक्रम, स्पर्धा असतात तेव्हा शाळा बुडते. पण शाळा त्यासाठी एक्स्ट्रा क्लास घेऊन माझा बुडालेला अभ्यास पूर्ण करून घेते. रिॲलिटी शोमध्ये भाग घ्यायच्या आधीपासूनच शाळेने मला खूप मदत केली आहे. 

भविष्यात सुगम संगीत की शास्त्रीय संगीत, अशी निवड करायची वेळ आल्यास तुझी निवड काय असेल? 
- मी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असं दोन्ही गाणार आहे.  एकाची निवड कशाला करायची? मला शास्त्रीय गायनातच माझं करिअर करायचं आहे. सारेगमच्या एका एपिसोडमध्ये आशाताई आल्या होत्या. माझ्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना  त्या म्हणाल्या होत्या, ‘किशोरीताईंनंतर कौशिकी चक्रवर्ती आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी तुझाच नंबर आहे!’- आशाताईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला खरा करून दाखवायचा आहे.  हे माझं आणि माझ्या बाबांचं स्वप्न आहे.
मुलाखत : माधुरी पेठकर

Web Title: Dnyaneshwari Gadge: I will sing sugam and sing classical too!.. why choose only one?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत